पंडित राजन भाई मिश्रा क्रिटिकल आहेत असं माझ्या पुतण्यानं- गौरांगने, मला सांगितलं .फोन ठेवते न ठेवते तोपर्यंत दिलीप भोजने यांचा फोन आला .पंडितजीं बद्दल वाईट बातमी आहे म्हणाले. नुकतंच बोलणं झालं असल्यानं मी त्यांना ठामपणाने सांगितलं ,"तसं काही नाही ,ते क्रिटिकल आहेत." तरी विचाराव म्हणून.माझा मित्र विजय मागीकर , ज्याच्यामार्फत राजन भाई आणि साजन भाईंचा परिचय झाला त्याला मी फोन केला .तोही तेच म्हणाला, ते क्रिटिकल आहेत . बातमी खरी नाही या कल्पनेनं अडकलेला श्वास मोकळा झाला ,म्हणेपर्यंत विदुषी कलापिनी कोमकलींची एफबी पोस्ट दिसली .जे होऊ नये ते घडलं होतंच. अशा बातम्या कधीच का खोट्या ठरत नाहीत? काही क्षणांचा खेळ. असण्या नसण्यात केवळ एकाच श्वासाचं अंतर असतं ,हे पुन्हा एकदा जाणवण्याचा तो क्षण !
मन इतकं , इतकं झाकोळून गेलं .जगजितसिंग गेले होते तेव्हा सारखंच! काळजाचा तुकडा कुणी कापून काढावा, मोठी ,रक्तबंबाळ करणारी जखम झाली की दुखत नाही ,बधिरपणा येतो एक प्रकारचा ,असं काही काही झालं .
माझ्या झाझेन या सेकंड होमने, जे मला भरभरून दिलं, त्यात राजन भाई- साजन भाईंचा तिथला ,मुक्त रहिवास आणि सहवास आहे. माझा मित्राने विजयने कळत नकळत ,असे कितीतरी सूर, स्वर, लय ,तालाचे क्षण माझ्या आयुष्यात आणले की आयुष्यातली कितीतरी अवघड वळणं सहजी पार झाली .
पहिल्यांदा दोघंही यायचे होते, तेव्हा मला अतिशय टेन्शन आलं होतं .हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातला topmost duo!खापर पणजोबा, पणजोबांपासून ,बडे रामदासजी, वडील हनुमान प्रसादजी, काका सारंगीवादक गोपाल प्रसाद मिश्राजी ,अशी दीर्घ ,साडेतीनशे -चारशे वर्षांची संगीत परंपरा असलेल्या घरात , राजन भाई साजन भाईंचा जन्म झालेला. युनेस्कोनं म्युझिक सिटी म्हणून मान्यता दिलेल्या, हिंदुस्थानचा वैभवशाली संस्कृतींचा वारसा मिरवणार्या आणि Oldest living city म्हणून बहुमान पात्र अशा बनारसचे अनभिषिक्त सम्राट . . . "काशी बसैय्या" मिश्रा बंधू !
त्यांना काय आवडतं ,इथं त्यांना राहणं गैरसोयीचे होईल का ?कितीतरी शंका आणि प्रश्न! विजय म्हणाला, अगं नको टेन्शन घेऊ .अतिशय साधे आहेत दोघंही.बघशीलच. खरंच बघितलं. पहिल्या भेटीतच! राजन भाईंच्या डोळ्यातला शुभ्र नितळपणा, एकही लाल रेषा नसलेले निर्व्याज तेजस्वी डोळे ,आश्वस्त करणारे . . . वेगळं काही सांगायची -बोलायची गरजच नव्हती .
जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा झाझेनचेच होऊन गेले .जितकी माणसं कर्तृत्वसंपन्न,गुणसंपन्न,तितकी जमिनीवर पाय असणारी असतात .साधेपणा ,सरळपणा ,निगर्वीपणा सतत प्रतित होत असतो. हा अनुभव मला राजनभाई-साजन भाई ,पं.राकेश चौरसियाजी ,पंडित कुमारजी बोस अशा अनेकांकडून मिळाला .
दोघांचीही, कशाचीच अपेक्षा नसायची .झाझेनच्या सीट आउटमध्ये रात्री बसलं की उंचावरून वेण्णा नदीच्या परिसरातल्या गावांचे दिवे लुकलुकताना दिसले की हमखास म्हणणार," प्लेन मे बैठा हुँ, ऐसा लगता है ।"
खूप गप्पा. राजनभाई थोडे मितभाषी. पण संगीताचा, बनारस घराण्याचा, बनारसचा ,विषय निघाला की भरभरून बोलायचे. "काशीमे सदैव "रस" बना रहता है इसलिए काशी बनारस कहलाती है" म्हणायचे. ते म्हणायचे, "बनारसमे जीने की एक सहजता आहे जो और कहीं नह़ी।"
राजनभाई- साजनभाईंचं घर बनारसच्या "कबीर चौराहा "या गल्लीत. कबीरांची समाधी असलेला हा चौराहा.याच गल्लीत पंडित सामताप्रसादजी, सितारादेवी, पंडित किशनमहाराज यासारख्या संगीत रत्नांनी अवतार घेतला. या गल्लीतच, नेमकी इतकी संगीतरत्नं कशी जन्माला आली त्याचा अन्योन्य संबंध कबीरांच्या तिथल्या वावराशी, समाधीशी आहे, असं राजन भाई मानायचे .
दोघंही अगदी खुशमिजाज! एकदा सहजच मी म्हटलं की "आप हमेशा ही इतने खुश रहते हो?" तर म्हणाले, "हाॅं,जी अंदरसे खूश हुॅं और वोही खुशी बाँटता रहता हुँ।" ईश्वराने त्यांना खरोखरच मुक्त हस्तानं, भरभरून दिलं. घराण्याची परंपरा अशी की जन्मल्या क्षणीच कानावर अलाैकिक सप्त स्वर - सारंगीचे स्वर पडले. माता पित्यांचा आदर ,गुरु शिष्य परंपरा, एकत्र कुटुंब, अशी मूल्यं मानणारे मिश्रा बंधू, आपली संस्कृती, आपलं मूळ आणि आजचं बदलतं जग यांचा समन्वय राखता आलं पाहिजे ,असं आग्रहानं म्हणायचे .
संगीत ही मालमत्ता नव्हे तर ते एक समर्पण आहे.ईश्वराची प्रार्थना आहे. प्रेम आहे .शरीराला जसं अन्नाची गरज असते तसं आत्म्याचं अन्न म्हणजे संगीत . . .food for the soul. . असं मानणारे . भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे निसर्ग, मानवी मन, मानवी भावनांचा आविष्कार असतो. ते संगीत एक spiritual connect जुळवून देतो असा ठाम विश्वास असणारे.शेकडो-हजारो वर्षांपासून भारतीय संगीत धारा ,गंगेसारखीच अनादि अनंत काल अखंड वहात आली आहे . ती कधीच नष्ट होऊ शकत नाही . .
राजन भाई आणि साजन भाईंची एकरूपता इतकी होती. . . क्षणोक्षणी जाणवायचं. त्यांची जुगलबंदी म्हणजे "as beautiful as solo" असं म्हटलं जातं .दोघांना Two voices one soul म्हणतात ते शतप्रतिशत खरंच आहे ."अद्वैत संगीत" म्हणून एक त्यांच्यावरची मूव्ही आहे .राजन भाई आणि साजन भाईंच्या कडं पाहिलं, त्यांचं गाणं ऐकलं की "अद्वैत संगीत" म्हणजे काय याचा साक्षात्कार घडतो.
झाझेन वर आले की सकाळी उठल्यावर , साजन भाई बनारसी पानं जमवायला बसायचे .५० /६० तरी पानं बनवायचे रोज. माझ्या मनातला प्रश्न साजन भाईंनी ओळखला."बडे भाईसाहब को दिनभर ३०/३५ पान तो लगतेही है। मुझे भी . .ये मैं ही बनाता हुँ ।विदेश गये तो भी हम बनारसी पान साथ लेके जाते है ।"वर आणि मला म्हणाले ,"सीमाजी फोटो निकालो। ऐसा पानवाला आपको कहा मिलेगा ?"
संगीत क्षेत्रातल्या एका दिग्गज स्राी कलाकाराचा काही मालमत्ता . विल बद्दल problem होता. मला म्हणाले , आप जरा उनसे बात करो . . वो बहोत परशान है. . त्यांना फोन करुन सांगितलं . सीमाजीसे freely discuss करो . . वो टिपीकल हायदैय्यावाली नहीं है" त्याही मोकळे पणाने बोलल्या. नंतरही अनेकवेळा. राजनभाईंचं असं साधं सुधं वागणं !
एकदा त्यांचा कोल्हापूरला देवल क्लबमध्ये कार्यक्रम होता. आदल्या दिवशी झाझेनवर मुक्कामी आले .मला म्हणाले," हमारे साथ कोल्हापूर चलो . . सहेलियों को भी साथ ले चलो ।"माझी मैत्रीण कल्याणी थत्ते यांना घेऊन त्यांच्या पाठोपाठच कोल्हापूरला पोचले. वूडलँड हॉटेलच्या लाऊंजमध्ये कुणी कुणी भेटले म्हणून बोलत उभी असतानाच, जिन्यावरून राजन भाई आणि साजन भाई उतरताना दिसले .पीच कलरचे सिल्कचे एकसारखे कुर्ते ,क्रीमीश सिल्कची धोती आणि जरी काठी उपरणं . . .गळ्यात सोन्याची चेन. बोटात ठसठशीत चमकदार पुष्कराज . .काही विशिष्ट व्यक्तीभोवती एक वलय - ऑरा असतो, असं मी ऐकलेलं होतं . राजनभाई आणि साजनभाईंभोवती असलेला "ऑरा "त्या दिवशी मी, याची देही याची डोळा ,अनुभवला .माझे डोळे मिटेपर्यंत मी आयुष्यात कधीही ते दृश्य विसरूच शकणार नाही. त्यानंतरची ती सूरात चिंब भिजलेली संध्याकाळ!कार्यक्रमाची सांगता माझा लाडक्या भैरवीने . . "धन्य भाग सेवा का अवसर पाया. . "त्या सुरांनी भिजलेल्या संध्याकाळचा अनुभव शब्दात सांगायचा तर याच भैरवी तल्या शब्दात सांगता येईल . .
"घट मे गुंजा नाद निरंतर
ज्योत जली अंतर मे
सौ सूरज के उजियाले मे
मैने मुझको पाया ।"
जेव्हा जेव्हाही दोघांचं गाणं ऐकलं ,त्या त्या प्रत्येकवेळी, "सौ सूरज का उजियाला" असा, लखलखता तीरा सारखा भिडायचा .
झाझेन वर ते आले की मी पंढरपूरची खास उदबत्ती लावायचे . तो विशिष्ट सुगंध त्यांनी अचूक हेरला होता. "आपके पास है हमें भी दे ना ".
तसंच कांदा लसूण मसाल्याचं अप्रूप !इतका आवडला की बस्स ! देतांना मी अगदी बजावून सांगितलं होतं की कमी घाला. पुन्हा आले तेव्हा म्हणाले," अरे सीमाजी हमारे खानसामाने सब मसाला एकही बार डाल दिया. . इतना तीखा हो गया . . "
खाण्याच्या विशेष आग्रही आवडी नसल्या तरी एन्जॉय मात्र करायचे . मला कुकिंग मध्ये विशेष रुची आहे हे कळल्यावर साजन भाईंनी तर पतौडीच्या नबाबांची स्पेशालिटी अशी एक रेसिपी,मला साग्रसंगीत सांगितली. त्यावर मटारचा "निमोना " म्हणून एक रेसिपी आहे तोही सीमाजीना सांग असा राजन भाईंचा आग्रह !कधीही परकेपणा असा वाटलाच नाही.
त्यांचा कार्यक्रम असला की शक्यतो जायचंच .विलेपार्लेच्या ह्रदयेश संगीत महोत्सवात त्यांचं गाणं होतं .माझ्याबरोबरच्या कुणीतरी सहज म्हटलं की ललत ऐकायला मिळावा . .विजयने आत जाऊन काय सांगितलं माहीत नाही. पण चक्क ललत ऐकायला मिळाला.नंतर त्यांना भेटायला आत गेले, त्या वेळेला मिश्किलपणाने हसून म्हणाले," सीमाजी ललत आपके लिये था।"असे अनमोल क्षण म्हणजेच आयुष्यभराची पुंजी !
बनारस घराणे म्हणजे चैती, ठुमरी ,कजरी ,ख्याल, ध्रुपद- धमार यांचा ठेवा .त्यातली ख्यालगायकी मिश्रा बंधूंची मिरासदारी . . .खयाल हा एक पर्शियन शब्द आहे. .खयाल म्हणजे एखादी कल्पना किंवा इमॅजिनेशन . . पण राजन भाई म्हणायचे की खयाल म्हणजे Sailing across the serene waters of Ganga . गंगा त्यांच्या आयुष्याचाच भाग होता. गंगा लहरींनी मिश्रा बंधूंना तिचं संगीत जन्मल्यापासून ऐकवलं आणि या दोघांचं संगीतही गंगा लहरींवर उमलत, फुलत गेलं .
राजन भाईंचं बोलणं ऐकत राहावं असं वाटायचं.भारतीय शास्त्रीय संगीतच जगात शांती आणि शांतता आणेल . . .(peace and silence) असं ते म्हणायचे . कधीही उन्माद, उत्पात, उन्मत्तपणा करू नये .एक परफॉर्मर म्हणून कॉन्फिडंट असावं .श्रोता म्हणून -लिसनर म्हणून सप्लिकंट असावं पण अॅरोगंट कधीही असू नये. The more you are empty, the more you receive. हे त्यांच्या जीवनाचं ,जगण्याचं साधं सूत्र होतं.
साताऱ्याचा निसर्ग अप्रतिमच आहे .कास तलावाच्या परिसरात त्यांना आवर्जून नेलं होतं .त्यांना तिथला निसर्ग खूप भावला ."एक बार यहाँ आके पिकनिक करेंगे, बार्बेक्यू करेंगे "असं म्हणाले होते , पण आता ते सगळं राहूनच गेलं .
त्यांची" धन्य भाग सेवा का अवसर पाया "ही भैरवी माझी अत्यंत आवडती. मिश्र भैरवी .इंग्लिशमध्ये Mishra bhairavi असं लिहिलं जातं. मला नेहमी वाटतं ही राजन भाई साजन भाई या मिश्रा बंधूंची भैरवी म्हणून Mishra bhairavi !
राजनभाईंबद्दल बातमी कळल्यावर पहिला विचार साजन भाईंचा मनात आला.बनारस घराण्याची खयाल परंपरा आहे ,तीआमीर खुसरो पासून सुरू झाली असं म्हणतात .आमीर खुसरोचें शब्द मनात घोळत राहीले.
"साजन ये मत जानियो तोहे बिछडत मोहे चैन
दिया जलत हेै रातमें और जिया जलत बिन रेेैन"
असंच काहीतरी राजन भाईंना या जगाचा निरोप घेताना वाटलं असेल का ?
एकदा विजय बरोबरच दाेघे दांडेलीला गेले हाेते . परतीच्या वाटेवर, विजयला त्यांनी हक्कानं सांगितलं ,सीमाजी के घर रहेंगे । राजन भाई आणि साजन भाईंचं असं हक्कानं येणं घरच्यासारखं मोकळंढाकळं राहणं .. . .असं वाटतंय . . .
"धन्य भाग सेवा का अवसर पाया . . . ."
श्रद्धासुमनांजली राजनभाई.
Adv Seemantini Noolkar

सर्वप्रथम महान गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली.
उत्तर द्याहटवाअत्यंत भावस्पर्शी लिखाण. प्रत्येक शब्दातून आत्मीयतेचा अलवार स्पर्श, भावसंबंध किती दृढ होते ते दाखवून जातात. अशा मोठ्या कलाकारांचा सहवास तुम्हाला लाभला परमभाग्य आहे.
अप्रतीम वर्णन!
उत्तर द्याहटवाया थोर कलाकाराला मनःपूर्वक आदरांजली...🙏🏼🙏🏼
सीमा, या थोर कलावंताला श्रद्धांजली ....🙏🙏
उत्तर द्याहटवाआणि तू अत्यंत भाग्यवान आहेस की त्यांचे स्वर्गीय स्वर कायम तुझ्या कानावर पडत गेलेत...
खूप प्रवाही ह्रदयाला भिडणारे लिहिले आहेस .तू किती भाग्यवान आहेस..एवढ्या मोठ्या ,साध्या ,सज्जन माणसांचा संगीतमय सहवास तुला लाभला ...आज झाझेनमधे त्यांचे सूर ,स्वर गुंजत असतील..इतक्या छान आठवणी जीवन समृद्ध करतात .
उत्तर द्याहटवात्यांच्याच एका चीजेचे शब्द ...या कलावंताला श्रद्धांजली...
चलो मन वृंदावन की ओर
अत्यंत थोर कलावंतांस दिलेली ही अतिशय अनौपचारिक भावस्पर्शी श्रद्धासुमनांजली... वाचता वाचता कितीदा डोळे ओलावलेले..
उत्तर द्याहटवास्वर्गीय अशी ही व्यक्तिमत्वं झाझेनवर येऊन रमलेली, तिथं स्वरदरबार भरलेले हे केवढं भाग्याचं!
या स्वर्गीय व्यक्तिमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
The more you are empty, the more you receive.
उत्तर द्याहटवाSo apt....
झाझेन कुठं आहे???
सूर तिथंच रेंगाळणार......
संजू बरोबर या झाझेनला .
हटवाश्रद्धा आणि सुमन शब्दागणिक आणि वाक्यगणिक अर्पण केले आहेस. त्यांच्या aura ला अगदी समरस होऊन सर्वांपर्यंत पोहोचवले आहेस. नतमस्तक होऊन आम्हीहि या सुमनांजली त एक पाकळी अर्पण करतो.
उत्तर द्याहटवाशब्दरूपी मैफिलीने तु या महान गायकाला जी श्रद्धांजली वाहिली आहेस ती केवळ अप्रतिमच नाही तर वाचताना अनेकदा निःशब्द व्हायला होते. पुर्वजन्मीच्या पुण्याईनेच अशा थोर व्यक्तींचा सहवास लाभतो. 🙏
उत्तर द्याहटवाखरंच दैवी स्वर! भावपूर्ण श्रद्धांजली.
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय हो..!
उत्तर द्याहटवा..असं म्हणावं तरी डोळे भरून येतात..
राजन राजस सात्विक स्वर हरपला..
पुन्हा राजन या देहस्वरूपी न होणे..!
राजनजींची माझी भेट दोन वर्षांपूर्वी सोलापुरात भेट झाली होती. पंधरा मिनिटे आमच्या गप्पागोष्टी झाल्या होत्या..
व्वा. अप्रतिम. काळजाला स्पर्श केला अगदी.
उत्तर द्याहटवाआतड्यातून आलंय सारं... भावस्पर्शी
उत्तर द्याहटवाKharach o madam kiti lucky ahat tumhi .. .. Ani tumche varnan tar ase, ki sagle agdi samor jasechya tase ubhech rahile .agadi bhainna bhetlya sarkhe vatatey.sundar... ...
उत्तर द्याहटवाअद्वितीय कलाकारांना अप्रतिम शब्दात श्रद्धांजली!!
उत्तर द्याहटवासीमा, तू भाग्यवान आहेस!
Thank you all
उत्तर द्याहटवाबरेच जणांचे नाव कळत नाही . नाव इमेल द्यावा please
उत्तर द्याहटवाकेवळ शब्दतीत आहे सर्वकाही.. खूप सुंदर.
उत्तर द्याहटवा-आशिष शिंदे.
सातारा