शनिवार, २७ जून, २०२०

काजुल्याचे झाड

                                काजुल्याचे झाड

 एकदा असंच मोसमी पावसाच्या आधी, मे महिन्याच्या शेवटी-जूनच्या पहिल्या आठवड्याच्या सुमाराला, महाबळेश्वरवरुन अंधार पडता पडता सातार्‍याला येत होते.मेढा-केळघर घाटात दर्‍याखोर्‍यातून झाडांवर चिमुकले दिवे लुकलुकताना दिसायला लागले.एखाद्या कार्यक्रमाची पूर्वतयारी चालू असते तेव्हा दिव्याच्या माळा कुठे सोडायच्या , लावल्यावर कशा दिसतील, याची चाचपणी चालू असते,उत्साही मंडळींची लगबग चालू असते, तसा काहीसा माहौल होता . कुठेतरी एखाद्या झाडावर काजव्यांची प्रकाश लकेर दिसता दिसता विरून जात होती.कुठे शेकोटीतल्या निखर्‍यावरून ठिणग्या उसळाव्या तशा उसळत होत्या."काजुल्यांची झाडे"बहराला आलेली होती॰ कोकणात काजव्याना लाडाने  'काजुले'म्हणतात   आणि काजव्यांनी लगडलेली झाडं म्हणजे "काजुल्यांची झाडे"॰

 रात्र चढता चढता वाहतूक कमी होत गेली तशा काजव्यांच्या झुळकांवर झुळका याला लागल्या. मिट्ट काळोख, ओथंबलेलं आभाळ आणि गार वारा--हळू हळू नीरव शांततेनं आसमंताला घेरून टाकलं आणि आतिषबाजी  रंगात आली." सिंक्रोनाईज्ड फ्लॅशिंग "सुरू झालं.काजव्यांचे cलुकलुकण्याचे पॅटर्न वेगवेगळे असतात."सिंक्रोनाईज्ड फ्लॅशिंग" हे दक्षिण आशियाचे वैशिष्ट्य आहे..वार्‍याचा जोर कमी आला की फ्लॅशिंगला ऊत यायचा.काजव्यांनी झाडं धरली होती.एकेक झाड झपकन पेटायचं-विझायचं.कुठे घोळक्या घोळक्यांनी performance चालू होता, कुठे सोलो!

रानवाटांवर दोहीकडेला अनार लावल्यासारखे वाटतेय म्हणेपर्यंत उल्का पडताना दिसते तसा एक अकेला काजवा दरीत झेपावत हाराकिरी करताना दिसत होता. डोळ्यांपुढे काजवे चमकण म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर असा काजव्यांचा दीपोत्सव पहायलाच हवा.एका पुलावरचं झाड तर काजव्यांनी इतकं बहरलं होतं की,चहूअंगांनी फिरूनही समाधान होईना . Bird's eye view तर शक्य नव्हता. Worm's eye view तरी घेऊ म्हणून पुलाच्या कठड्यावर आडवं पडून दृष्टीसौख्य घेतलं. 

जे नजरेसमोर घडत होतं ते कॅमेर्‍यात पकडण्याला अर्थ नव्हता .ज्यांना कॅमेर्‍यात पकडायचं ते एकतर लुकलुकत, भरारत होते आणि फोटोत तो मस्त गार वारा ,जंगलाचा वास, आकाशाची गोलाई ,निळाई काहीच येणार नाही. 

मान्सून पूर्व काळ हा काजव्यांच्या प्रियाराधनाचा काळ.अवघा 8/15दिवसांचा.या काळात नर काजवे लुकलुकत इकडे तिकडे भरार्‍या मारत मादी काजव्यांना हेरायचा, आकर्षित करून घ्यायचा प्रयत्न करत असतात. पूर्वमोसमी हवा काजव्यांच्या romance ला मानवते.एखादी पावसाची हलकी सर येऊन गेली असेल तर नजारा काही औरच असतो. काजवा ही चीजच अशी आहे की प्रत्येकाच्या लहानपणीच्या आठवणींच्या कुपित काजवा असतोच.प्रत्यक्ष पाहिलेला आणि परिकथेतला सुद्धा !तामिळनाडू जवळच्या कोसवनपालयम सारख्या खेड्यातली मुलं बाटलीत काजवे भरून त्याचा जादुई दिवा टांगून प्रकशाच्या खेळाची मजा लुटतात तर इंग्लंड अमेरिकेतली मुलं nursery rhyme म्हणतात,
 
Lady bug, fly away home 
 Your house is on fire
 Your children will burn'
 (हे बडबडगीत किंवा Humpty dumpty , Rock a bye baby, Jack and Jill, बालगीतं असून त्यात कुणी तरी पडलं, गडगडत आलं, असे विध्वंसक विचार का असा एक जाता जाता प्रश्न आला मनात). 

 देश कुठलाही असो काजवा हवाच . देशोदेशी काजव्याना वेगवेगळी नावं आहेत..संस्कृत मध्ये त्यांना खद्योत म्हटलय तर कुठे त्याला इंद्राचा गुराखी म्हणतात . चीन मध्ये तो फुलपरी(Flower Lady) म्हणवतो तर इराण मध्ये त्याला' गुड न्यूज' हा किताब बहाल आहे. काजव्यांवर म्हणी तर खूप मजेदार आहेत."काजवे स्वतः पुरता प्रकाश देतात" अशी नकारात्मक दृष्टीकोन असलेली म्हण आहे तर "काजवे उडत असतात तेव्हाच प्रकाशमान असतात" अशी एक म्हण आहे . जपानी म्हण आहे की,"गाणारे सीकाडा ( एक प्रकारचा कीटक )तग धरून रहातात पण अबोल बिचारे काजवे जाळून खाक होऊन जातात." 

 काजव्यांची सामान्य माणसाला तशी कमीच माहिती असते.काजवे का लुकलुकतात, केव्हा लुकलुकतात , त्यांचा काही उपयोग आहे का या बद्दल सहसा माहीत नसतं. खरं तर काजवा शेतकर्‍यांचा मित्र! कीड नाशक (pest control) म्हणून अत्यंत उपयुक्त. दूरदूरच्या खेड्यापाड्यात , जिथं वीज पोचलेली नसायची तिथल्या रात्री या काजव्यांच्या जादुई दिव्यांनी प्रकाशमान केलेल्या आहेत , ते वेगळंच! 

 काजव्यासारखं चमकण, समुद्रीजीवांमध्ये, प्रवाळामध्ये, एकपेशीय प्राण्यांमध्ये आढळतं पण या अलौकिक देणगीला सरपटणारे प्राणी,पक्षी, सस्तन प्राणी, मुकलेत.या काजव्यांच्या अंड्यांचीही गम्मत असते. ती एखाद्या बशीत गोळा करून दोन दिवस निवांत जागी ठेवायची.अंधारात बशीवर हलकी टिचकी मारली आणि तरंग लहरी उमटवल्या की ती अंडीही लुकलुकून प्रतिसाद देतात. घाट रस्ता उतरता उतरता चार दोन प्रकाश थेंब जवळच्या बाटलीत गोळा केले .घाटाची वळण ओलांडत गेल्यावर आणखीच नवल समोर आलं.रस्त्याच्या दुतर्फा थोड्या थोड्या अंतरावर जमिनीवर प्रकाश थेंब सांडलेले दिसत होते पण स्थिर प्रकाश होता. रस्त्या कडेला fluroscent रंग लावलेले पथदर्शक असतात तसे!काजवे जेव्हा जखमी होतात किंवा कोळ्याच्या जाळ्यात अडकतात तेव्हा त्यांची लुकलुक थांबून ते स्थिर प्रकाश फेकत रहातात. हे तसच काही असावं का? पण इतक्या प्रमाणात आणि ते ही रस्त्यालगत?अंधारात त्यातलाच एक दिवा उचलून बाटलीत ठेवला. थोड्या वेळाने पाहिले तर एकच प्रकाश थेंब राहिला होता ...स्थिर प्रकाश फेकणारा. टॉर्च टाकून पहिले तर दचकायला झाले, तो स्थिर प्रकाश फेकणारा म्हणजे एक 2/3 सेमी लांबीचा किटक होता . शेपटीच्या टोकाला दोन दिवे आणि मध्ये एक कळेल न कळेल अशी रेघ.अंधारात तो उचलला होता खरा पण उचलण्यापूर्वी आकार पाहिला असता तर हात थबकलाच असता. पण लुकलुकणार्‍या काजव्यांच्या मानाने त्यांची संख्या तशी कमीच होती. मादी काजवे होते का काय कळेना. मादी काजव्यांत संथ निवांतपणा होता आणि त्या लुकलुकण्याची तसदीही घेत नव्हत्या . बिचारे नर काजवे मात्र लुकलुकून,मादी काजव्याना आकर्षित करण्यात हैराण! आशियातल्या समस्त प्राणी वर्गातल्या समस्त स्त्री वर्गाची response न देण्याची खासियत असते का काय? या चपट्या काजव्यांनी माझी वाट मात्र सजवली होती. 

 रात्र चढत गेलेली कळलीच नाही. काजव्यांनी अगदी वेडंपिसं करून टाकलं होतं.टेकवलीच्या अलिकडचं वळण तर कळसाध्यायच होता.रस्त्यालगत तीन झाडांनी गोलाकार फेर धरला होता . माथ्यावर त्यांच्या पाना - फांद्यांचा पसारा आणि मध्ये आकाशाचा चतकोर. त्या तिन्ही झाडांना पानांऐवजी काजवेच आले होते. झाडं पेटून उठली होती. कधी हे झाड तर कधी ते झाड.आणि अचानक आकाशातली अभ्रं दूर झाली आकाशाचा चतकोर चांदण्यांनी लखलखला . आणि कधी काळी ऐकलेली कविता आठवली . कुणाची ते नाही आठवत.

 'आकाशीचे तारे, सागरी प्रतिबिंबीत होती 
 किंवा आकाशी हे होती सागरीचे मोती 
 खरा कोणता सागर यातील वरती की खाली
 खरे तसे आकाश कोणते 
 गुंग माती झाली'

 इथं सागर नव्हता पण चांदणभरले आकाश वरती की खाली हा संभ्रम नक्की होता. 

 © Adv Seemantini Noolkar

१७ टिप्पण्या:

  1. शिवाजी अतिशय सुंदर वर्णन असं काही डोळ्यासमोर घडत आहे असेच वाटले. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील चिंचणी जवळ पाच किलोमीटर अंतरावर आमचे शेत आहे. अभी सुट्टीला दिवाळीमध्ये शेतावर आठ ते दहा दिवस जात असून लहानपणी त्यावेळेला चिंचणी ला वडिलांच्या सुलतान कडे संध्याकाळी आम्ही जेवायला जायचं जेवण झाल्यानंतर रात्री चिंचणी ते आमचे शेत हा पाच किलोमीटरचा प्रवास आई-वडील आणि आम्ही तीन भावंडे करत असून त्या रात्रीच्या अंधारामध्ये पूर्ण रस्तावर झाडांवर काजवे काजवे असत आम्ही त्या काजव्यांच्या प्रवासातच तू पाच किलोमीटरचे अंतर वाढत असून तो तासाभराचा प्रवास अतिशय संस्मरणीय आहे अजूनही दिवाळी आठवली डोळे मिटले की तो प्रवास आणि ते काजवे डोळ्यासमोर येतात
    माझा जन्म आणि माझे संपूर्ण आयुष्य कोयनानगर येथे गेले कोयनानगरला तर काजव्याची झाडेच झाडे आहेत आणि काजव्याची झाडे पाहायला कोयनानगरला अजूनही पर्यटक येतात परंतु अलीकडच्या काळामध्ये पूर्वी पेक्षा ते प्रमाण खूपच कमी झाले आहे
    तुमच्या या ब्लॉग मुळे मला माझ्या बालपणीच्या आठवण जागी झाली पुन्हा एकदा लहान झाल्यासारखे वाटले धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. तुला मोहवलेल्या काजुल्यांचे प्रवाही वर्णन. मला काजुल्या हा शब्द खूप आवडला.

    उत्तर द्याहटवा
  3. आ हा ! शब्द पण काजव्यांसारखे चमकाताहेत आणि फेर धरताहेत !

    उत्तर द्याहटवा
  4. बालपणीची आठवण आली,काजवे पकडून बाटलीत ठेऊन निरीक्षण करत बसायचं.बालपणींच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद... सुंदर लेखन...



    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान व माहिती पूर्ण.. बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला...

    उत्तर द्याहटवा
  6. सीमाताई खूपच सुंदर वर्णन, काही क्षण मीही तिथेच आलेय आणि काजवे पाहतेय असे वाटले.

    उत्तर द्याहटवा
  7. आपल्या इथं जवळपास हा प्रकाशसोहळा होतो हे वाचून खूप छान वाटलं, एवढे दिवस माहिती नव्हतं याची खंतही वाटली.. अद्भुत प्रकाशाची वाट दाखवलीत त्याबद्दल आभार.. ज्या शब्दात हा अपूर्व सोहळा वर्णिला आहे त्याने उत्सुकता वाढली, तेवढी थोरवी तुमच्या शब्दात आहेच

    उत्तर द्याहटवा
  8. आपल्या इथं जवळपास हा प्रकाशसोहळा होतो हे वाचून खूप छान वाटलं, एवढे दिवस माहिती नव्हतं याची खंतही वाटली.. अद्भुत प्रकाशाची वाट दाखवलीत त्याबद्दल आभार.. ज्या शब्दात हा अपूर्व सोहळा वर्णिला आहे त्याने उत्सुकता वाढली, तेवढी थोरवी तुमच्या शब्दात आहेच

    उत्तर द्याहटवा