शुक्रवार, १९ जून, २०२०


आमि एक जाजाबोर 

जाजाबोर म्हणजे जिप्सी ...फिरस्ता ..प्रवासी..स्थलांतर करणारा .जाजाबोर हा आसामी शब्द आहे ॰बंगाली भाषेत जाजाबोरला 'यायावर' म्हणतात.

प्रत्येक माणसाच्या मनात एक जिप्सी दडलेला असतोच .स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांची आणि जाजाबोरची मानसिकता एक सारखीच असते .एका ठराविक काळानंतर अनुकूल हवामान, खाद्य यांची निर्माण होणारी गरज आणि पिल्लांना उडण्याचे -जगण्याचे ज्ञान देण्याची गरज , पक्ष्यांत एक अस्वस्थता निर्माण करते आणि स्थलांतराची उर्मि, त्यांना पंख पसरून झेप घ्यायला लावते.थोड्या खोल अर्थाने जाजाबोरचेही तेच असते .ठराविक काळानंतर नवीन जीवनानुभव  घेण्यासाठी , नव्या वाटा त्याला हाकारायला लागतात.नवे रस्ते, नव्या जगाची ओढ अनावर होते. 

अट्टल जाजाबोर ओळखायला अवघड नसतो. त्याची जिंददिली,खुशमिजाजी त्याच्या चेहर्‍यावरून, डोळ्यातून, देहबोलीतून छलकत  असते.तो कुठेही कसाही मिळून मिसळून जातो .जाजाबोर कुठेही गुंतत नाही .फिरस्त्यांशी सख्य जुळायला तर त्याला अजिबात वेळ लागत नाही  आणि निरोप घेतानाही  त्याची पावलं अडखळत नाहीत.अनाम, अनोळखी अनाघ्रात वाटांकडे  त्याची पावलं आपोआप वळतात॰

जाजाबोर रूळलेल्या वाटेवर रमत नाही .स्वतः च्या वाटा तो स्वतः रेखतो.पण जाजाबोरच्या फिरस्तीला एक लक्ष्य असते . त्याची फिरस्ती म्हणजे त्याचा स्वतः च शोध घेणं असतं ..एक अंतर्यात्रा असते.

जाजाबोर ही एक वृत्ती आहे.... उन्मुक्त, उत्कट , स्वछंदी ....ही वृत्ती म्हणजेच आवारगी . आवारा म्हटलं की उनाड , 'आवारा कहींका' असं काहीसं मनात येतं . पण गुलजारजी म्हणतात आवारगी म्हणजे  'आवारा कहींका'  नाही तर 'आवारा कहींका नही ' .

आवारा,आवारगी हे शब्द सहसा नकारात्मक अर्थाने वापरले जातात. पण  मोहसिन नक्वींची गझल ",ये दिल ये पागल दिल मेरा.....आवारगी" ,आवारगी मधली   romanticity  सांगते.आवारगी म्हणजे स्वत:त रमणे...to be with  oneself.

नक्वींसाब म्हणतात , अशी एखादी शाम ...शब असते ...कुणीतरी अनाम, अचानक हाकारतं..... 

"कल शब मुझे बेशक्ल की आवाजने चौंका दिया

मैने पूछा तू कौन है?

उसने कहा .... आवारगी "

मग त्या आवारगीचं काही ऐकून ...समजून घ्यावसं  वाटतं...हम लोग तो उक्ता गये कुछ   अपनी सूना  आवारगी .

जाजाबोर जरी स्वतः त रमलेला असतो तरी त्याच्या मनात एक अस्वस्थता, हुरहूर असते..एखादी वार्‍याची झुळूक मग त्याला हळूच विचारते 'काय होतय तुला?

'एक अजनबी झोंकेने  जब पूछा मेरे गमका सबब

सहाराकी भिगी रेतपर मैने  लिखा आवारगी ." काही होत नाहीय...आता वेध लागलेत.. नव्या दिशांचे ...नव्या वाटांचे...ती ही हुरहूर आहे.

जाजाबोरचा जीव अशा ठिकाणी अजिबात रमत नाही जिथे  स्वत:त रमण्याला  गुन्हा मानलं जातं  आणि जिथं अशा गुन्ह्याला  शिक्षा म्हणून शिक्का बसतो   आवारगीचा .

"लोगो भला उस शहरमे   कैसे जिये  हम जहा  हो जुर्म तनहा सोचना

लेकिन  सजा आवारगी"

जाजाबोरला त्याच मनोवस्थेत   अचानक स्वप्नात  'तनहा चाँद'  येतो  आणि त्याची उत्तरं त्याला मिळून जातात.तनहा चाँद पाहून त्याला मनोमन उमगतं....आवारगीच माझी फितरत आहे..   आवारगीच मला " रास "येते.

 "कल रात तनहा चांद को देखा था मैने ख्वाबमे 

मोहसिन मुझे रास आयेगी आवारगी "

ही आवारगी काही आजची नाही. काल्पनिकही  नाही.शतकानुशतकं  रक्तात भिनलेली आहे.या आवारगीत रमणार्‍या  जिप्सीना ,जाजाबोरना  "रोमानी "असंही म्हणतात.या रोमानींचं मूळ  भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतातच आहे. रोमानी मूळचे Paleolithic  Hunter  Gatherers.भारतावरच्या सततच्या   आक्रमणांमुळे रोमानीचे तांडे स्थलांतर करत मध्य आशिया, स्लाविया   आणि पूर्व यूरोप , ग्रीस, स्पेन, अमेरिकेचा काही भाग  असे जगभर पसरले..(ती आज एक ethnic  minority  आहे.)

या रोमानींचा   आत्मा ..Gypsy Soul...म्हणजे केवळ एक लय आणि मुक्त संगीताने भारलेला , अनिर्बंध मुक्त स्वातंत्र्याचे गाणे गात रहाणारा  असतो.नित्य बदलणार्‍या निसर्गाशी त्यांची नाळ जोडलेली  असते.त्यातूनच त्यांची जाजाबोर वृत्ती फुलते .  ही जाजाबोर वृत्ती सांसर्गिक असते , मनमुक्त उधळली जाते.

माझ्यात ही असा एक किंचित जाजाबोर आहेच .निसर्गात , रंगात, लोक कलात, लोकसंस्कृतीत  रमणारा. प्रवासाचं, नव्या अनुभवांचं  अनावर आकर्षण ,ओढ असणारा. ते सांगायचं ही असतं .

भूपेन  हजारिकांचे एक आसामी गीत आहे . ते माझ्यासाठी लिहिले असा मला  नेहमी वाटतं .जाजाबोर म्हणजे काय ते उलगडून सांगणारं'

मोई एती जाजाबोर .....आमि एक जाजाबोर ... मी एक फिरस्ता ... a  wanderer.

"मोई एती  जाजाबोर 

धोरार दिहिंगे दीपांगे लोरू 

निबिसारा निजा घोर "

मी एकटाच एकांतात भटकात असतो.

स्वतःचे घर (निजा घोर)असावे अशी ओढ मला कधी वाटलीच नाही.

भूपेनजी  या गीतात म्हणतात ,

'मी मिसीसीपी , वोल्गाचं  सौन्दर्य पाहिलय..

ओटावा , ऑस्ट्रीया,पॅरिसच्या मिठीत मी विसावलोय...

मी वेरूळचा शाही वारसा शिकागो मध्ये मिरवलाय ..

मी दुशानबेच्या मिनारात बसून गालिब ऐकलाय....

आणि मार्क ट्वेनच्या थडग्यावर बसून गोर्की बद्दल गप्पा मारल्या आहेत ....

प्रत्येकवेळी मला जाणवत गेलय  की फिरस्त्यांची   एकमेकांशी  फार लवकर जवळीक होते.

"बारे बारे देखू बाटोर मानुहू आपुन होईसे बोर

झेई  मोई जाजाबोर....(म्हणूनच मला जाजाबोर असणे आवडते )

बर्‍याच भटक्यांच्या भटकण्याला उद्देश नसतो.लक्ष्याविहीन भटकंती असते ...पण माझे तसे नाही . माझ्याकडे काहीएक उद्देश आहे.

"बोहू जाजाबोर लोक्योविहीन

मुर पिसे आसे मात्र पोन"

मी अज्ञातातून जन्मलेल्या रंगांच्या खाणी पहातो..नुसत्या रंगांच्या खाणीच नाही तर निसर्गाची उधळान पहातो ,कलांचे आविष्कार पहातो,गीत संगीत ऐकतो॰

"रोंगोर खोनी जोते देखीसू .."

ते प्रत्यय मला सगळ्यांवर उधळायचे असतात .."भोगोई दियार मौन"

झेई  मोई जाजाबोर....(म्हणूनच मला जाजाबोर असणे आवडते )

मी अनेक गगनचुंबी इमारती पाहिल्या ....

आणि त्यांच्या आडोशाला आसरा घेतलेले गृहविहीन नर-नारी ही पाहिलेत

घरासमोर बहरलेल्या बागा जशा पाहिल्यात

तशाच अवेळी गळुन पडणार्‍या  फूलपाकळ्याही पाहिल्यात 

"आरू देखीस मोरोहो फुलार पापोरी ओकेलाते पोरा झोरी "

आणि माझ्याच देशात , माझी जवळची माणसे परकी होताना  पाहिलीत

म्हणून मी एकेठिकणी फार थांबत नाही, रमत नाही. म्हणून मी एक फिरस्ता ,भटक्या,जाजाबोर...

 झेई  मोई जाजाबोर....(म्हणूनच मला जाजाबोर असणे आवडते )


..आमि एक जाजाबोर ....आमि एक जाजाबोर

 

Adv Seemantini Noolkar


मोई एती  जाजाबोर....भूपेन  हजारिका ..आसामी गीत


१६ टिप्पण्या:

  1. ब्लाॅग सुरू केल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा ��
    आता सगळे लेख एकत्रित पणे वाचायला मिळतील.

    उत्तर द्याहटवा
  2. ब्लाॅग सुरू केल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा ��
    आता सगळे लेख एकत्रित पणे वाचायला मिळतील.

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर कल्पना.
    तुम्ही लिहीत जा एक भटका सहप्रवासी जाजाबोर तुमच्या भटकंती मध्ये सामील आहे.
    खूप खूप शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  4. वाह..जाजाबोर..अगदीच हटके..खुप सहजसुंदर मनापासून तुम्ही लिहिले आहे..तुमचे अनुभव वाचुन आम्हीपण सगळ्यांचा आनंद घेऊ..सुंदर ब्लागसाठी शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  5. ह्या लाॅकडाऊन चया काळात आपण बाहेर फिरणे किती मिस करतोय हे जाणवलं, खूप फिरायची उर्मी निर्माण झाली होती ती लेख वाचल्यावर अजून प्रज्वलित झाली आणि असा मूड झाला की बस बॅग करो और निकल पडो, खूप आवडलं सिमा

    उत्तर द्याहटवा
  6. खुप सुंदर ! भरगच्च माहिती. कुतूहल वाढवणारी सुरूवात!

    उत्तर द्याहटवा
  7. Nice blog...You have expressed your thoughts so well...Superb... absolutely superb...Hearty congratulations

    उत्तर द्याहटवा
  8. जाजाबोर एक वृत्ती आहे... खूपच छान... Waiting your next article

    उत्तर द्याहटवा
  9. Kammal ki hai ye jajabori, jo apane pichhe sabbhiko ghumale. Agala mukam kaha? Hum betab hai......

    उत्तर द्याहटवा
  10. ब्लॉग वरील पहिलाच लेख अत्युत्तम झालाय. मनापासून आवडला. खूप छान लिहिलंय. पुढच्या  लेखाची वाट पहातोय. तुमच्या  " आवारगीला"  सलाम.

    उत्तर द्याहटवा
  11. लेख अतिशय सुंदर आहे. ब्लॉगचे नाव सुद्धा सुयोग्य आहे. आताच वाचायला सुरुवात केलीय. हळूहळू एक एक लेख शांतपणे वाचेन. पहिल्याच लेखाने पुढील वाचनाची उत्सुकता चाळवली आहे.

    उत्तर द्याहटवा