चिखलाचा रेशीमकाला
ताई ,तुला हौस ग कशाची ? .......
दादा मला हौस रे भात लावणीची ...........
पाऊस त्याच्या बरोबर भटकंतीची सुरसुरी घेऊन येतो .त्यातही कोकणातला पाऊस , निसर्ग भटकंतीला नव्या नव्या दिशा देतो .हिरवे हिरवे डोंगर ,कोसळणारे धबधबे ,पाण्याने दुथडी भरलेल्या नद्या ,या साऱ्यातून कोकण खुणावत असतो. या सोहळ्यात एक गोष्ट कायम लक्ष वेधत आली आहे. ती म्हणजे पाण्याने भरलेली भाताची खाचरं!याच भातखाचरांनी, भात लावणीसाठी एका आषाढात मला निवळीला ओढूनच नेलं.
लावणी पाहायला आलेला पाहुणा
उंबर कोंबडीचा नैवेद्य
राखणदाराच "देणं
ताई ,तुला हौस ग कशाची ? .......
दादा मला हौस रे भात लावणीची ...........
पाऊस त्याच्या बरोबर भटकंतीची सुरसुरी घेऊन येतो .त्यातही कोकणातला पाऊस , निसर्ग भटकंतीला नव्या नव्या दिशा देतो .हिरवे हिरवे डोंगर ,कोसळणारे धबधबे ,पाण्याने दुथडी भरलेल्या नद्या ,या साऱ्यातून कोकण खुणावत असतो. या सोहळ्यात एक गोष्ट कायम लक्ष वेधत आली आहे. ती म्हणजे पाण्याने भरलेली भाताची खाचरं!याच भातखाचरांनी, भात लावणीसाठी एका आषाढात मला निवळीला ओढूनच नेलं.
चिपळूण -सावर्ड्या जवळचं निवळी हे गाव. निवळीचे खोत सुर्वेंचा निवळीत दीड दोनशे वर्षांपूर्वीचा भारदस्त घरंदाज वाडा आहे आणि समोर पसरलेली पाण्याने भरलेली भाताची खाचरे. भातलावणीचा अनुभव घेण्यासाठी ,मन अगदी ओढाळ ओढाळ होऊन गेलं .
लावणीसाठी स्थानिक लोक आले होते.
तरारलेल्या भाताच्या तरुंची आधी मूठ उचलायची होती आणि मग लावणी .तीन -तीन ,चार -चार वेळा नांगर फिरवून मऊसूत झालेला चिखल साद घालत होता आणि दूर झाडीमध्ये पावश्या "पेरते व्हा, पेरते व्हा" म्हणून पुकारत होता .काही कळायच्या आत चिखलात कधी उतरले ते कळलंच नाही .
खोतांची शेतकी विद्यालयात शिकणारी नात बाबूही चिखलात उतरली. तिचे भाऊ, चुलत भाऊ यांची चिखलात कुस्ती रंगली होती .आम्हाला चिखलात उतरलेलं पाहून ,इंद्राक्का खुशीखुशीनं मूठ कशी उचलायची ते शिकवायला सरसावली. मूठ उचलायची म्हणजे भाताच्या रोपांची गड्डी बांधायची. बांधण्यापूर्वी मुळांचा चिखल खाचरातल्या पाण्यातच खंगळून काढायचा आणि त्याच मुठीच्या पात्यांनी सगळ्या रोपांना एकत्र गाठीत कवळायचे. गाठ इतकी अलवार की लावणी करते वेळी एका हाताने नुसती वर सरकवली की रोपे सळकन मोकळी. उत्सव मधला रेखाचा सोनसळी पोशाखच आठवला .एक किळ काढता क्षणी सरकन मोकळा होणारा.
भाताचे वाण कुठले ते माहीत नव्हते .तिथल्या कारभार्यानी सांगितले की ते "एक काडी"बियाणे आहे. म्हणजे सरकारी बियाणे .एक काडी बियाणाची रोपे लावताना एकेकच तरु ,एका ठिकाणी लावायचे. स्थानिक देशी वाण असेल तर तीन चार किंवा जास्त रोपेही एका जागी लावता येतात..इंद्राक्का म्हणाली ,"एक काडीचे पीक फावतां , इतर फावत नाय"
"घट लावा, घट लावा "असे खोतांनी बजावून सांगितले होते .घट लावा म्हणजे विरळ नको. अंगठा उघडलेल्या मुठीच्या अंतरावर तरु लावायचे .पुन्हा लावण्याचेही विशिष्ट तंत्र.जरा तिरकेच लावायचे. तरु स्वतःच्या बळावर जीव धरून रुजून उभे राहायला हवे .स्वत:च्या अस्तित्वाचा झगडा स्वत:च द्यायला हवा ,असे साधे सोपे गणित .
पाऊस मेहेरबान होता .लावणी करण्यासाठी आवश्यक तेवढा झाला होता आणि लावणीच्या वेळी हवा तसा ब्रेकही त्याने घेतला.हवे तितकेच भिजायचा आनंदही लुटू दिला .
मुठी उचलून झाल्या .बांध भाताच्या मुठींनी सजले ..कारभाऱयांनी तोपर्यंत पुन्हा पुन्हा नांगर फिरवून चिखलाचा रेशीमकाला केला होता. रांगोळी काढण्यापूर्वी रांगोळीचे ठिपके काढावे तशा रोपांच्या मुठी खाचरात पटापटा मांडल्या गेल्या .
ज्या शिवारात लावणी करायची त्यांच्या राखणदाराचे देऊळ एका कडेला होते .तिथे लावणीच्या पहिल्या दिवशी उंबर आणि कोंबड्याचा नैवैद्य. उंबर म्हणजे पिकलेल्या फणसाच्या पेस्टमध्ये ,तांदळाची पिठी घालून केलेले टम्म वडे. शिवाय "देणे "म्हणून एक अंडेही ठेवले गेले. हे देणे ज्याचे असते त्याचा तो नंतर घेऊन जातो.या श्रद्धा का अंधश्रद्धा या घोळात शिरण्यात मजा नाही. हा मनाचा निष्पाप पणा आणि कुठेतरी असलेल्या विश्वासाचा भाग इतकेच .
प्रत्यक्षात विचार केला तरी पिकावर आलेल्या शेतावर चौफेर लक्ष ठेवणे अवघडच एकूण.म्हणून मग राखणदाराला साकडे घालून, त्यांच्या भरवशावर सोडायचे. कुणी चोरी मारी करायचे म्हटले तर त्याला या राखणदाराचा धाक असतोच .
अशा पारंपारिक रिवाजांना डावलायचे तर राखणीला बिनखर्ची तोलामोलाचा पर्याय काय देऊ शकतो, हा प्रश्न उरतोच .या रिवाजामुळे कोणाचे नुकसान नसते, हे लक्षात घ्यायला हवे .सब घोडे बारा टक्के नसतात हे जाणवले.
पहिला टप्पा पार पडेतो ,वाड्यातून न्याहारीची दुरडी आली. तांदळाच्या भाकरीची चवड,चटणी आणि कोलीम! हातावर भाकरी ,भाकरीवर चटणी आणि कोलीम. वरून पाऊस रायाची पाखर!
चिखलात बरबटलेले हात धुवून ,भाकरी खावी असा विचार होता. विहिरीतले पाणी काढून हात कोपरापर्यंत धुवत असताना मागून ऐकू आले," काय लग्नाला जायचे हाय काय कोपरा पतुर हात धुताव म्हुन इचारला". म्हटलं असो. रोमला गेल्यावर रोमन लोकांसारखे वागावे तर कोकणात गेल्यावर तिथल्या शेतकऱ्यांसारखे का नको ?
काही कसर राहू नये म्हणून काठोकाठ भरलेल्या विहिरीत तांब्या बुडवून वरचे पाणी बाजूला केल्यासारखे करून पाणीही प्यायलं.
न्याहारीनं चांगलीच तरतरी आली .जोमाने लावणीला लागायचे, तेवढ्यात चिखलात काही तरी सळसळले ."जनावर ,जनावर "म्हणून हाकाटी झाली. छोटं पिल्लूच पण बेणं फडा काढायला कमी करत नव्हतं. शेवटी एकाने पकडून लांबच्या बांधावर सोडून दिलं.
मध्येच पायात काहीतरी हुळहुळुन जायचे .इंद्राक्काला विचारले तर म्हणाली ," किरव्या गो ".किरव्या म्हणजे खेकडे .किरव्यांची पिल्ले तुरू तुरु इकडे तिकडे तिर्रकी तिरकी पळत होती .तेवढ्यात एक मोठीशी किरवी इंद्राक्काने पकडून तिला उचलुन, तिच्या पोटाचा फ्लॅप उघडून दाखवला. "बघ बाय, हिने पिल्ले सोडली हां. पोट मोकळाच असता."कणाकणाने ज्ञानात भर पडत होती .
आणि गंमत म्हणजे रोपे लावताना एकाग्रता साधत होती मेडिटेशन, मेडिटेशन म्हणजे तरी काय वेगळे असते? तना -मनात भरलेला हवासा गारवा, चिखलाचा मऊसूत बाळ स्पर्श, डोळ्यांना सुखावणारी हिरवाई ,कानावर पडणारे पाखरांचे आवाज, पानांच्या सळसळीचे आवाज. .सभोवतालच्या गदारोळातही मनाला तरल शांतता अनुभवायला येत होती .
"मैं ऐसे जमघटमें खो गया हूं
जहां मेरे सिवा कोई नहीं है "
असं आणि इतकच वर्णन त्या अवस्थेचं करता येईल.
आता कोकणी गाण्यांचा रंग चढत चालला.
." हरिश्चंद्र बोले तारामतेला (म्हणजे तारामतीला)
मी जातो शिकारीला."
गाण्यातला हरिशचंद्र शिकारीला गेला आणि तारामती माहेराला .शिकार काही मिळाली नाही .मग तो घरी आला.अंघोळ केली .जेवला आणि झोपला. झोपेत त्याला काळ्या पेटीतला नाग डसला .शेवटी हरीशचंद्र मरून गेला .शेवटी त्या तारामतीचे काय झाले हे त्या कवीलाच ठाऊक .मी काव्य ऐकून अवाक.
तोच "बोलवा माझ्या दादाला, बोलवा "असे नवे गाणे सुरु झाले . वेगवेगळ्या आवाजात ,सुरात.मध्येच एखादा टिपेचा सूर .दादाला कशाला बोलवा,किती वेळा बोलवा, हे काही कळेना. हसून हसून पुरेवाट. चिखलात लोळायची बाकी होती .
मग पुढचं गाणं...." ताई तुला हौस ग कशाची ? ....... दादा मला हौस रे बांगड्यांची
ताई तुला हौस ग कशाची ? ....... दादा मला हौस रे साखल्यांची
ताई तुला हौस ग कशाची ? ....... दादा मला हौस रे टिकल्यांची "
शेवटी दागिने संपले . मग मी सूर लावला
"दादा मला हौस रे भटकायची "
दादा मला हौस रे भात लावणीची "
मग पुढचं गाणं...." ताई तुला हौस ग कशाची ? ....... दादा मला हौस रे बांगड्यांची
ताई तुला हौस ग कशाची ? ....... दादा मला हौस रे साखल्यांची
ताई तुला हौस ग कशाची ? ....... दादा मला हौस रे टिकल्यांची "
शेवटी दागिने संपले . मग मी सूर लावला
"दादा मला हौस रे भटकायची "
दादा मला हौस रे भात लावणीची "
कमरेत वाकून रोपे लावता लावता एका क्षणी मनात विचार चमकला ,उद्या काही खरे नाही. वाकलेले कंबरडे काही सरळ व्हायचे नाही .पण गुडघा गुडघा चिखलात, वरून पाऊस पडत असताना, वाक -वाकून रोपे लावूनही, दुसऱ्या दिवशी काही म्हणता काही झाले नाही. कदाचित चिखलात इकडून तिकडे चालत जाण्याचा योग्य व्यायाम कारणी लागला असावा.पाठदुखीवाल्यांसाठी रोज अर्धा तास कमरेइतक्या पाण्यात चालण्याचा व्यायाम आवर्जून सांगतात, तसा किंवा मड थेरपी जिंदाबाद !
लावणी संपता संपता 'मडबाथ' झाला होता. माझ्या सर्वांगाला लागलेला चिखलाचा लेप बघून इंद्राक्का फिदी फिदी हसत होती ."माझ्याकडे पाह्य बाय . . चिकूल दिसतो लुगडय़ाला?" खरोखरच तिच्या लुगडय़ाला कणभर चिखल लागलेला नव्हता . तिचा फंडा सोपा होता .घरी जाऊन तिलाच लुगडे धुवायचे होते.म्हटल्यावर काळजी स्वाभाविकच होती.कसून नेसलेले लुगडे आणि वरुन टाॅवेल गुंडाळायचा.विषय संपला.पण मला मड बाथची खूप मजा आली.
तोपर्यंत अजून एक ज्ञानात भर पडली.दिवस दिवस गारठ्यात उभे राहून लावणी केली तर कधी कधी पायाला इतक्या मुंग्या येतात की थांबता थांबत नाहीत.त्यावर उपाय एकच. . पायाला डुकराची चरबी चोळायची.लगेच मुंग्या थांबतात. मी आवंढाच
गिळला.नशीबाने तशी वेळ काही आली नाही.
गिळला.नशीबाने तशी वेळ काही आली नाही.
भात लावणी झाल्यावर उंबर कोंबडीचा बेत सगळ्या लावणीकारांसाठी होता.खोतांच्या हसतमुख लेकीसुनांनी दिवसभर खपून जेवण बनवले होते.
खोतांचे वय ७० च्या पुढेच होते पण सगळे जेवल्याशिवाय त्यांनी तोंडात घास घातला नाही.हा मायेचा आेलावा आता अभावानेच दिसतो.
अमाप कष्ट उपसणार्या निसर्ग पुत्रांबरोबर जाणिवपूर्वक काढलेला हा दिवस अविस्मरणिय आठवणी मनावर कोरुन गेला.
© अॅड. सीमंतिनी नूलकर
भाताच्या तरुची मूठलावणी पाहायला आलेला पाहुणा
उंबर कोंबडीचा नैवेद्य
राखणदाराच "देणं
"
छान,माहितीपूर्ण आणी ओघवता...
उत्तर द्याहटवालॉकडाऊन मधे बरं कोकणात जाऊन आलात?
Khup chan anubhav
उत्तर द्याहटवाखरंच छान अनुभव शेअर केलात.तुमच्यासाठी ती वेगळीच अनुभूती देणारी घटना होती. चिखलराड भात खाचरांत दिवस घालवणे सोप्पी गोष्ट नाही.बारकाईने केलेलें टिपण वाचणारा चिंब होईल इतके चपखल आहे.
उत्तर द्याहटवाडॉ सुधाकर बेंद्रे
मस्त अनुभव, खरच कंबर घाईला येते :)
उत्तर द्याहटवाखूपच छान तुमच्या लेखनामुळे माझ्याही ज्ञानात भर पडली, भात लागण तुम्ही केलीत पण लेख वाचताना मी ही सहभागी असल्याचा अनुभव आला.
उत्तर द्याहटवाएकदम हटके सीमा..भातलावणीचा अनुभव आणि त्याचे रसभरीत वर्णन वाचताना live commentary ऐकल्याचा भास झाला...
उत्तर द्याहटवासीमा...भातलावणीचा अनुभव एकदम हटके.त्याचे रसभरीत वर्णन वाचताना आपणच मडबाथ घेतो आहे असं वाटले...उंबर छान लागत असेल...कोंबडी..जाऊ देत..आपला प्रांत नाही तो..
उत्तर द्याहटवाअप्रतिम, स्वतः भात लावणी करतोय असे वाटले
उत्तर द्याहटवाखुपच छान गं,,, अगदी मीच लावणी करते आहे असा feel आला,,,,,
उत्तर द्याहटवानिर्मितीचा हा सोहळा शब्दफुलांनी सजला
उत्तर द्याहटवाखूप छान
हा लेख भातखाचरातला रासवट गंध घेऊनच आला असं वाटलं वाचताना. आपल्या लिखाणामध्ये निसर्गाबद्दलची अत्यंत असोशी शब्दोशब्दी जाणवते.
उत्तर द्याहटवालेखामधल्या अनेक जागांवर क्षणभर थबकायला होतं, तिथल्या अवकाशाचा प्रत्यय देतं....
'मन अगदी ओढाळ ओढाळ होऊन जाणं...' , 'रोपाच्या मुठीची अलवार गाठ...', ही वाक्यं एकदम भन्नाट.
तसंच 'तरु जरा तिरकेच लावायचे. तरु स्वतःच्या बळावर जीव धरून रुजून उभे राहायला हवे .स्वत:च्या अस्तित्वाचा झगडा स्वत:च द्यायला हवा ,असे साधे सोपे गणित.' , नैवेद्य आणि राखणदाराचं देणं या बाबीतून ग्रामीण शहाणीव आणि भाबडेपण नेमकं टिपलंय.
'हातावर भाकरी ,भाकरीवर चटणी आणि कोलीम. वरून पाऊस रायाची पाखर! ' हे लई आवडलं!
चिखलाचा रेशीमकाला, सोबत हे सगळं अवकाश टिपणारी छायाचित्रं आणि 'दादा, मला हौस रे भातलावणीची' यांनी मन अगदी स्पंदित, गंधित होऊन जातंय...
आपल्या पुढच्या लेखांबद्दल उत्सुकता आहे.
🌹🌹🌹🌿🍃
Mam u r great, ur all experience r very nice and gave proper information and knowledge.
उत्तर द्याहटवाCandid
उत्तर द्याहटवा