रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

निळे घाटमाथे निळ्या राउळांचे


 निळे  घाट माथे..... 




  



करिमकुरिंजी



पश्चिम घाटाच्या, दक्षिण टोकाची १५०० मी उंचीची सदाहरित पर्वत राजी म्हणजे नीलमलाई – शोला ग्रासलँड…! “शोला”चा एक अर्थ छाया आणि दुसरा अर्थ आहे वसंत ऋतु .शोला मधली वृक्षराजीची कॅनोपी  इतकी घनदाट आहे की सूर्यकिरणांना अजिबात खाली झिरपू देत नाही ,शीतल छाया देत रहाते आणि शोलामध्ये वसंत ऋतु नेमाने अवतरत रहातो.या शोलामध्ये, नीलमलाईमध्ये, विशेषत: एराविकुलम नॅशनल पार्क, अन्नामलाई, अगाली हिल्समध्ये दर बारा वर्षानी नीलकुरींजी बहरते॰ हे  नीलकुरिंजीचे माहेरघर ! 
केरळला २०१८ साली पावसाने अक्षरश: धुवून काढले होते. एयरपोर्टही पाण्याखाली गेला होता. नेमकं दर बारा वर्षानी फुलणार्‍या, नीलमलाईला नील वर्ण बहाल करणार्‍या नीलकुरिंजीच्या पुष्पबहराचे हे वर्ष. नीलकुरिंजीच्या निळ्या निळ्या कळ्या पांघरून पहुडलेला,  नीलकुरिंजी अंगोपांगी माखलेला  नीलमलाई मला कोणत्याही परिस्थितीत पहायचाच होता. मध्येच चार सहा दिवसांची उसंत पावसाने दिली, एयरपोर्ट सुरू झाला आणि हायसं  झालं. तातडीने केरळ गाठलं. वाहून गेलेले रस्ते, जागोजाग कोसळलेल्या दरडी …..निसर्गाचे प्रलयंकारी रूप साक्षात समोर होतं.                      

पावसाच्या तांडवात नाजुक साजूक नीलकुरिंजीचे काय झाले असेल, अशी एक धाकधूक मनात घेऊनच गेले. पण नीलकुरिंजी अनावर फुलली होती. नीलकुरिंजी शोलाला वणव्यांपासून वाचवते, मातीची धूप रोखते, आणि नीलमलाईच्या आदिम लेकरांशी तर तिचे जिवाभावाचं सख्य आहेच. अशा या नीलकुरिंजीला, निसर्ग फुलण्यापासून कसं रोखेल? प्रतिकूल परिस्थितीत तगून राहण्यासाठी डावपेच लढवण्याची उपजत किमया वंनस्पतीकडे असतेच.
घंटाकार निळ्या फुलांचा फुलोरा मिरवत नीलमलाई, धुक्यात आबदार पहुडला होता. इतकी अनोखी फुलं आजूबाजूला फुलली होती पण नीलकुरिंजीच्या निळ्यासावळ्या रंगाची, धुक्याची निळी भूल मनाला  पडली होती. ग्रेसची “निळाई” अनुभवावी ती इथेच. खरंचच नीलमलाईवरच्या निळ्या मंदार पाऊल वाटा हाकारत होत्या..

निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाऊल वाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणाला

या वर्षीच्या पुष्पबहराचं वैशिष्ट्य म्हणजे नीलकुरिंजीच्या बहराबरोबर शोला कुरिंजीचाही बहर होता. शोलाकुरींजी दर दहा वर्षानी फुलते आणि नीलकुरींजी १२ वर्षानी. दर साठ वर्षानी दोघींच्या एकत्रित बहराचं वर्ष येतं.  

नीलकुरिंजीच्या उन्मुक्त बहरामागे एक कारण आहे. ती बांबूसारखीच मोनोकारपिक वनस्पति आहे. बांबूला ठराविक वर्षानी एकदाच उन्मुक्त बहर येतो आणि लयबद्ध बीज निर्मिती होते. जणू जन्माची इतिकर्तव्यता होते  आणि बांबू मरून जातो. त्याला “मातम” म्हणतात. नीलकुरिंजीच्या नशिबीही उन्मुक्त बहरानंतरचा, बांबूसारखाच ‘मातम’ असतो. नीलकुरिंजीला म्हणूनच कमाल बीज निर्मितीचा ध्यास असतो.त्यासाठी परागीभवन, पराग हस्तांतरण व्हायला हवे. त्यासाठी नीलकुरिंजी तिचा मधुरसाचा खजिना पणाला लावते. या खजिन्याची सर्वात जास्त भूल पडते ‘एपिस सेरेना’या मधमाशीला. नीलकुरिंजीच्या फुलाचा आंतरभाग या मधमाशीच्या स्पर्शाला संवेदनशील असतो. तो स्पर्श होताच नीलकुरिंजी आपला पराग खजिन्याचा भार रिता करते. मधुरस आकंठ पिऊन, परागकणाची भेट स्वीकारून मधमाशी पराग हस्तांतरणाच्या मार्गाला लागते.या सगळ्यात स्वपरागीभवन होऊ नये याची काळजीही कुरींजीपुष्प घेते. हा सगळा एक रंगमंचीय आविष्कारच असतो.ही प्रक्रिया जशी आश्चर्यात टाकते तसच नीलकुरिंजीला तिच्या बहराचं नेमकं वर्ष कसं  समजतं ,हेही एक आश्चर्य आहे.वनस्पतींची स्वत:ची अशी एक कालमापन यंत्रणा असते. 
नीलकुरिंजीचे शास्त्रीय नाव स्त्रोबिलॅनथस कुंथिनस. नीलकुरिंजीचा पहिला  बहर १८२६ साली नोंदला गेला. नीलकुरिंजीच्या  जगभरातल्या ४५० स्पिसीस पैकी ४२ केरळमध्येच आहेत .एक पांढरी ‘करीम कुरींजी’ ही केरळमध्ये आहे. आपल्याकडची सह्याद्रीतली कारवी, नीलकुरिंजीचीच बहीण. सह्याद्रीत कारवी अशीच पाच, सात वर्षानी बहरते तेव्हा “नीळ  आली, नीळ  आली’ अशी हाकाटी रानोमाळ उठते.
नीलगिरीत तोडा, मुथुवा, इरूला, बदागा या आदिम जमाती रहातात. त्यांचा देव मुरूगन॰ म्हणजे कार्तिकेय .. या मुरूगन देवाचे फूल म्हणजे नीलकुरिंजीपुष्प. म्हणून त्याला ‘कुरींजी अंदावार’ – कुरींजी देवता म्हणतात.या आदिवासी जमातीच्या  जगण्याशी, प्रेमाशी  नीलकुरींजीचं अनोखं नातं आहे. मुरूगनने वल्ली या आदिवासी कन्येशी लग्न केलं ते कुरिंजीमाला घालूनच ! या जमातीचं वय मोजण्याचं परिमाण नीलकुरिंजीचे बहर असतात॰ एखाद्याने नीलकुरींजीचे किती बहर पाहिलेत तितके त्याचं वय..! वयच नव्हे तर पिढ्याही याच प्रकारे मोजल्या जातात.
बाराव्या वर्षी यौवनात पाऊल  टाकणार्‍या नवयुवतीला होणार्‍या  स्त्रीत्वाच्या जाणिवेचा संदर्भ या बारा वर्षानी येणार्‍या बहराशी तोडा जमात जोडते.इतकेच नाही तर अंतिम संस्काराच्या वेळी मृताच्या हातून अनवधानाने नीलकुरींजीच्या फांद्या, फुलं, तोडली गेली असतील तर त्याच्या वतीने क्षमायाचना केली जाते.

नीलकुरींजीच्या फुलांचे,बहराचे धागेदोरे  प्राचीन साहित्यात सापडतात. दुसर्‍या-तिसर्‍या शतकातले तमिळ संघम साहित्य आणि नीलकुरींजी यांचा एक अनोखा रेशीम बंध आहे.

तेव्हा केरळ आणि तमिळनाडू एकत्रित असं तमिलाकम होतं. या तमिलाकमच्या तमिळ संघम साहित्यातली एक अद्भुत काव्य संकल्पना  म्हणजे तिनाई. तिनाई म्हणजे एक काव्यात्म लँड स्केप आहे… म्हटलं तर भौगोलिक म्हटलं तर प्रेमकाव्य.तिनाई जेव्हा स्फुरते तेव्हाचा ऋतु, समय, स्थळ यांचा उल्लेख तिनाई  काव्यात असतो. या पार्श्वभूमीवर, त्या  त्या ऋतुत उमलणारी फुलं, पशुपक्षी,आदिम रिती, देवदेवता अशा सार्‍या गोष्टी तिनाई  काव्यात असतात.या तिनाई प्रेम-प्रणय भावनांशी निगडीत असतात. तिनाई काव्यात कुरींजी, मुलाई, मरुथम, पालाई  आणि नेयतल  तिनाई अशा पाच तिनाई आहेत. मुलाई तिनाई म्हणजे तमिलाकममधली वनं, जंगलं जी प्रेमिकांची एकमेकांची आतुरतेने वाट पाहण्याची जागा.मरुथम म्हणजे पिकाऊ जमीन —प्रेमिकांच्या लाडिक कुरबुरीची जागा.नेयतल म्हणजे तमिलाकमचा विस्तीर्ण समुद्र किनारा.. विरहाचे प्रतीक! पालाई तिनाई म्हणजे दूरत्व सांगणारा  तमिलाकमचा वैराण प्रदेश.कुरींजी तिनाई म्हणजे मिलनाचे मनोहारी स्थळ.या प्रत्येक तिनाईचे एक फूल आहे. कुरींजी तिनाईचं फूल अर्थातच नीलकुरींजी. नीलकुरींजी मीलनाचा सांगावा देण्यासाठीच फुलते.
कर्नाटकातही सांडूरू हिल्समध्ये नीलकुरींजी फुलते आणि कर्नाटक संगीतात एक कुरींजी रागही आहे. नीलकुरींजीच्या या भरजरी वारशाची जाण म्हणून भारत सरकारने एक पोस्टल स्टॅम्पही काढला आहे.

केरळ मधला एकमेव अजेंडा नीलकुरिंजी हाच होता. डोंगर रांगातून फिरत मनसोक्त नीलकुरिंजीचा बहर अनुभवण्याचं अमाप सुख लुटलं.
नीलकुरिंजीचा निळासावळा रंग मनाला एक असीम शांती देत होता. ,अलगद ‘पैल’ घेऊन जात होता .ऑस्कर वाइल्ड म्हणतो, रंग हजार तर्‍हानी आत्म्याशी संवाद साधतात. नीलमलाईमध्ये अथांग पसरलेल्या नीलकुरींजीचा  नीळवर्ण हीच अनुभूति देतो.ही अनुभूति शब्दात मांडता येणंच शक्य नाही. ज्ञानेश्वरांच्या शब्दातच सांगायचं तऱ…..

नीळवर्ण रजे नीळवर्ण बुझे I
निळीमा सहजे आकारली II
नीळप्रभा दिसे नीळपणे वसे I
निळीया आकाशे हारपले II
निळेपण ठेले निळीये गोविले I
केवळ आणि केवळ अलौकिकाची अनुभुती. अलौकिकाचा अलवार स्पर्श.
नीलमलाईच्या पर्वतराजीतून  वहात येणार्‍या निळ्या वार्‍याचा स्पर्श, नीलकुरींजीचा निळा सावळा असर यापुढच्या आयुष्यात सतत अखंड सोबत रहाणार आहे.

–  ©️ अ‍ॅड. सीमन्तीनी नूलकर




पूर्व प्रसिद्धी        http://maitri2012.wordpress.

१२ टिप्पण्या:

  1. राजश्री यशवंत देशपांडे सातारा.११ ऑक्टोबर, २०२० रोजी ७:५८ PM वाजता

    अतिशय सुरेख उत्तम माहिती
    सिमंतिनी प्रत्यक्ष केरळमध्ये जाऊन आलो तुझ्या मुळे
    फुलाबददल इतकी माहिती वाचून कधी एकदा तिथं जातेय
    असं झालं.मनापासून धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. सीमा, अत्यंत अभ्यापूर्ण लेख ....
    खरंच, हा बहर बघायची उत्सुकता आहे ....

    दीपा

    उत्तर द्याहटवा
  3. कसलं भारी आणि क्यूट लिहीलेय मॅडम ! ओहो हो ! अफलातून करिमकुरींजी आणि तुमचे लिखाण ! ओघवते . उत्स्फुर्त !

    उत्तर द्याहटवा
  4. एखाद्या वनस्पती शास्त्रज्ञाने लिहावे इतका अभ्यासपूर्ण लेख आहे. लिखाण आणि छायाचित्रे एकदम अप्रतिम आहेत.
    केरळ या आधीही फिरून आलो आहे पण कधी काळी ते तामिळकम होते हे माहीत नव्हते. भौगोलिक प्रेमकाव्य तिनाई हा काव्यप्रकार प्रथमच ऐकायला मिळाला.
    आम्हाला तुमचा हेवा वाटतो. एवढ्या प्रेमळ नजरेने तुम्ही निसर्गाला पाहाता म्हणूनच तोही कदाचित अधिक उत्कटतेने तुमच्यासमोर सादर होत असावा आणि असे सुरेख वर्णन करण्याची प्रेरणा तुम्हाला देत असावा.

    उत्तर द्याहटवा
  5. अप्रतीम सीमा...
    उत्कट आणि अभ्यासपूर्ण! 🙏🏼💐

    उत्तर द्याहटवा
  6. फारच सुंदर वर्णन. नीलमय करणारं!

    उत्तर द्याहटवा
  7. अभ्यासपुर्ण लेख, अप्रतिम निसर्ग सौंदर्य

    उत्तर द्याहटवा
  8. आतापर्यंत या खजिन्याची माहितीच नव्हती, दुर्लभ दर्शन करून दिल्याबद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  9. अतिशय सुंदर भाषा...! माहितीपूर्ण लेख. वाचकांना पुर्ण
    लेख वाचण्याची उत्सुकता, उत्कंठा पकडून ठेवण्याची ताकद आपल्या लेखणीत आहे.

    उत्तर द्याहटवा