बुधवार, २ जून, २०२१

केसरिया म्हारो देस




    टेसूल







अमलताश                                 किंजळ



जेव्हा कोयनेच्या दऱ्याखोऱ्यातून, कोकण पट्ट्यातून, पश्चिम घाटातून ,किंजळ फुलायला लागतात  तेव्हा इतर कोणालाही फुलायला सरेआम बंदी असते.  मी आणि मीच फुलणार! हा ऋतू माझा . . . . हा माझा बहर  !

दळदार पाकळ्यांचे किमयागार किंजळ नजरबंदी करायला लागतात आणि बरसत्या मृगधारांपासूनची वाढती हिरव्या पोपटी रंगाची मिजास उतरायला तिथूनच तर सुरूवात होते . रक्त वर्णाच्या असंख्य आणि अपरिचित छटांचे वैभव दाखवण्याचे कसब किंजळाचेच!
किंजळापाठोपाठ दर्‍याखोर्‍यातून ,नदीकाठांवर लाल केशरी रंगवर्षा बरसायला लागते  .बहराला आलेला पळस ,पांगारा ,लालसर किरमिजी कोवळी कोवळी पालवी अंगभर ल्यायलेली पायर, अवचित दिसणारी काैशी !  शहरी मनाला अँन्थुरियमच्या फुलाचं अप्रूप वाटतं. पण एखादी फुललेली लाल केशरी पलाश पताका तशीच नजर खिळवून ठेवते  .या पलाश फुलांच्या पाकळीचा पोपटाच्या चोची सारखा बाक आणि चुटुकलाली पाहूनच संस्कृतमध्ये पलाश वृक्षाला "किंशुक" म्हणून नावाजले  आहे.
या पळसाला माळव्याकडे  टेसूल म्हणतात  .माळव्याच्या जंगलात फुललेल्या पळसाकडे --टेसूल बनाकडे--पाहून कुमारजींना अतरंगि  एक बंदिश सुचली. 

टेसुल बन फुले रंग छाये
भंवर रस लेत फिरत मदभरे
अरे रसलोभीया हमें ना तरसावो
पीया जो परदेसा जरत मन मेरो

फुललेले टेसूल बन पाहून  मन  अनावर आनंदाने बहरून येतेच पण कुमारजींची   बागेश्रीतली ही बंदिश  अवर्णनिय   - अनाकलनिय आनंदात  घुसमटुन टाकते.  . बहर सोसावे का स्वर सोसावे?

आग ओकणार्‍या सूर्याची तलखी कमी करण्यासाठी  पळस, पांगार्‍याच्या जळत्या ज्वाला रानोमाळ फडकत असतात . सोनमोहोर, पळस ,पांगारा ,सावरी  या फुल्लार वृक्षांची  मांदियाळीच जमलेली असते . या फुलांना , वृक्षांना त्यांच्या  सौंदर्य बिंदूची जाणीव पुरेपूर असते  .
या फुल्लार वृक्षांकडे पाहून  जयश्री अंबादास यांची एक कविता हमखास आठवते.

रंग सोहळा झाडांचा
नेत्र अनिमिष झाले
दृष्ट नका लावू कोणी
झाड वयात आले

हळू हळू माळरानं पिवळी पडत जातात .सरत्या हेमंतात पानगळीवर अलगद रक्तवर्णी छटा पसरत जातात . कुसुंबी, डाळिंबी, गुलाबी ,केशरी ,लक्षलक्ष छटांचे झिरझिरीत थर माखले जातात . पश्चिम वाहिनी नद्या   सप्तरंगी ,तप्तरंगी दिसायला लागतात  .
याच दिवसात हलक होऊन उठणार्‍या मातीच्या लोटांआडुन रानोमाळ रामेठ्याचे चिमुकले पिवळे दिवे लुकलुकायला लागतात .एरवी तर तसेही, जाईजुईचे नखरे प्रत्येकाने सोसलेले असतात .मोगरा ,मदन बाणाने प्रत्येक काळीज कधी ना कधी घायाळ झालेलं असतं. अवचित सामोर्‍या येणार्‍या रातराणीच्या दरवळाने घुसमट झालेली असते. पण कोकण पट्टय़ाच्या, पश्चिम घाटाच्या पायवाटांवर, दुतर्फा   फुलारलेल्या करवंदीच्या  नाजूकसाजूक मदमस्त शुभ्र फुलांचा जाळ्या, या सगळ्या गारुड्याला पुरून उरतात  .
हे दिवस झाडाची, फुलाची नाळ तोडुन   अवकाशाकडे झेपावणार्‍या, वार्‍यावर तरळणार्‍या, सुगंधाचे. .सुवासाचे. . परिमळांचे.  दरवळांचे. .   अदृश्याचा साक्षात्कार  घडवणारे.
या  सगळ्या अलवार  केशरी आसमंताला एक सोन झळाळी येते अमलताशामुळे  . बहाव्यामुळे  . .  सगळ्या आसमंताला एक ठहराव येतो.  हा सोनमोहोर बंगाली लोकांचाही खूप आवडता आहे . ती  बंगाली लोकांची "सोनाली "आहे  अमलताशाच्या सोनचवर्‍या ,तो राजवृक्ष  असल्याची ग्वाही देतो.

आता नदी - नाल्यांचे सुकण्याचे दिवस जवळ येत चाललेले असतात
या  ओढय़ांना,ओहळांना ओलांडत, न थकता चालत राहायचं,पश्चिम वाहिनी नद्यांच्या उगमांच्या दिशेने !.पाल्या पाचोळ्यातून वाट काढताना मात्र जरा अदबीनेच.

पाॅंव सूखे   हुए पत्तोंपे जरा अदबसे रखना
धूपमें मांगी थी पनाह कभी इनसेभी. . .

ही जाणिव ठेवायचीच.

नद्या झऱ्यांच्या उगमाजवळ असंच आणखी एक मोहजाल पसरलेलं असतं.  शुभ्र अलवार पाकळ्यांचा कसाबसा तोल सावरणारा कर्पूर डोलारा. पाकळ्यांची चुणीदार मलमली पोत आणि पुष्प मध्यातून अनावर उसळुन उठणारे  कंच जांभळे केसर!  सह्याद्रीच्या करंद काळ्या कातळांवर, कड्यांवर कबरींच्या (कपॅरिस स्पिनोसा) महिरपी सजलेल्या असतात .केसरीया रंग आळवायचो भान यांनाही असतेच.  केशरी काटे सावरत पलाश -पांगार्‍याशी इमान राखून असतात  .
पानगळीला दाद न देता फुलून आलेला आसमंत पाहून मग असंख्य सावरीचे रोम रोमही फुलून येतात  .
शिवर, सावर ,शाल्मली, किती नावाने तिला हाकारवं. किती तर्‍हांनी तिनंही सजावं. नुकतीच उभारी धरलेल्या लाल लसलशीत कोंबांपासून ,कापूस होऊन स्वत:ला वाऱ्यावर  बेभान उडवून देण्याच्या पायरीपर्यंत या सावरींना निशब्द अनुभवावं. नाही तर मग सकाळच्या सोनसळी उन्हातल्या सावरीच्या नखर्‍यापासून सांजवेळी  पर्यंतच्या श्रांत ,अंतर्मुख होत जाणार्‍या सावरी निहाराव्या . नद्यांच्या काठाकाठाने तर अशा फुलतात की पुन्हा असा बहर असेल, नसेल !किती फुलू, किती उमलू अशा अधिरलेल्या!
याच सावरी चढत्या - तापत्या उन्हात, घायाळ होत जातात ,जिव्हारी घाव बसल्यासारख्या! रडून रडून लालसर झालेल्या डोळ्यांसारखे  दिसतात शाल्मलींचे ते आरक्त म्लान झुबके!दुपारभर सावरीच्या वेदनांनी पेटून उठलेले नद्यांचे ओघ कलत्या उन्हासरशी रुजू लागतात. अशा वेळी सावरीच्या आडुन सूर्याकडे पाहिलं तर त्याच सावरी  लखलखतात अग्निशिखांसारख्या किंवा निळ्या आकाश झिलई वर लाल नक्षत्र पुंजांसारख्या.  मावळतीचा आणि सावरींचा रंगोत्सव, एकाचवेळी वरचा षड्ज लावतो आणि अंतर्यामी सुरू होतो एक अनाहत नाद ? याच कातरवेळी एखादी निशब्द साद नादावते. मोहरला बावरल्या सावरीच्या साक्षीने  आकाशालाही नशा येते .शामका मंझर पाहून वाटते आसमाॅंभी शराब पिता है। 
फुलतात तेव्हा इतक्या अनावर फुलतात या सावरी की तेव्हा या सावरींच्या नादाला सावलीही लागत नाही. फुलून संपल्यावर  सावरींनी ढाळलेल्या रक्त पुष्पांचे रुजामे पाहायचे असतील तर कोयनेच्या काठाकाठाने भरकटत जावं.  अंतिम वेळी, प्राजक्ता सारख्याच अलगद उतरतात सावरी तरु तळीच्या मातीवर .अगदी देठांना ही  न दुखावता ! आणि विसावतात स्वत :च्याच नादात.  
सावरीच्या अस्तित्वाने
आसमंत होतो रक्तबंबाळ
एक म्लान ग्लानी चराचरावर
एकाकी वारा भटकतो रानोमाळ
संपत येतात जसे   दिवसांचे - ऋतूंचे प्रहर
आपणच न्याहाळते मग मूकपणे
ढाळलेली रक्त पुष्पे
प्रत्येक सावर  


©Adv Seemantini Noolkar

 



२० टिप्पण्या:

  1. किंजळ, अमलतास फूलांप्रमाणेच सुंदर लिखाण.

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर माहिती दिली आहे.बहावा म्हणजे अमलताश मला माहित नव्हते.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान, नेहमीप्रमाणे लिहिलं आहेस.

    उत्तर द्याहटवा
  4. खूप सुंदर छायाचित्रे आणि वर्णन!

    उत्तर द्याहटवा
  5. शब्दांमधून त्या सुंदर देखाव्याचं दृष्य नजरेसमोर उभं रहातंय.

    उत्तर द्याहटवा
  6. खूपच छान. जणू नयनमनोहर दृश्य पाहतोय, असे वाटते.

    उत्तर द्याहटवा
  7. आजची सकाळ केसरिया झाली .......��������

    उत्तर द्याहटवा
  8. अतिशय अभ्यासपूर्ण, रसिक आणि वाचनीय वर्णन !! खूप सुंदर !!

    उत्तर द्याहटवा
  9. घरात बसून कोयनाकाठची सफर घडवलीत,खूप खूप धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  10. खूप सुंदर लेख. पूर्वी कराडहून चिपळूणला जाताना रस्त्याकडेला अशी असंख्य झाडे दिसायची. त्याची आठवण झाली.

    उत्तर द्याहटवा
  11. खुप छान निसर्ग वर्णन...एक पिंड असतो ना...प्रत्येकाचा.निसर्गावर मनापासून प्रेम करणा-या पारखी नजरेलाच हा सोहळा नजरेस पडतो...जाणवतात झालेले बदल. मात्र त्यासाठी पारखी नजर आणि त्याबरोबरच संवेदनशील मन ही असावं लागतं.तेव्हाच अशी रानभूल पडते, शहरांत चौकातल्या कोप-यात फुललेला बहावा लक्ष वेधून घेतो, एखाद्या बंगल्यामागची सावर साद घालते, रस्त्यावर पसरलेली गुलमोहराची लाली पाहून क्षणात मान वर जाते...ती बुंद श्रीमंती बघायला.ही निसर्गाची जादू मला ही अशीच भुरळ घालते.असा सुंदर लेख मग वाचनात आला की... मन, "सावर रे" म्हणत झुलू लागतं.

    उत्तर द्याहटवा
  12. अप्रतीम,फारच सुंदर,समर्पकभाषा
    मस्त वाटलं

    उत्तर द्याहटवा
  13. अप्रतीमंआणि सुंदर वर्णन डोळ्या समोर ते वर उभे रहाते

    उत्तर द्याहटवा
  14. फारच सुंदर वर्णन.रंगीबेरंगी फुलांची बोलकी सफर घडवली.खूप छान! शब्द नाहीत वर्णन करायला.

    उत्तर द्याहटवा