सरता पाऊस त्याची आठवण म्हणुन दंवथेंबांची नक्षी मागे सोडुन गेलेला असतो.अचानक कधीतरी त्या दंवथेंबात पोपटी अलवार प्रतिबिंबं थरथरायला लागतात.झाडात,पानात,मनात पोपटी स्पंदनं उमटायला लागतात.
कवी नलेश पाटीलांची एक कविता आहे,
"झाडांच्या मनात जाऊ,पानांचे विचार होऊ।. . .
पोपटी स्पंदनासाठी, कोकिळ होऊन गाऊ. . . "
तीच ही पोपटी स्पंदनं!
हे पोपटी दिवस असतात भारावून टाकणारे! मुळात भारत हा रंगविविधतेचाही देश आहे.प्रत्येक प्रांताचे स्वत:चे असे रंग आहेत. महाराष्ट्राचेही विशेष मक्तेदारी असलेले रंग आहेत.अंजिरी,गुलबक्षी ,नारिंगी,राणी,बैंगणी,कोनफळी,अबोली. . . . .कितीतरी. . पोपटी हा त्यातलाच एक अस्सल देशी-गावरान रंग. . . . सरत्या हेमंतापासूनच, वसंताच्या , चैत्र पालवीच्या चाहुलीने सह्याद्रीचे घाटमाथे,देश,कोकण या पोपटी रंगात माखून निघतात.खरंतर मराठी मनात हा पोपटी रंग एका कोपर्यामधे असतोच असतो. . मधे मधे लसलसत्या नाजूक कोंबा सारखा मान वर काढुन अस्तित्वाची जाणिव देत रहातो.
महाराष्ट्राचा एक पोपटी रंग आहे तसा एक पोपटी फ्लेवरही आहे . . पोपटी वास आणि चव आहे.
दिवाळीनंतर अगदी फेब्रुवारी, मार्च पर्यंतच्या रात्री म्हणजे मस्त मुलायम पांघरुन घेण्याच्या, गार वारा लपेटून घेण्याच्या, शेकोटीच्या उबेच्या. हे दिवस हुरडा पार्टीचे, भरीत पार्टीचे,मोग्याचे,शेंगसोल्याचे,ऊंधियू चे पण रात्री मात्र पोपटीच्याच!
हीच ती महाराष्ट्राला विशेषतः कोकणाला-- अपरान्ताला ,पोपटी फ्लेवर देणारी पोपटी .
रायगड - अलिबाग हे तिचं माहेरघर पण आता पोपटी अख्ख्या कोकणपट्टीत बागडत असते. .डहाणू मध्ये पोपटीला "गड" म्हणतात इतकच.
अलिबागला कामाला म्हणून गेले की नागाव वगैरे समुद्रकिनार्यांवर जायचा नियम तोडून चालतच नाही . तिथं गेल्यावर हमखास "पोपटी लावून मिळेल" अशा पाट्या दिसतात .
पोपटीनं मला कैक वर्षांपासून इतकं पिसं लावलं होतं .एरवीही पोपटी रंग मला खाणाखुणा करून हाकारतच असतो, पण ही"पोपटी"ही किती तरी वर्षं साद घालत होती .या जानेवारीत शेवटी गाडी काढून मी आणि माझी तनुजा नावाची मैत्रीण ...... दोघींनी कोकण गाठलंच .माझे मित्र अॅड. विलास कदम आणि सौ. स्नेहा कदम असले चोचले पुरवायला नेहमीच तयार असतात.
आमचा आमचा पोपटी उत्सव उत्साहाने ठरवला . पोपटीचा संभार तसा भरपूर असतो . एक पक्कं भाजलेलं खणखणीत मातीचं कोरं मडकं , भरपूर खडेमीठ, भरपूर ओवा .तिखट आणि कोकणी मसाला. तूर ,वांगी, बटाटे ,गाजर, कांदे,शेवग्याच्या शेंगा ,कणगरं आणि मांसाहारी पोपटी हवी असेल तर कोंबडी आणि अंडी. मुख्य म्हणजे कडव्याच्या शेंगा हव्यात . कधी कधी फ्लॉवर ,मटार घालतात .
पोपटी लावायची तर पावटय़ाचा पाला आणि विशेषतः भांबुडर्य़ाचा पाला हवाच . दंवाच्या भरोशावर पोसलेला भांबुर्डा , बांधावर, भात खाचरात, ओसाड रानात , या दिवसात मुबलक मिळतो. भांबुर्ड्याचे औषधी गुण आहेत पण एक विशिष्ट देशी स्वादही आहे.पोपटीसाठी भांबुर्ड्यांचे झुडूप मुळासकट उपटून वापरायचे असते .रानोमाळ फिरून भांबुर्डा जमवला. मुरुडला एका जणांच्या शेतात जाऊन पावट्याचा पाला मिळवला .सरंजाम तर जमा झाला.
मडकं बसेल असा खड्डा जमिनीत खणून तयार होता . पोपटी लावण्यासाठी सुका पालापाचोळा, चगळ, नारळाच्या शेंडय़ा, झावळ्या ,काटक्या कुटक्या यांचं जळण गोळा करून झाले. हा उद्योग पार पाडता पाडता संध्याकाळ कधी सरून गेली ते कळलंही नाही .
पोपटी लावण्याचा एक विशिष्ट विधी असतो .मुळात मडकं ,भांबुर्ड्यांच्या पाला धुऊन घ्यायचाच नसतो. मडक्यात तळाशी भांबुर्डा आणि पावटय़ाचा भरपूर पाला अगदी कुचून भरायचा .चांगलं मूठ मूठ खडे मीठ आणि ओवा त्यावर मारायचा. मग भाज्या मांडायच्या. वांगी, बटाटे, कणगरं, यात मसाला भरून घ्यायचा आणि शेंगांना मसाला चोळून घ्यायचा . पुन्हा भांबुर्ड्यांच्या पाला ,पावटय़ाचा पाला. प्रत्येक थरानंतर खडे मीठ आणि ओवा हे ध्रुपद मात्र चोख हवंच. मग पाच सहा तास मसाला लावून मुरवलेल्या कोंबडीच्या तुकड्यांचा थर द्यायचा . सगळ्यात शेवटी अंडी घालायची.अंडी सोवळीच. ती काही मसाला वगैरे अंगाला लावून घेत नाहीत .आता उरला सुरला मसाला घालून, पुन्हा पावटय़ाचा पाला आणि भांबुडर्य़ाचा पाला इतका दाबून भरायचा की मडकं उलटं केलं तरी आतले जिन्नस बाहेर डोकावता सुद्धा नये.वाटलं तर पाल्याला अटकाव करण्यासाठी ,दोन तीन काटक्या उभ्या आडव्या लावायच्या. मडक्याच्या मानेजवळ !मडक्यात पाला दाब दाबून नाही भरला तर मडकं फुटू शकतं.सगळं शिस्तीत भरून झालं.
खड्ड्यात जळणात्मक वस्तू भरून त्यात मडकं उलटं ठेवलं. आजूबाजूने पुन्हा नारळाच्या शेंडय़ा, कवट्या, झावळ्यांचे तुकडे लावले.चगळ पेटवून "पोपटी लावली "
.
आता पाऊण तासांची निश्चिंती.पोपटीचा तेल -पाण्याशी काडीचाही संबंध नसतो. भांबुर्डा आणि पावटय़ाच्या पाल्याची ,पाण्याची वाफ (moisture)धरुन ठेवण्याची क्षमता जबरदस्त आहे . पोपटी लावायची म्हणजे चक्क" दम" लावायचा. दम बिर्याणीचा लावतात तसाच. पदार्थ शिजवण्याची ,धुरावण्याची ही पारंपारिक पद्धत आहे. यात न्यूट्रियंट लॉस अजिबात होत नाही. स्वाद आतल्या आत मुरत रहातो. दमा दमानं प्रक्रिया होत रहाते. परिणामी जो thermal inertia असतो त्यामुळे कोंबडीचे तुकडे ,अगदी मटण सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत शिजते.
पोपटी म्हणजे एक माहौलच असतो . ती तयार होईपर्यंत गावमातीचा, धुराचा वास,शेकोटीची ऊब अनुभवायची आणि शिवाय गप्पा गाण्यांचा तडका . पोपटी लावल्यावर हळूहळू ताव जाणवायला लागला होता. आणि त्याबरोबरीने गप्पांचा ही ताव वाढत चालला .भांबुर्ड्याची ,गोरखमुंडी ,बडथोला,कोंबडा ही नावं पदरात पडली. भांबुर्ड्यांला नागोठणे भागात भामरुड म्हणतात .विशिष्ट प्रदेशातल्या फळांची- भाजीची एक विशिष्ट चव असते , जसं नागपूरची संत्री, कृष्णाकाठच्या गोट्याची वांगी ,तसंच तिडी गावच्या कडव्याच्या शेंगा असतील तर पोपटीची चव, आणखीच न्यारी .
पोपटी हा शब्द किती सर्वस्पर्शी, सर्वव्यापी आहे .सह्याद्रीच्या कड्यांवर" पोपटी "नावाची एक रान वनस्पती आढळते .Nicandra physalodes .या पोपटीची फुलं अगदी नाजूकसाजूक, गुलाबी जांभळसर रंगाची असतात .आणि सुकलेली फळं सुद्धा ड्राय डेकोरेशनसाठी एकदम भन्नाट !
पोपटी रंग ,पोपटी झाड तशी 'पोपटी 'भाषाही आहे . "माया " या आदि धर्माच्या - ethnoreligion पाळणार्या Ethnic identity असलेल्या आणि जगभरात केवळ लाखभर लोकसंख्या असलेल्या जमातीच्या भाषेचे नाव "पोपटी"आहे .विणकरांचीही एक" पोपटी-पोपती"असते .धागे विणतानाची ही एक अवस्था !
पोपटी म्हणजे बार्बेक्यूचा देशी आविष्कार ! बार्बेक्यूचं स्पेलिंग आणि मूळ, याविषयी बराच गोंधळ, दावे प्रतिदावे आहेत .स्पेन ,अमेरिका असे बरेच देश बारबेक्यु आमचंच असं छातीठोक सांगतात.पण खरं म्हणायचं तर या प्रकारे अन्न शिजवण्याच्या परंपरेची मुळं आदीम काळाशी जोडलेली आहेत. कुणा एका देशाची, संस्कृतीची ती मक्तेदारी होऊच शकत नाही. आदिमानव शिकार करून आणलेलं आख्खं डुक्कर, हरीण अगदी" From beard to tail" भाजून खायला शिकला तिथपर्यंत या परंपरेची मूळ पोचतात .
कॅरेबियन टायनो इंडियन्स (Taino Indians)ही जमात आहे .या जमातीचे लोक पवित्र अग्निकुंड पेटवून त्याचा वापर करून भाजून ,धुरावून पदार्थ बनवायचे. त्यासाठी टायनो शब्द आहे "Bara bicy" .कोणी म्हणतो बार्बेक्यू या शब्दाचं ,परंपरेचं हे मूळ आहे .तर कोण म्हणतं "Barbacoas"या शब्दावरून बार्बेक्यू ची उत्पत्ती झाली . Barbacoas म्हणजे लाकडी रॅक .त्याचा वापर भाजण्यासाठी ,धुरावण्यासाठी केला जायचा.
ख्रिस्तोफर कोलंबस जेव्हा जगप्रदक्षिणेला निघाला तेव्हा त्याला एक बेट सापडले .त्याने त्या बेटाचं नामकरण हिस्पॅनियोला(Hispaniola) असं केलं. या बेटावरचे लोक ओल्या जळणांचा वापर करून मांस शिजवत . त्यामागचा उद्देश, अन्न आणि जळण, जळून राख होऊन जाऊ नये , अन्न धुमसून धुमसून शिजावं, हाच होता. हा Indirect flame चा वापर. अशाप्रकारे धुरावून वाळवून मासे ,प्राणी टिकविण्याची त्यांची परंपरागत पद्धत होती. लोकसंस्कृतीचे पदर एकमेकींशी कुठं तरी जुळलेले असतात. पोपटी करताना ओला भांबुर्ड्याचाआणि पावटय़ाचा पाला वापरण्यामागे हेच तर तत्त्व आहे .
पोपटी शिजत आल्यावर पोपटीचा धुरकट -मातकट, मसाला मिश्रीत दरवळ जाणवायला लागला .तसं वाट पाहण्याचा पेशन्स संपला. पोपटी शिजली का हे पाहण्याचेही एक तंत्र आहे .वेळ साधारण पाऊण तास तर लागतोच पण पाण्याचा हलका शिपका मारला की एक विशिष्ट आवाज येतो. यावरून जाणकारांना पोपटी शिजली हे कळतं.
आता पोपटीचं मडकं विस्तवातून उचलून घ्यायचं आणि अंथरलेल्या मोठ्या वर्तमानपत्रावर किंवा कापडावर पोपटी काढायची . आख्ख्या मडक्यातली पोपटी बाहेर आल्यावर क्वान्टिटी पाहून माझा जीव खरं म्हणजे दडपला होता.पण आता एकमेकांना घ्या म्हणण्याची शुद्ध ,सवड सुद्धा भुकेमुळं आणि पोपटीच्या वासामुळं नव्हती. आदिम परंपरेशी इमान राखून ,दोन्ही दोन्ही हातांची आणि तोंडाची गाठ पडली .बघता बघता फन्ना उडाला. भांबुर्डा- ओव्या मुळं पोपटी कितीही खाल्ली तरी बाधत नाही. भांबुर्ड्याच्या पाल्याचा आणि ओव्याचा संमिश्र धुरकट वास आणि त्यातली मातकट वासाची लकेर आणि चव म्हणजे केवळ स्वर्गीय सुख ! पोपटी चाहुलीनं नादावलेलं मन या पोपटी दिवसाच्या साक्षीनं,पोपटी मनसोक्त खाल्ल्यावर , पोपटी चवीनं कुठं जरा थार्यावर आलं. .








कोकणी मेव्याची टेस्ट एकदा घ्यायला हवी
उत्तर द्याहटवापोपटीची चव खासच असते. अनेकदा खाल्ली तरी मन भरत नाहीच. आम्ही आमच्या खारघरच्या टेरेसवर अनेकदा पोपटी केली आहे.
उत्तर द्याहटवासातऱ्यालाही पोपटी केली आहे. माझी पत्नी अलिबागची असल्याने पोपटी लावण्याचा तिचा हातखंडा आहे.
पोपटीच्या अनेक व्हेरिएशन करून खाल्ल्या आहेत. कोंबडी, मटण, मासे एक ना अनेक.
आपल्या कडे जसा हुरड्याचा सिझन असतो, जवळपास त्याच वेळेस या भागात वालाच्या शेंगा येतात. या वालाच्या शेंगांचे पोपटीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पोपटीची चव खासच असते. अनेकदा खाल्ली तरी मन भरत नाहीच. आम्ही आमच्या खारघरच्या टेरेसवर अनेकदा पोपटी केली आहे.
उत्तर द्याहटवासातऱ्यालाही पोपटी केली आहे. माझी पत्नी अलिबागची असल्याने पोपटी लावण्याचा तिचा हातखंडा आहे.
पोपटीच्या अनेक व्हेरिएशन करून खाल्ल्या आहेत. कोंबडी, मटण, मासे एक ना अनेक.
आपल्या कडे जसा हुरड्याचा सिझन असतो, जवळपास त्याच वेळेस या भागात वालाच्या शेंगा येतात. या वालाच्या शेंगांचे पोपटीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
ब्लॉग च्या नावाला सजेसे अगदी संमरसुन लिहिले आहेस. अगदी फील आला
उत्तर द्याहटवाthank you
हटवाखूप छान लेख. पोपटी हा फक्त रंग म्हणूनच माहित होता. बाकी सगळी नविनच माहिती मिळाली. धन्यवाद शेअर केल्याबद्दल. 🙏
उत्तर द्याहटवाखूप छान लेख. पोपटी हा फक्त रंग म्हणूनच माहित होता. बाकी सगळी नविनच माहिती मिळाली. धन्यवाद शेअर केल्याबद्दल. 🙏
उत्तर द्याहटवाक्या बात है
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती मिळाली. पोपटी बद्दल मला माहिती नव्हती. सगळे छान वर्णन केले आहेस. अभिनंदन!!
उत्तर द्याहटवामी शाकाहारी आहे हो मॅडम. एकदम गोड्या नैवेद्यातला.
उत्तर द्याहटवा