शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

Affair with the season (उंधियु. उंबाडियु)







 


उंधियु  . . . उंबाडियू

आकाशात मुक्त विहरणारे पतंग, उत्तरायण सुरु झाल्याचा सांगावा     घेऊन येतात. .तिळाच्या वड्या- लाडू  , हलव्याने मिट्ट गोड जिभेला  आता चमचमीत, चटपटीत हवं असतं .  मग शेंगसोला, पोपटी, भरित पार्टी, हुरडा पार्टी असं काय काय सुचायला लागतं .मला invariably   उंधियुच्या   आठवणी  यायला लागतात.

त्या त्या सिझन मधे मिळणार्‍या   फळांचा आस्वाद कधीतरी वर्षातून एक दोनदा  घेण्याचे , त्या त्या सिझन मधेच त्या त्या भाज्या  करण्याचं . . . खाण्या- खिलवण्याचं अप्रूप  संपलच आहे जवळ जवळ.पण मला  तसंच आवडतं .वर्षभर मिळत राहिलं तरी सिझनलाच खायचं . आपल्यापुरती गंमत!

खरं तर उंधियूचे वेध नोव्हेंबर संपतानाच लागतात मग लसणाची पात वेळेत मिळावी  म्हणुन लसूण पाकळ्या लावण्याची लगबग!
जांभळा कंद ( गोराडु) ही सहसा मिळत नाही इथे म्हणुन बागेतच लावुन टाकला होता आणि सुरती पापडी मुंबई किंवा पुण्याहून आयात!
उंधियूचा पॅराफर्नेलिया काही कमी नसतो. सुरण, रतालु, जांभळा कंद,बाळ बटाटे (म्हणजे baby potatoes), सुरती पापडी , लिलवा ( तूरीचे दाणे),छोटी गोल वांगी, केळ्याचे तुकडे, गाजराचे तुकडे,ओला हरभरा, अरिया काकडी आणि मेथी मुठिया!
वरुन घ्यायला लसणीच्या हिरव्यागार पातीची चटणी must पण मसाला करताना घातली तर सुरती उंधियुचा रंग साजराच दिसतो.
उंधियूचे तसे तीन प्रकार! सूरती  हिरवागार, काठियावाडी  आणि अमदावाद वाला लाललाल!
उंधियु मसाला  ज्या त्या गृहिणीचं  family secret असतं.
माझं "एक" सिक्रेट म्हणजे
हळदपूड ऐवजी ओली हळद किसून घातली तर मग नहलेपे दहला!भरपूर ओवा , ओलं खोबरं आणि कोथिंबीर  या सरदारांबरोबर  बाकी  लष्कर असतंच.
उंधियू  मटक्यात केला की उंबाडियु!मटक्यात मसाल्यासह भाज्यांचे थर लावून विस्तवात मटका उलटा ठेवायचा. उंधियू म्हणजेच upside down!
कंद, भाज्या, मुठियाचे  थर म्हणजे केवळ भाज्यांचे थरावर थर असं नसतं.  ते थर  गोडव्याचे ,अलवार नाजूकपणाचे, स्वादाचे, जांभळ्या- पिवळ्या- केशरी-हिरव्या अशा रंगवैविध्याचेही असतात.तेलाबरोबर चमचाभर प्रेमही टाकायला लागतं . शास्त्र असतय.
पानजुळी किंवा कंगळीची पानं आणि कुटकीची पानं फक्त स्वादासाठी!खायची नाहीत. पानजुळी म्हणजे phyllanthus reticulatus. . गुजराती भाषेत काम्बोई  आणि कुटकी म्हणजे verbascum chinense. गुजराती भाषेत कल्हार  पानं ! 
  कल्हार , काम्बोई अर्थातच antidiabetic, antiviral, anticancer, antiplasmodial, hepatoprotective, antibacterial and anti-inflammatory   वगैरे वगैरे वगैरे. आणि एकुणातच  उंधियू मधे भरपूर फायबर, भरपूर फायटोन्युट्रियंट्स, अॅंटि ऑक्सिडंट्स  आहेतच.

चलो देर किस बात की!  बाजराना रोटला साथ खाऊ पड से!

© Adv Seemantini Noolkar






बुधवार, २ जून, २०२१

केसरिया म्हारो देस




    टेसूल







अमलताश                                 किंजळ



जेव्हा कोयनेच्या दऱ्याखोऱ्यातून, कोकण पट्ट्यातून, पश्चिम घाटातून ,किंजळ फुलायला लागतात  तेव्हा इतर कोणालाही फुलायला सरेआम बंदी असते.  मी आणि मीच फुलणार! हा ऋतू माझा . . . . हा माझा बहर  !

दळदार पाकळ्यांचे किमयागार किंजळ नजरबंदी करायला लागतात आणि बरसत्या मृगधारांपासूनची वाढती हिरव्या पोपटी रंगाची मिजास उतरायला तिथूनच तर सुरूवात होते . रक्त वर्णाच्या असंख्य आणि अपरिचित छटांचे वैभव दाखवण्याचे कसब किंजळाचेच!
किंजळापाठोपाठ दर्‍याखोर्‍यातून ,नदीकाठांवर लाल केशरी रंगवर्षा बरसायला लागते  .बहराला आलेला पळस ,पांगारा ,लालसर किरमिजी कोवळी कोवळी पालवी अंगभर ल्यायलेली पायर, अवचित दिसणारी काैशी !  शहरी मनाला अँन्थुरियमच्या फुलाचं अप्रूप वाटतं. पण एखादी फुललेली लाल केशरी पलाश पताका तशीच नजर खिळवून ठेवते  .या पलाश फुलांच्या पाकळीचा पोपटाच्या चोची सारखा बाक आणि चुटुकलाली पाहूनच संस्कृतमध्ये पलाश वृक्षाला "किंशुक" म्हणून नावाजले  आहे.
या पळसाला माळव्याकडे  टेसूल म्हणतात  .माळव्याच्या जंगलात फुललेल्या पळसाकडे --टेसूल बनाकडे--पाहून कुमारजींना अतरंगि  एक बंदिश सुचली. 

टेसुल बन फुले रंग छाये
भंवर रस लेत फिरत मदभरे
अरे रसलोभीया हमें ना तरसावो
पीया जो परदेसा जरत मन मेरो

फुललेले टेसूल बन पाहून  मन  अनावर आनंदाने बहरून येतेच पण कुमारजींची   बागेश्रीतली ही बंदिश  अवर्णनिय   - अनाकलनिय आनंदात  घुसमटुन टाकते.  . बहर सोसावे का स्वर सोसावे?

आग ओकणार्‍या सूर्याची तलखी कमी करण्यासाठी  पळस, पांगार्‍याच्या जळत्या ज्वाला रानोमाळ फडकत असतात . सोनमोहोर, पळस ,पांगारा ,सावरी  या फुल्लार वृक्षांची  मांदियाळीच जमलेली असते . या फुलांना , वृक्षांना त्यांच्या  सौंदर्य बिंदूची जाणीव पुरेपूर असते  .
या फुल्लार वृक्षांकडे पाहून  जयश्री अंबादास यांची एक कविता हमखास आठवते.

रंग सोहळा झाडांचा
नेत्र अनिमिष झाले
दृष्ट नका लावू कोणी
झाड वयात आले

हळू हळू माळरानं पिवळी पडत जातात .सरत्या हेमंतात पानगळीवर अलगद रक्तवर्णी छटा पसरत जातात . कुसुंबी, डाळिंबी, गुलाबी ,केशरी ,लक्षलक्ष छटांचे झिरझिरीत थर माखले जातात . पश्चिम वाहिनी नद्या   सप्तरंगी ,तप्तरंगी दिसायला लागतात  .
याच दिवसात हलक होऊन उठणार्‍या मातीच्या लोटांआडुन रानोमाळ रामेठ्याचे चिमुकले पिवळे दिवे लुकलुकायला लागतात .एरवी तर तसेही, जाईजुईचे नखरे प्रत्येकाने सोसलेले असतात .मोगरा ,मदन बाणाने प्रत्येक काळीज कधी ना कधी घायाळ झालेलं असतं. अवचित सामोर्‍या येणार्‍या रातराणीच्या दरवळाने घुसमट झालेली असते. पण कोकण पट्टय़ाच्या, पश्चिम घाटाच्या पायवाटांवर, दुतर्फा   फुलारलेल्या करवंदीच्या  नाजूकसाजूक मदमस्त शुभ्र फुलांचा जाळ्या, या सगळ्या गारुड्याला पुरून उरतात  .
हे दिवस झाडाची, फुलाची नाळ तोडुन   अवकाशाकडे झेपावणार्‍या, वार्‍यावर तरळणार्‍या, सुगंधाचे. .सुवासाचे. . परिमळांचे.  दरवळांचे. .   अदृश्याचा साक्षात्कार  घडवणारे.
या  सगळ्या अलवार  केशरी आसमंताला एक सोन झळाळी येते अमलताशामुळे  . बहाव्यामुळे  . .  सगळ्या आसमंताला एक ठहराव येतो.  हा सोनमोहोर बंगाली लोकांचाही खूप आवडता आहे . ती  बंगाली लोकांची "सोनाली "आहे  अमलताशाच्या सोनचवर्‍या ,तो राजवृक्ष  असल्याची ग्वाही देतो.

आता नदी - नाल्यांचे सुकण्याचे दिवस जवळ येत चाललेले असतात
या  ओढय़ांना,ओहळांना ओलांडत, न थकता चालत राहायचं,पश्चिम वाहिनी नद्यांच्या उगमांच्या दिशेने !.पाल्या पाचोळ्यातून वाट काढताना मात्र जरा अदबीनेच.

पाॅंव सूखे   हुए पत्तोंपे जरा अदबसे रखना
धूपमें मांगी थी पनाह कभी इनसेभी. . .

ही जाणिव ठेवायचीच.

नद्या झऱ्यांच्या उगमाजवळ असंच आणखी एक मोहजाल पसरलेलं असतं.  शुभ्र अलवार पाकळ्यांचा कसाबसा तोल सावरणारा कर्पूर डोलारा. पाकळ्यांची चुणीदार मलमली पोत आणि पुष्प मध्यातून अनावर उसळुन उठणारे  कंच जांभळे केसर!  सह्याद्रीच्या करंद काळ्या कातळांवर, कड्यांवर कबरींच्या (कपॅरिस स्पिनोसा) महिरपी सजलेल्या असतात .केसरीया रंग आळवायचो भान यांनाही असतेच.  केशरी काटे सावरत पलाश -पांगार्‍याशी इमान राखून असतात  .
पानगळीला दाद न देता फुलून आलेला आसमंत पाहून मग असंख्य सावरीचे रोम रोमही फुलून येतात  .
शिवर, सावर ,शाल्मली, किती नावाने तिला हाकारवं. किती तर्‍हांनी तिनंही सजावं. नुकतीच उभारी धरलेल्या लाल लसलशीत कोंबांपासून ,कापूस होऊन स्वत:ला वाऱ्यावर  बेभान उडवून देण्याच्या पायरीपर्यंत या सावरींना निशब्द अनुभवावं. नाही तर मग सकाळच्या सोनसळी उन्हातल्या सावरीच्या नखर्‍यापासून सांजवेळी  पर्यंतच्या श्रांत ,अंतर्मुख होत जाणार्‍या सावरी निहाराव्या . नद्यांच्या काठाकाठाने तर अशा फुलतात की पुन्हा असा बहर असेल, नसेल !किती फुलू, किती उमलू अशा अधिरलेल्या!
याच सावरी चढत्या - तापत्या उन्हात, घायाळ होत जातात ,जिव्हारी घाव बसल्यासारख्या! रडून रडून लालसर झालेल्या डोळ्यांसारखे  दिसतात शाल्मलींचे ते आरक्त म्लान झुबके!दुपारभर सावरीच्या वेदनांनी पेटून उठलेले नद्यांचे ओघ कलत्या उन्हासरशी रुजू लागतात. अशा वेळी सावरीच्या आडुन सूर्याकडे पाहिलं तर त्याच सावरी  लखलखतात अग्निशिखांसारख्या किंवा निळ्या आकाश झिलई वर लाल नक्षत्र पुंजांसारख्या.  मावळतीचा आणि सावरींचा रंगोत्सव, एकाचवेळी वरचा षड्ज लावतो आणि अंतर्यामी सुरू होतो एक अनाहत नाद ? याच कातरवेळी एखादी निशब्द साद नादावते. मोहरला बावरल्या सावरीच्या साक्षीने  आकाशालाही नशा येते .शामका मंझर पाहून वाटते आसमाॅंभी शराब पिता है। 
फुलतात तेव्हा इतक्या अनावर फुलतात या सावरी की तेव्हा या सावरींच्या नादाला सावलीही लागत नाही. फुलून संपल्यावर  सावरींनी ढाळलेल्या रक्त पुष्पांचे रुजामे पाहायचे असतील तर कोयनेच्या काठाकाठाने भरकटत जावं.  अंतिम वेळी, प्राजक्ता सारख्याच अलगद उतरतात सावरी तरु तळीच्या मातीवर .अगदी देठांना ही  न दुखावता ! आणि विसावतात स्वत :च्याच नादात.  
सावरीच्या अस्तित्वाने
आसमंत होतो रक्तबंबाळ
एक म्लान ग्लानी चराचरावर
एकाकी वारा भटकतो रानोमाळ
संपत येतात जसे   दिवसांचे - ऋतूंचे प्रहर
आपणच न्याहाळते मग मूकपणे
ढाळलेली रक्त पुष्पे
प्रत्येक सावर  


©Adv Seemantini Noolkar

 



मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

धन्य भाग सेवा का अवसर पाया


पंडित राजन भाई मिश्रा क्रिटिकल आहेत असं माझ्या पुतण्यानं- गौरांगने, मला सांगितलं .फोन ठेवते न ठेवते तोपर्यंत दिलीप भोजने यांचा फोन आला  .पंडितजीं बद्दल वाईट बातमी आहे म्हणाले. नुकतंच बोलणं झालं असल्यानं मी  त्यांना ठामपणाने सांगितलं ,"तसं काही नाही ,ते क्रिटिकल आहेत." तरी विचाराव म्हणून.माझा मित्र विजय मागीकर ,  ज्याच्यामार्फत राजन भाई आणि साजन भाईंचा परिचय झाला त्याला मी फोन केला .तोही तेच म्हणाला, ते क्रिटिकल आहेत . बातमी खरी नाही या कल्पनेनं अडकलेला श्वास मोकळा झाला ,म्हणेपर्यंत  विदुषी कलापिनी कोमकलींची एफबी पोस्ट दिसली  .जे होऊ नये ते घडलं होतंच. अशा बातम्या कधीच का खोट्या ठरत नाहीत?  काही क्षणांचा खेळ.  असण्या नसण्यात केवळ एकाच श्वासाचं अंतर असतं ,हे पुन्हा एकदा जाणवण्याचा तो क्षण  !

मन इतकं  , इतकं झाकोळून गेलं .जगजितसिंग गेले होते तेव्हा सारखंच! काळजाचा तुकडा कुणी कापून काढावा,   मोठी ,रक्तबंबाळ करणारी जखम झाली की  दुखत नाही ,बधिरपणा येतो एक प्रकारचा ,असं काही काही झालं  .

 माझ्या झाझेन या सेकंड होमने, जे मला भरभरून दिलं, त्यात राजन भाई- साजन भाईंचा तिथला ,मुक्त रहिवास आणि सहवास आहे.  माझा मित्राने  विजयने कळत नकळत  ,असे कितीतरी सूर, स्वर, लय ,तालाचे क्षण माझ्या आयुष्यात आणले की आयुष्यातली कितीतरी अवघड वळणं सहजी पार झाली . 

पहिल्यांदा दोघंही यायचे होते, तेव्हा मला अतिशय टेन्शन आलं होतं .हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातला  topmost duo!खापर पणजोबा, पणजोबांपासून ,बडे रामदासजी, वडील हनुमान प्रसादजी, काका सारंगीवादक गोपाल प्रसाद मिश्राजी ,अशी दीर्घ ,साडेतीनशे -चारशे वर्षांची संगीत परंपरा असलेल्या घरात  , राजन भाई साजन भाईंचा जन्म झालेला. युनेस्कोनं म्युझिक सिटी म्हणून मान्यता दिलेल्या, हिंदुस्थानचा वैभवशाली संस्कृतींचा वारसा मिरवणार्‍या   आणि Oldest living city म्हणून बहुमान पात्र अशा बनारसचे अनभिषिक्त सम्राट  . . . "काशी बसैय्या" मिश्रा बंधू  !

त्यांना काय आवडतं ,इथं त्यांना राहणं गैरसोयीचे होईल का ?कितीतरी शंका आणि प्रश्न! विजय म्हणाला, अगं नको टेन्शन घेऊ .अतिशय साधे आहेत दोघंही.बघशीलच. खरंच बघितलं. पहिल्या भेटीतच! राजन भाईंच्या डोळ्यातला शुभ्र नितळपणा, एकही लाल रेषा नसलेले निर्व्याज तेजस्वी   डोळे ,आश्वस्त करणारे . . . वेगळं काही सांगायची -बोलायची गरजच नव्हती  .

जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा झाझेनचेच होऊन गेले .जितकी माणसं कर्तृत्वसंपन्न,गुणसंपन्न,तितकी जमिनीवर पाय असणारी असतात .साधेपणा ,सरळपणा ,निगर्वीपणा सतत प्रतित होत असतो.    हा अनुभव मला राजनभाई-साजन भाई ,पं.राकेश चौरसियाजी ,पंडित कुमारजी बोस अशा अनेकांकडून मिळाला .

दोघांचीही,  कशाचीच अपेक्षा नसायची .झाझेनच्या सीट आउटमध्ये रात्री बसलं की उंचावरून वेण्णा नदीच्या परिसरातल्या गावांचे दिवे लुकलुकताना दिसले की हमखास म्हणणार," प्लेन मे बैठा हुँ, ऐसा लगता है  ।"

खूप गप्पा. राजनभाई थोडे  मितभाषी. पण संगीताचा, बनारस घराण्याचा, बनारसचा ,विषय निघाला की भरभरून बोलायचे.  "काशीमे सदैव "रस" बना रहता है इसलिए काशी बनारस कहलाती है" म्हणायचे. ते म्हणायचे, "बनारसमे जीने की एक सहजता आहे जो और कहीं नह़ी।"

  राजनभाई- साजनभाईंचं घर बनारसच्या "कबीर चौराहा "या गल्लीत. कबीरांची समाधी असलेला हा चौराहा.याच गल्लीत पंडित सामताप्रसादजी, सितारादेवी,  पंडित किशनमहाराज यासारख्या संगीत रत्नांनी अवतार घेतला.  या गल्लीतच, नेमकी इतकी संगीतरत्नं कशी जन्माला आली त्याचा अन्योन्य संबंध कबीरांच्या तिथल्या वावराशी, समाधीशी आहे, असं राजन भाई मानायचे  .

दोघंही अगदी खुशमिजाज! एकदा सहजच मी म्हटलं की "आप हमेशा ही इतने खुश रहते हो?" तर म्हणाले, "हाॅं,जी अंदरसे खूश हुॅं   और वोही खुशी बाँटता रहता हुँ।" ईश्वराने त्यांना खरोखरच मुक्त हस्तानं, भरभरून दिलं. घराण्याची परंपरा अशी की जन्मल्या  क्षणीच कानावर  अलाैकिक सप्त स्वर -  सारंगीचे  स्वर पडले.  माता पित्यांचा आदर ,गुरु शिष्य परंपरा, एकत्र कुटुंब, अशी मूल्यं मानणारे मिश्रा बंधू, आपली संस्कृती, आपलं मूळ  आणि आजचं बदलतं जग यांचा समन्वय राखता आलं पाहिजे ,असं आग्रहानं म्हणायचे  .

संगीत ही मालमत्ता नव्हे तर ते एक समर्पण आहे.ईश्वराची प्रार्थना आहे. प्रेम आहे .शरीराला जसं अन्नाची गरज असते तसं आत्म्याचं अन्न म्हणजे संगीत . . .food for the soul. .  असं मानणारे  . भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे निसर्ग, मानवी मन, मानवी भावनांचा आविष्कार असतो. ते संगीत एक   spiritual connect जुळवून देतो  असा ठाम विश्वास असणारे.शेकडो-हजारो वर्षांपासून भारतीय संगीत धारा ,गंगेसारखीच अनादि अनंत काल अखंड वहात आली आहे .  ती कधीच नष्ट होऊ शकत नाही . .

राजन भाई आणि साजन भाईंची एकरूपता इतकी होती. . . क्षणोक्षणी जाणवायचं. त्यांची जुगलबंदी म्हणजे "as beautiful as solo"  असं म्हटलं जातं .दोघांना  Two voices one soul म्हणतात ते शतप्रतिशत खरंच आहे  ."अद्वैत संगीत" म्हणून एक त्यांच्यावरची मूव्ही आहे  .राजन भाई आणि साजन भाईंच्या कडं पाहिलं, त्यांचं गाणं ऐकलं की "अद्वैत संगीत" म्हणजे काय याचा साक्षात्कार घडतो.  

झाझेन   वर आले की सकाळी उठल्यावर , साजन भाई बनारसी पानं जमवायला बसायचे  .५० /६० तरी पानं बनवायचे रोज. माझ्या  मनातला प्रश्न साजन भाईंनी   ओळखला."बडे भाईसाहब को दिनभर ३०/३५    पान तो लगतेही  है। मुझे भी  . .ये मैं ही बनाता   हुँ ।विदेश गये तो भी हम बनारसी पान साथ लेके जाते है  ।"वर आणि मला म्हणाले ,"सीमाजी फोटो निकालो। ऐसा पानवाला आपको कहा मिलेगा  ?"

संगीत क्षेत्रातल्या एका दिग्गज  स्राी  कलाकाराचा काही मालमत्ता .  विल बद्दल  problem होता.  मला म्हणाले , आप जरा उनसे बात करो . . वो बहोत परशान है. . त्यांना फोन करुन सांगितलं .  सीमाजीसे  freely discuss करो .  . वो  टिपीकल हायदैय्यावाली नहीं है"  त्याही मोकळे पणाने बोलल्या.  नंतरही  अनेकवेळा.  राजनभाईंचं असं  साधं सुधं वागणं  !

एकदा त्यांचा कोल्हापूरला देवल क्लबमध्ये कार्यक्रम होता. आदल्या दिवशी झाझेनवर मुक्कामी आले  .मला म्हणाले," हमारे साथ कोल्हापूर चलो . . सहेलियों को भी साथ ले चलो  ।"माझी मैत्रीण कल्याणी थत्ते यांना घेऊन त्यांच्या पाठोपाठच कोल्हापूरला पोचले. वूडलँड हॉटेलच्या लाऊंजमध्ये कुणी कुणी भेटले म्हणून बोलत उभी असतानाच,  जिन्यावरून राजन भाई आणि साजन भाई उतरताना दिसले  .पीच कलरचे सिल्कचे एकसारखे कुर्ते ,क्रीमीश सिल्कची धोती आणि जरी काठी उपरणं . . .गळ्यात सोन्याची चेन. बोटात ठसठशीत चमकदार पुष्कराज  . .काही विशिष्ट व्यक्तीभोवती  एक वलय - ऑरा असतो, असं मी ऐकलेलं होतं . राजनभाई आणि साजनभाईंभोवती असलेला "ऑरा "त्या दिवशी मी, याची देही याची डोळा ,अनुभवला  .माझे डोळे मिटेपर्यंत मी आयुष्यात कधीही ते दृश्य विसरूच शकणार नाही.  त्यानंतरची ती सूरात चिंब  भिजलेली संध्याकाळ!कार्यक्रमाची सांगता माझा लाडक्या भैरवीने . . "धन्य भाग सेवा का अवसर  पाया. . "त्या सुरांनी भिजलेल्या संध्याकाळचा अनुभव शब्दात सांगायचा तर याच भैरवी तल्या शब्दात सांगता येईल  . . 

"घट मे गुंजा नाद निरंतर  

ज्योत जली अंतर मे

सौ सूरज के उजियाले मे 

 मैने मुझको पाया  ।"

जेव्हा जेव्हाही दोघांचं गाणं ऐकलं ,त्या त्या प्रत्येकवेळी, "सौ सूरज का उजियाला" असा,  लखलखता तीरा सारखा   भिडायचा  .

झाझेन वर ते आले की मी पंढरपूरची खास उदबत्ती लावायचे  . तो विशिष्ट सुगंध त्यांनी अचूक हेरला होता.  "आपके पास है हमें भी दे ना ".

 तसंच कांदा लसूण मसाल्याचं अप्रूप !इतका आवडला की बस्स ! देतांना मी अगदी बजावून सांगितलं होतं की कमी घाला. पुन्हा आले तेव्हा म्हणाले,"  अरे सीमाजी हमारे खानसामाने सब मसाला एकही बार डाल दिया. . इतना तीखा हो गया  . . "

खाण्याच्या   विशेष  आग्रही आवडी नसल्या तरी एन्जॉय मात्र करायचे . मला कुकिंग मध्ये विशेष रुची आहे हे कळल्यावर  साजन भाईंनी तर पतौडीच्या नबाबांची स्पेशालिटी अशी एक रेसिपी,मला साग्रसंगीत सांगितली.  त्यावर     मटारचा "निमोना "  म्हणून एक रेसिपी   आहे तोही सीमाजीना सांग असा राजन भाईंचा आग्रह  !कधीही परकेपणा असा वाटलाच नाही.

त्यांचा कार्यक्रम असला की शक्यतो जायचंच  .विलेपार्लेच्या ह्रदयेश संगीत महोत्सवात  त्यांचं गाणं होतं  .माझ्याबरोबरच्या कुणीतरी सहज म्हटलं की ललत ऐकायला मिळावा . .विजयने आत जाऊन काय सांगितलं माहीत नाही.  पण चक्क ललत ऐकायला मिळाला.नंतर त्यांना भेटायला आत गेले, त्या वेळेला मिश्किलपणाने हसून म्हणाले," सीमाजी ललत आपके   लिये था।"असे अनमोल क्षण म्हणजेच आयुष्यभराची पुंजी  !

बनारस घराणे म्हणजे चैती, ठुमरी ,कजरी ,ख्याल, ध्रुपद- धमार यांचा ठेवा  .त्यातली ख्यालगायकी मिश्रा बंधूंची मिरासदारी  . . .खयाल  हा एक    पर्शियन शब्द आहे. .खयाल म्हणजे एखादी कल्पना किंवा इमॅजिनेशन  . . पण राजन भाई म्हणायचे की खयाल म्हणजे  Sailing across the serene waters of Ganga  . गंगा त्यांच्या आयुष्याचाच भाग होता. गंगा लहरींनी मिश्रा बंधूंना तिचं संगीत जन्मल्यापासून   ऐकवलं आणि या दोघांचं   संगीतही गंगा लहरींवर उमलत, फुलत गेलं  .  

राजन भाईंचं बोलणं ऐकत राहावं असं वाटायचं.भारतीय शास्त्रीय संगीतच जगात शांती आणि शांतता आणेल . . .(peace and silence) असं ते म्हणायचे  . कधीही उन्माद, उत्पात, उन्मत्तपणा करू नये  .एक परफॉर्मर म्हणून कॉन्फिडंट असावं  .श्रोता म्हणून -लिसनर म्हणून सप्लिकंट असावं  पण अॅरोगंट कधीही असू नये.  The more you are empty, the more you receive. हे त्यांच्या जीवनाचं ,जगण्याचं साधं सूत्र होतं.  

साताऱ्याचा निसर्ग अप्रतिमच आहे  .कास तलावाच्या परिसरात त्यांना आवर्जून नेलं होतं .त्यांना तिथला निसर्ग खूप भावला  ."एक बार यहाँ आके पिकनिक करेंगे, बार्बेक्यू करेंगे "असं म्हणाले होते , पण आता ते सगळं राहूनच गेलं  .

त्यांची" धन्य भाग सेवा का अवसर पाया "ही भैरवी माझी अत्यंत आवडती. मिश्र भैरवी  .इंग्लिशमध्ये   Mishra bhairavi असं लिहिलं जातं. मला नेहमी वाटतं  ही राजन भाई साजन भाई या मिश्रा बंधूंची भैरवी म्हणून  Mishra bhairavi !

राजनभाईंबद्दल बातमी कळल्यावर पहिला विचार साजन भाईंचा मनात आला.बनारस घराण्याची खयाल परंपरा आहे ,तीआमीर खुसरो पासून सुरू झाली असं म्हणतात .आमीर खुसरोचें  शब्द मनात घोळत राहीले. 

"साजन ये मत जानियो तोहे बिछडत मोहे चैन   

दिया जलत हेै रातमें  और  जिया जलत बिन रेेैन"

असंच काहीतरी राजन भाईंना  या जगाचा निरोप घेताना वाटलं असेल का  ?

एकदा विजय बरोबरच  दाेघे दांडेलीला गेले हाेते . परतीच्या वाटेवर, विजयला त्यांनी हक्कानं सांगितलं ,सीमाजी के घर रहेंगे । राजन भाई आणि साजन भाईंचं असं हक्कानं येणं घरच्यासारखं मोकळंढाकळं राहणं  .. . .असं वाटतंय . . . 

"धन्य भाग सेवा का अवसर पाया  . . . ."

श्रद्धासुमनांजली  राजनभाई.

Adv Seemantini Noolkar










रविवार, १८ एप्रिल, २०२१

पिसईचा नकटा

 पिसईचा नकटा


दूरातून कुठूनही मृदंगाचा अस्पष्ट आवाज आला तरी अॅड विलास कदम गाडी तिकडे वळवायचे . तिथे पोचून विचारायचं,” नकटा आलाय का ?” उत्तर मिळायचं ,” आत्ताच वरच्या वाडीला गेला”. की मोहरा तिकडे .पुन्हा नकटा हूल द्यायचा . दापोलीच्या आसपासच्या  वाड्या वस्त्या केवळ त्या एका नकट्यासाठी पालथ्या घातल्या. शेवटी एकदाचा नकटा त्याच्या लवाजम्यासह  करंजाणी गावात गाठ पडला.

कोकणातला शिगमो हा मानाचा महत्वाचा सण! शिगमो किंवा शिमगा म्हणजे मूळचा होलिकोत्सव-वसंतोत्सव ! दापोली गावाजवळच्या आसूदची होळी केवळ अनुभवायला हवी. संपूर्ण गाव ही होळी सामुदायिक रित्या साजरी करते .चाकरमानेही होळीसाठी गावी आलेले असतात. रांगोळ्या काढून, पताका लावून, 20/25 फुट उंचीची होळी कलात्मकरीत्या सजवली जाते. पोरटोरांपासून सगळ्यांची उत्साही लगबग वातावरणात भरून राहिलेली असते. रात्री, पूर्ण चंद्राच्या साक्षीने, होळीला नारळ-नैवेद्य होतो. गावातले पुरुष होमाभोवती फेर धरून होळीची गाणी म्हणत दंगल उडवून देतात.आणि नंतर असतो एक इवेंट. चक्क बाहुलाबाहुलीचे रीतसर लग्न! व-हाडापासून वाजंत्री-वरातीपर्यन्त, करवल्यापासून,मंगलाष्टका पर्यन्त, गाव जेवणापासून नाचगाण्यापर्यंत सगळे कसे साग्रसंगीत. आख्खा गाव त्यात सामील.  माझ्या मनात तर त्या बाहुलाबाहुलीच्या लग्नामुळे लहानपणीच्या भातुकलीच्या,  बाहुलाबाहुलीच्या लग्नाच्या nostalgic आठवणींचा पूर लोटला.इतकं सगळं अनोखं अतरंगि.

या उत्सवातला माझा एक दिवस होता काटखेळाच्या नावे.काटखेळ हा झांज पखवाजाच्या साथीने घडणारा एक समूह नृत्याचा आविष्कार !हातात काठ्या टिपर्‍या घेऊन केलेलं गरबा सदृष्य सामूहिक नृत्य. काटखेळात विवाहित पुरुषच असतात.अर्धनारीनटेश्वरा सारखा पोशाख.-म्हणजे अंजिरी, बैंगणी, आंबा अशी ऐन देशी रंगाची , जरीकाठाची लुगडी ,निर्‍या निर्‍या करून कमरेला विशिष्ट पद्धतीने बांधलेली असतात. डोईवर मावळ्यांच्या पागोट्यासारखं शिरोभूषण!

काटखेळात 40/40 जण असतात.काही गावांची देवीची पालखी असते. ज्या गावांची पालखी  नसते त्यांचा नारळ असतो. काटखेळयांचा म्होरक्या हा नारळ घेऊन , साथीदारांसोबत घरं घ्यायला निघतो. अंगण सारवून , रांगोळ्या रेखून, घरं प्रसन्न मनाने  खेळयांची वाट पहात असतात. खेळे आले की फुलांचा हार घालून, नारळाची पूजा केली जाते. मग रिंगण धरून काटखेळ होतात. खेळयांना दक्षिणा, साखर, चहा असं काही आवर्जून दिलं जातं.

दापोली तालुक्याच्या खेडी गावच्या ग्रामदैवत चंडिका देवीशी जोडलेली ही लोक कला!.कसली कोरिओग्राफी अन कसलं काय? काटखेळ  म्हणजे सगळं उपजत, उत्स्फूर्त, मुक्त, चैतन्यमय  !

काटखेळाची प्रथा शिवकालपूर्व आहे असे म्हणतात .शिव काळात गुप्त संदेशांची देवाणघेवाण काट खेळाच्या माध्यमातून व्हायची.कोकणातला हा काटखेळ प्रजासत्ताक दिनाची शोभायात्राही गाजवून आला आहे.

त्याच दिवसाची संध्याकाळ होती गोमु के नाम. दिवेलागणीला बाजारात पुन्हा तोच परिचित पखवाजाचा आवाज  आलाच. दुकानदुकानसमोर थांबून गोमू नाचत होती. “ राया मला गुलाबाचा गजरा हवा “ तरणेच काय शौकीन म्हातारे ही गोमू बरोबर ठुमकत होते. ही गोमू म्हणजे मुलगाच असतो पण नाचणं, लाजणं, लाजबाब! मनसोक्त मनोरंजन.

आता राहिला नकटा! नकट्यापाई किती भिरीभिरी फिरलो .कदम साहेबांनी माझी नकट्याशी गाठ घालून द्यायचीच असा विडा उचलला होता. आम्ही करंजाणीला पोचलो तेव्हा नकटा एक घर घेत होता. त्यांच्याच लोकभाषेत म्हणायचे तर चौथ्या, पाचव्या होळीला नकट्याचे सोंग घरे घ्यायला निघते. नकट्याच्या  कबिल्यात कोळी - कोळिणीची  जोडी, गायक, वादक असतात. अर्थात गोमू सारखाच कोळिण पण मुलगाच असतो॰

नकटा म्हणजे देवीचा रखवालदार,. आम्हाला भेटला तो महामाई देवीचा रखवालदार. “पिसईचा नकटा”!नकट्याचे सोंग घेणारी व्यक्ति  एक पारंपारिक लाकडी मुखवटा घालते .काजुच्या झाडाच्या खोडापासून हा मुखवटा बनवलेला असतो . नकट्याचा मुखवटा पोरा - बाळांना भीतीदायकच  वाटतो. करंजाणी  गावात ज्या घरासमोर नकटा नाचत होता , तिथली पोरं भेदरून आईच्या पदराआड दडून पहात होती. सांगलीला अशीच तडकड ताई येते . तिला मी अशीच घाबरायची.

नकटा गाण्याच्या टाळावार, गाण्याबर हुकुम अभिनय करून, हातातली कोयती गरागरा फिरवत नाचत होता.

नकटा बामण दिसतो कसा

नकटा बामण  चालतोय  कसा

उंबराखाली खटीला डुरा

दुरूच्या चष्म्याला लागला झरा

उठा उठा पंतोजी आंघोळी करा

आंघोळीकरता देखलाय मासा

तोडलाय जानवा, फेकलाय मासा

फाशात मासा गुंतलाय कसा

हातात फासा डोईवर मासा .

नकटा बामण  चालतोय  कसा

घराघरा समोर नकट्याचे सोंग नाचते . घरातल्या तान्ह्या मुलाला नकट्याच्या हातून आंघोळ घातली की इडापीडा तळते अशी भोळीभाबडी समजूत असते. नकट्याला खूप मान असतो घर घेतलं की त्याचा, त्याच्या साथीदारांचा, नारळ देऊन साग्रसंगीत मानपान केला जातो.

कित्येक लोककला,लोकपरंपरा  नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत .तशीच नकट्याच्या सोंगाची प्रथाही थांबते का काय अशी परिस्थिति होती . “पिसईचा नकटा म्हणून वसंत गोविंद  एसरे  वर्षानुवर्ष सोंग काढायचे. त्यांना आता वयामुळे जमत नाही. पण त्यांची धुरा संदेश काटकर या नवयुवकाने कर्तव्य भावांतून, सामाजिक बांधीलकीतून खांद्यावर घेतली आहे.नकट्याच्या ताफ्यात एसरे, बाईकर कुटुंबातले लोक, गायक, वादक म्हणून आहेत..नकट्याचे सोंग निघते तेव्हा गावाच्या सीमेबाहेर आधी कोकणी खासीयतीप्रमाणे गार्‍हाणे घातले जाते.” व्हय म्हाराजा, तुझ्या खेळ्यांसाठी पोरं बाहेर पडलीत. नीटपणाने तडीस जाऊ दे. पोरांच्या मागे उभी रहा. व्हय म्हाराजा”

मगच खेळे बाहेर पडतात. खेळे करायचे दिवस संपले की नकट्याचा कबिला घरी परतायला निघतो. पुन्हा गावच्या सीमेवर देवीचे पूजन होते. पुन्हा गार्‍हाणे घातले जाते. देवीने पाठराखण केली म्हणून देवीचे ऋण  व्यक्त करायला. “तुझ्या नावाने बाहेर गेली होती, त्यांना सुखरूप आणलास म्हणून आमचा नमस्कार मान्य कर...व्हय म्हाराजा”

 मग बोंम्ब मारत होमावर जायचे,खेळ्याची सांगता साणेवर  होते. साण किंवा सहाण  म्हणजे चावडी सारखी जागा. इथे दूर जंगलातल्या पालख्या जमतात. नकटा गावातून बाहेर पडताना साज चढवून बाहेर पडलेला  असतो. तो साज साणेवर उतरला जातो. देवीची ओटी भरली जाते. वाड्या वस्त्यांवरच्या पालख्या नाचवल्या जातात . शेवटी प्रसादाने सांगता होते.

शिमग्यातले खेळ, नाच, सोंगं ही सगळी समूह मनाची , समूह प्रतिभेची निर्मिती असते . ग्रामीण भागात लोककला दैनंदिन जीवनाचा एक  अविभाज्य  भाग असतात. लोक कलांमध्ये निसर्गत:  एक जोश, उत्स्फूर्तता , मुक्तपणा  असतो . कलात्मक सौंदर्यनिर्मिती  अशा क्लिष्ट  गोष्टी, दूरान्वयानेही  कोणाच्या ध्यानी मनी नसतात.कृत्रिम बांधिलकी नसते. पण आपोआप सौंदर्याचा, आविष्कार , साक्षात्कार घडतो.हाच लोक कलांचा प्राण!.लोक कला म्हणजे निरामय  चैतन्य, आदिम संस्कृतीचे अनमोल देणं! शहाण्याने भौतिक प्रगतिच्या मापाने या लोकसंस्कृतीची गुणवत्ता मोजू जाऊ नये....

करंजाणी हून परतताना नकट्याच्या गाण्याने मनात फेर धरलला होता ..

“आंघोळीकरता देखलाय मासा

तोडलाय जानवा, फेकलाय मासा

फाशात मासा गुंतलाय कसा

हातात फासा डोईवर मासा

© अॅड. सीमंतिनी  नूलकर




आसूदची होळी


संदेश काटकर आणि  वसंत एसरे


नकट्याचा कबिला




बाहुला बाहुलीचे लग्न



काटखेळ


 

 

गुरुवार, ११ मार्च, २०२१

पोपटी दिवस

 

पोपटी                     पोपटीची फुलं



सरता पाऊस त्याची आठवण म्हणुन दंवथेंबांची नक्षी मागे  सोडुन   गेलेला असतो.अचानक  कधीतरी त्या दंवथेंबात पोपटी अलवार प्रतिबिंबं   थरथरायला लागतात.झाडात,पानात,मनात पोपटी स्पंदनं उमटायला लागतात.

कवी नलेश पाटीलांची एक कविता आहे,
"झाडांच्या  मनात जाऊ,पानांचे विचार होऊ।. . .
पोपटी स्पंदनासाठी, कोकिळ होऊन  गाऊ. . . "
तीच ही पोपटी स्पंदनं!

हे पोपटी दिवस असतात भारावून टाकणारे! मुळात भारत हा रंगविविधतेचाही देश आहे.प्रत्येक  प्रांताचे स्वत:चे असे रंग आहेत. महाराष्ट्राचेही विशेष  मक्तेदारी असलेले रंग आहेत.अंजिरी,गुलबक्षी ,नारिंगी,राणी,बैंगणी,कोनफळी,अबोली. . . . .कितीतरी. . पोपटी हा त्यातलाच एक अस्सल  देशी-गावरान  रंग. . . . सरत्या हेमंतापासूनच, वसंताच्या , चैत्र पालवीच्या चाहुलीने सह्याद्रीचे घाटमाथे,देश,कोकण   या पोपटी रंगात माखून निघतात.खरंतर  मराठी मनात हा पोपटी रंग  एका कोपर्‍यामधे  असतोच  असतो. . मधे मधे लसलसत्या नाजूक कोंबा सारखा मान   वर काढुन  अस्तित्वाची जाणिव देत रहातो.

महाराष्ट्राचा एक पोपटी रंग आहे तसा एक पोपटी फ्लेवरही आहे . .  पोपटी वास आणि चव आहे.
‍दिवाळीनंतर अगदी फेब्रुवारी, मार्च पर्यंतच्या रात्री म्हणजे मस्त मुलायम पांघरुन घेण्याच्या, गार वारा लपेटून घेण्याच्या, शेकोटीच्या उबेच्या. हे दिवस हुरडा पार्टीचे, भरीत पार्टीचे,मोग्याचे,शेंगसोल्याचे,ऊंधियू चे पण रात्री मात्र पोपटीच्याच!
हीच ती  महाराष्ट्राला विशेषतः कोकणाला-- अपरान्ताला  ,पोपटी फ्लेवर देणारी पोपटी  .
रायगड  - अलिबाग हे तिचं माहेरघर  पण आता पोपटी अख्ख्या कोकणपट्टीत बागडत असते. .डहाणू मध्ये पोपटीला  "गड"   म्हणतात इतकच.
अलिबागला कामाला म्हणून गेले की नागाव वगैरे समुद्रकिनार्‍यांवर जायचा नियम तोडून चालतच नाही . तिथं गेल्यावर हमखास "पोपटी लावून मिळेल" अशा पाट्या दिसतात . 

पोपटीनं मला कैक वर्षांपासून इतकं पिसं लावलं होतं .एरवीही पोपटी रंग मला खाणाखुणा करून  हाकारतच असतो,  पण ही"पोपटी"ही किती तरी वर्षं साद घालत होती .या जानेवारीत शेवटी गाडी काढून मी आणि माझी तनुजा नावाची मैत्रीण ...... दोघींनी  कोकण गाठलंच .माझे मित्र अॅड. विलास कदम आणि सौ. स्नेहा कदम  असले चोचले पुरवायला नेहमीच तयार असतात.

आमचा आमचा पोपटी उत्सव उत्साहाने ठरवला  .  पोपटीचा संभार तसा भरपूर असतो . एक पक्कं भाजलेलं खणखणीत मातीचं कोरं मडकं ,  भरपूर खडेमीठ, भरपूर ओवा  .तिखट आणि कोकणी मसाला. तूर ,वांगी, बटाटे ,गाजर, कांदे,शेवग्याच्या शेंगा ,कणगरं आणि मांसाहारी पोपटी हवी असेल तर कोंबडी आणि  अंडी. मुख्य म्हणजे कडव्याच्या शेंगा हव्यात . कधी कधी  फ्लॉवर ,मटार घालतात .
पोपटी लावायची तर पावटय़ाचा पाला आणि विशेषतः भांबुडर्य़ाचा पाला हवाच . दंवाच्या भरोशावर पोसलेला भांबुर्डा , बांधावर, भात खाचरात, ओसाड रानात , या दिवसात मुबलक मिळतो.  भांबुर्ड्याचे औषधी गुण आहेत पण एक विशिष्ट देशी स्वादही आहे.पोपटीसाठी भांबुर्ड्यांचे झुडूप मुळासकट उपटून वापरायचे असते .रानोमाळ फिरून भांबुर्डा जमवला. मुरुडला  एका जणांच्या शेतात जाऊन पावट्याचा पाला मिळवला .सरंजाम तर जमा  झाला.
मडकं बसेल असा खड्डा जमिनीत खणून तयार होता . पोपटी लावण्यासाठी सुका पालापाचोळा, चगळ, नारळाच्या शेंडय़ा, झावळ्या ,काटक्या कुटक्या यांचं जळण गोळा करून झाले.  हा उद्योग पार पाडता पाडता संध्याकाळ कधी सरून गेली ते कळलंही नाही .

पोपटी लावण्याचा एक विशिष्ट  विधी असतो .मुळात मडकं  ,भांबुर्ड्यांच्या पाला धुऊन घ्यायचाच    नसतो. मडक्यात तळाशी भांबुर्डा आणि पावटय़ाचा भरपूर पाला अगदी कुचून भरायचा  .चांगलं मूठ मूठ खडे मीठ आणि ओवा त्यावर मारायचा. मग  भाज्या मांडायच्या. वांगी, बटाटे, कणगरं, यात मसाला भरून घ्यायचा आणि शेंगांना मसाला चोळून घ्यायचा .   पुन्हा भांबुर्ड्यांच्या  पाला ,पावटय़ाचा पाला.  प्रत्येक थरानंतर खडे मीठ आणि ओवा हे ध्रुपद मात्र चोख हवंच.  मग पाच सहा तास मसाला लावून मुरवलेल्या  कोंबडीच्या तुकड्यांचा थर द्यायचा . सगळ्यात शेवटी अंडी  घालायची.अंडी सोवळीच. ती काही मसाला वगैरे अंगाला लावून घेत नाहीत  .आता उरला सुरला मसाला घालून, पुन्हा पावटय़ाचा पाला आणि भांबुडर्य़ाचा पाला इतका दाबून भरायचा की मडकं उलटं केलं तरी  आतले जिन्नस बाहेर डोकावता सुद्धा नये.वाटलं तर पाल्याला अटकाव करण्यासाठी ,दोन तीन काटक्या उभ्या आडव्या  लावायच्या. मडक्याच्या मानेजवळ !मडक्यात पाला दाब दाबून नाही भरला तर मडकं फुटू शकतं.सगळं शिस्तीत   भरून   झालं.





खड्ड्यात जळणात्मक वस्तू भरून त्यात   मडकं उलटं ठेवलं.   आजूबाजूने पुन्हा नारळाच्या शेंडय़ा, कवट्या, झावळ्यांचे तुकडे  लावले.चगळ पेटवून "पोपटी लावली "
.   
आता पाऊण तासांची निश्चिंती.पोपटीचा तेल -पाण्याशी काडीचाही संबंध नसतो.  भांबुर्डा आणि पावटय़ाच्या पाल्याची ,पाण्याची वाफ (moisture)धरुन ठेवण्याची क्षमता जबरदस्त आहे . पोपटी लावायची म्हणजे चक्क" दम" लावायचा. दम बिर्याणीचा लावतात तसाच.  पदार्थ शिजवण्याची ,धुरावण्याची  ही पारंपारिक पद्धत आहे. यात न्यूट्रियंट लॉस अजिबात होत नाही.  स्वाद आतल्या आत मुरत रहातो. दमा दमानं प्रक्रिया होत रहाते. परिणामी  जो  thermal inertia असतो त्यामुळे कोंबडीचे तुकडे ,अगदी मटण सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत शिजते. 

पोपटी म्हणजे एक माहौलच असतो . ती तयार होईपर्यंत गावमातीचा, धुराचा वास,शेकोटीची ऊब अनुभवायची आणि शिवाय गप्पा गाण्यांचा  तडका . पोपटी लावल्यावर हळूहळू ताव जाणवायला लागला होता. आणि  त्याबरोबरीने गप्पांचा ही ताव वाढत चालला  .भांबुर्ड्याची ,गोरखमुंडी ,बडथोला,कोंबडा ही  नावं पदरात पडली.  भांबुर्ड्यांला नागोठणे भागात भामरुड म्हणतात .विशिष्ट प्रदेशातल्या फळांची- भाजीची एक विशिष्ट चव असते , जसं नागपूरची संत्री, कृष्णाकाठच्या गोट्याची वांगी ,तसंच तिडी गावच्या कडव्याच्या शेंगा असतील तर पोपटीची चव, आणखीच न्यारी  .

पोपटी हा शब्द किती सर्वस्पर्शी, सर्वव्यापी आहे  .सह्याद्रीच्या कड्यांवर" पोपटी "नावाची एक रान वनस्पती आढळते  .Nicandra physalodes .या पोपटीची  फुलं अगदी नाजूकसाजूक, गुलाबी जांभळसर रंगाची असतात  .आणि सुकलेली फळं सुद्धा ड्राय डेकोरेशनसाठी एकदम भन्नाट  !

पोपटी रंग ,पोपटी झाड तशी 'पोपटी 'भाषाही आहे . "माया " या  आदि धर्माच्या - ethnoreligion पाळणार्‍या   Ethnic identity असलेल्या आणि जगभरात केवळ लाखभर लोकसंख्या असलेल्या जमातीच्या भाषेचे नाव "पोपटी"आहे  .विणकरांचीही एक" पोपटी-पोपती"असते .धागे विणतानाची ही एक अवस्था  !

पोपटी म्हणजे बार्बेक्यूचा देशी  आविष्कार ! बार्बेक्यूचं स्पेलिंग आणि मूळ, याविषयी बराच गोंधळ, दावे प्रतिदावे आहेत  .स्पेन ,अमेरिका  असे बरेच देश  बारबेक्यु आमचंच असं छातीठोक  सांगतात.पण खरं म्हणायचं तर या प्रकारे अन्न शिजवण्याच्या परंपरेची मुळं आदीम काळाशी जोडलेली आहेत.  कुणा एका देशाची, संस्कृतीची ती मक्तेदारी होऊच शकत नाही.  आदिमानव शिकार करून आणलेलं आख्खं  डुक्कर, हरीण  अगदी" From beard to tail" भाजून  खायला शिकला तिथपर्यंत या परंपरेची मूळ पोचतात  .

कॅरेबियन टायनो इंडियन्स (Taino Indians)ही जमात आहे  .या जमातीचे लोक पवित्र अग्निकुंड पेटवून त्याचा वापर करून भाजून ,धुरावून पदार्थ बनवायचे.  त्यासाठी टायनो शब्द आहे "Bara bicy" .कोणी म्हणतो बार्बेक्यू या शब्दाचं ,परंपरेचं हे मूळ आहे .तर कोण म्हणतं "Barbacoas"या शब्दावरून बार्बेक्यू ची उत्पत्ती झाली . Barbacoas म्हणजे लाकडी रॅक .त्याचा वापर भाजण्यासाठी ,धुरावण्यासाठी केला जायचा.

ख्रिस्तोफर कोलंबस जेव्हा जगप्रदक्षिणेला निघाला तेव्हा त्याला एक बेट सापडले  .त्याने त्या  बेटाचं नामकरण हिस्पॅनियोला(Hispaniola) असं केलं.  या बेटावरचे लोक ओल्या जळणांचा वापर करून मांस शिजवत . त्यामागचा उद्देश, अन्न आणि जळण, जळून राख होऊन जाऊ नये , अन्न धुमसून धुमसून शिजावं, हाच होता. हा Indirect flame चा वापर.  अशाप्रकारे धुरावून वाळवून मासे ,प्राणी टिकविण्याची त्यांची परंपरागत पद्धत होती.  लोकसंस्कृतीचे पदर एकमेकींशी कुठं तरी जुळलेले असतात.  पोपटी करताना ओला भांबुर्ड्याचाआणि पावटय़ाचा पाला वापरण्यामागे हेच तर तत्त्व आहे .

पोपटी शिजत आल्यावर पोपटीचा धुरकट -मातकट, मसाला मिश्रीत  दरवळ जाणवायला लागला  .तसं वाट पाहण्याचा पेशन्स संपला. पोपटी शिजली का हे पाहण्याचेही  एक तंत्र आहे  .वेळ साधारण पाऊण तास तर लागतोच पण पाण्याचा हलका शिपका मारला की एक विशिष्ट आवाज येतो. यावरून जाणकारांना पोपटी शिजली हे कळतं.


आता पोपटीचं मडकं विस्तवातून उचलून घ्यायचं आणि अंथरलेल्या मोठ्या वर्तमानपत्रावर किंवा कापडावर पोपटी काढायची .  आख्ख्या मडक्यातली पोपटी बाहेर आल्यावर क्वान्टिटी पाहून माझा जीव खरं म्हणजे दडपला होता.पण  आता एकमेकांना घ्या म्हणण्याची शुद्ध ,सवड   सुद्धा भुकेमुळं आणि पोपटीच्या वासामुळं  नव्हती. आदिम परंपरेशी इमान राखून ,दोन्ही दोन्ही हातांची आणि तोंडाची गाठ  पडली .बघता बघता फन्ना उडाला. भांबुर्डा- ओव्या मुळं पोपटी कितीही खाल्ली तरी बाधत नाही.  भांबुर्ड्याच्या पाल्याचा आणि ओव्याचा संमिश्र धुरकट वास आणि त्यातली मातकट वासाची लकेर  आणि चव म्हणजे केवळ स्वर्गीय सुख  ! पोपटी चाहुलीनं नादावलेलं मन या पोपटी दिवसाच्या साक्षीनं,पोपटी मनसोक्त खाल्ल्यावर , पोपटी चवीनं  कुठं जरा थार्‍यावर आलं. . 


©Adv Seemantini Noolkar


मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

चित्तो जेथे भयशून्यो ....

 वार्‍यावर लहरणारा तिरंगा पाहून कोणाही  भारतीयाची मान अभिमानाने उंचावते .भारतीयांच्या आत्मसन्मानाची निजखूण, भारतवर्षाचे मानचिन्ह म्हणजे तिरंगा .भगवा, पांढरा, हिरवा हे तिरंग्याचे तीन रंग म्हणजे धैर्य, त्याग,आशा, समता, शुद्धता, शांती, श्रद्धा , सौजन्य, न्याय अशा गुण समुच्चयाचे प्रतिकच.मधोमध  24 आरे असलेले अशोक चक्र जीवनाची गतीमानता दर्शवणारे. पिंगली वेंकय्या यांनी सुचवल्या पेक्षा  तिरंग्याचे अंतिम स्वरूप वेगळे असले तरी पिंगली वेंकय्या या स्वातंत्र्य सेनानीला भारताच्या राष्ट्रध्वजाचे  डिझाईन करण्याचे श्रेय जाते.22/7/1947 ला राष्ट्रध्वज म्हणून तिरंग्याच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले   आणि 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र भारताचे प्रतीक असलेला तिरंगा फडकला.

कोणाही राष्ट्राचा राष्ट्रध्वज त्या त्या राष्ट्राचा इतिहास, समृद्ध संस्कृती, जैव विविधतेची  वैशिष्ट्ये, अशा कशा न कशा चा  वारसा  अधोरेखित करतो.ध्वज प्रथेचे मूळ भारतीय उपखंडातच सापडते. भारत आणि चीन हे त्या प्रथेचे मानकरी.पूर्वी युद्ध क्षेत्रात  रथांवर, हत्तीवर ध्वज असायचे.युद्धात या ध्वजांचा पाडाव हेच लक्ष्य असायचे. हळू हळू स्वतंत्र राज्य, स्वतंत्र राष्ट्राचे  प्रतीक म्हणून ध्वजानासन्माननीय  स्थान मिळाले.

कोणताही राष्ट्र ध्वज हा त्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे, आत्मसन्मानाचे, अस्मितेचे , गौरवाचे मानचिन्ह  असते. राष्ट्राच्या अशा मान चिन्हा कडे तितक्याच गांभीर्याने पाहिले पाहिजे. 

स्वातंत्र्य दिन किंवा प्रजा सत्ताक दिनाच्या वेळी भारतात ध्वजारोहण दिमाखात, उत्सवी, उत्साही स्वरुपात पार पडते. पण कधी   कधी अति उत्साहाच्या भरात राष्ट्रध्वजाच्या अवमानांच्या घटना घडतात. न्यायालयात खटले दाखल होतात. कधी समाज विघातक शक्ति   तिरंग्याचा जाणीवपूर्वक अपमान, अवहेलना  करतात॰ कधी सामान्य नागरिकाकडून अनावधानाने अवमान होतो.

अशा अनेक न्यायालयीन निकाल पत्रात  राष्ट्रध्वजाचे महत्व , ध्वजारोहणाची  पद्धत, अधिकार, राष्ट्रध्वजाचा अवमान यांची विस्ताराने चर्चा झालेली आहे.एका निकाल पत्रात विशेषत्वाने नमूद केले आहे कि सर्व सामान्य जनतेत राष्ट्र ध्वज, राष्ट्र ध्वज संहिता याबाबत जन जागृतीची निकडीची गरज आहे.राष्ट्रध्वज हा भारतीय राज्य घटनेचा दूत आहे आणि घटनेचा, राष्ट्रध्वजाचा आदर राखणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे.

 

तिरंग्याची निर्मिती प्रक्रिया हा विषय थोडा खोलात जाऊन पाहिला तर त्या मागचे गांभीर्य समजते. तिरंग्यासाठी, रेशीम, लॉकर ,खादी अशा नैसर्गिक सुताच्या कापडाचा वापर अनिवार्य असतो. हुबळी(कर्नाटक)  येथील खादी ग्रामोद्योग संघा कडे तिरंग्याच्या निर्मितीची महत्वपूर्ण  जबाबदारी आहे. म्हणू च हुबळीला   ध्वज ग्राम  म्हटले जाते. 

तिरंगा शिलाई साठी विशिष्ट तांत्रिक कौशल्य, क्षमता, पात्रता, आवश्यक असते. तिरंग्याच्या कापडाची निर्मिती बागलकोट येथे होते. तर ध्वज स्तंभा ला  ध्वज अडकवण्याची रोप हेम कोलकाताहून येते.. तिरंग्याचे रंग, शिलाई , ध्वजारोहणासाठी आवश्यक व्यवस्था, अशा अनेक बाबींना हुबळी येथे मूर्त स्वरूप येते. तिरंग्याचे रंग, आकार इतकेच नव्हे तर एक स्क्वेर सेमी कापडातील उभ्या आडव्या धाग्यांच्या विणींची संख्या, यात कुठेही चूक होणे हा गंभीर गुन्हा आहे.

ध्वजासाठी वापरल्या जाणार्‍या  कापडाच्या प्रत्येक चौरस सेमी मध्ये, चार उभे, चार आडवे, अशी विशिष्ट वीण बंधनकारक आहे.ही वीण अतिशय दुर्मिळ प्रकारची असते. तिरंग्याचा आकार आयतकृती,  आणि लांबी रुंदी, 3:2 अशा मापातच असते. 

तिरंग्याचे साधारण नऊ साइज असतात. राष्ट्रपतीभवन,राजभवन, विधान  सौध, पुलिस हेड क्वार्टर अशा ठिकाणी राष्ट्र ध्वज फडकावला जातो. त्याचे मोज माप , कापडाचा प्रकार याची माहिती कित्येक सरकारी अधिकार्‍यांना ही नसते. 3600mm/2400mm हा दोन क्रमांकाचा साइज असलेला राष्ट्रध्वज लाल किल्ला , राष्ट्रपति भवन, गन  कॅरेज  यावर  फडकावला जातो.सगळ्यात लहान साइज 150mm/100mm आहे. एक नंबर साईजचा राष्ट्र ध्वज अति उंच इमारतींवर फडकावला जातो.

राष्ट्रध्वज निर्मिती, ध्वजारोहण, सन्मान यासाठी भारताची स्वतः ची राष्ट्र ध्वज संहिता आहे.....Flag Code of India.

राष्ट्रध्वजाच्या अवमानविषयक तरतूदिंबाबत  Prevention of Insult to National Honour Act,  Emblem and Names ( Prevention of  Improper Use) असे कायदे आहेत.पूर्वी ध्वजारोहणाचा अधिकार सामान्य नागरिकाला     नव्हता.पण नवीन जिंदाल केस मधल्या निकालपत्रानुसार   सर्व सामान्य नागरिकाला सुद्धा हा अधिकार मिळाला.पण हा अधिकार निरंकुश (absolute)असा नाही तर qualified  right  आहे... निरंकुश अधिकार या साठी केलेला नाही कि,अन्यथा  कुठल्याही मिरवणुका,    मोर्चे ,सभा  अशा प्रसंगी राष्ट्रध्वजाचा अनिर्बंध, सरसकट वापर होऊन, राष्ट्रध्वजाचा अपेक्षित सन्मान राखला जाणार नाही.  

ध्वजारोहणाचाही एक विशिष्ट प्रोटोकॉल आहे.राष्ट्रध्वज सहसा सूर्योदय ते सूर्यास्त या काळात फडकत रहाणे अभिप्रेत आहे.सूर्यास्ताच्या सुमारास तो सन्मानपूर्वक उतरवणे आवश्यक असते,राष्ट्रध्वज रात्रीही फडकत ठेवायचा असेल तर संपूर्ण प्रकाशाची व्यवस्था असायलाच हवी.आणि ध्वजस्तंभ 100 ft उंच असणे ही या परिस्थितीत गरजेचे असते.

ध्वजारोहण करताना भगवा रंग अनिवार्यपणे वरच असला पाहिजे .उलटा राष्ट्रध्वज फडकावणे हा गुन्हा आहे.राष्ट्रध्वजाची घडी घालण्याची ही एक विशिष्ट रीत, पद्धत  आहे . राष्ट्रध्वज कधीही टेबल क्लॉथ म्हणून, पोडियम वर घालण्यासाठी म्हणून, इमारत झाकण्यासाठी किंवा कशावरही आवरण म्हणून वापरता येत नाही .ध्वजारोहणाचे वेळी वापरल्या जाणार्‍या  फुलाच्या पाकळ्या वगळता अन्य काहीही ध्वजात गुंडाळून ठेवता येत नाही.राष्ट्रध्वज कधीही जमिनीला टेकता कामा नये. जाणीवपूर्वक पाण्यात सोडून देता कामा नये.कमरेखाली वस्त्रा सारखा  किंवा अंतरवस्त्रावर  वापरता येत नाही. मलिन किंवा फाटलेला ध्वज लावता येत नाही.असा ध्वज सन्मान पूर्वक नष्ट करावा लागतो ॰

राष्ट्रपति, पंतप्रधान, चीफ जस्टिस अशा विशिष्ट अति महत्वाच्या व्यक्तींनाच गाडीवर ध्वज लावण्याचा अधिकार आहे.प्लॅस्टिक ध्वजांचे एक फॅड आले होते .प्लॅस्टिक एकतर सहजासहजी नष्ट होत नाही आणि मग ते ध्वज  पायदळी  जातात. ते टाळणे आवश्यक आहे.राष्ट्रध्वजाचा व्यावसायिक वापर करता येत नाही.सभास्थळी राष्ट्र ध्वज लावायचा असेल तर तो वक्त्याच्या उजव्या हाताला असावा    असा  दंडक आहे.राष्ट्रध्वजावर नक्षीकाम करणे, लिहिणे गुन्हा आहे.राष्ट्रध्वजाच्या अवमाना साठी तीन वर्षापर्यंत  तुरुंगवासाच्या शिक्षेचे प्रावधान  आहे.

शहिदांना अंतिम निरोप देताना , त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटलेले आपण पहातो . त्यामागे कारण असे आहे कि त्या जवानाने राष्ट्रहितार्थ , संरक्षणार्थ selfless  service  दिलेली असते.,प्राणांची बाजी लावलेली असते.. त्यासाठी हा सन्मान. परंतु शहिदाच्या पार्थिवावर  लपेटलेला तिरंगा कधीही पार्थिवासोबत नष्ट केला जात नाही. अंतिम संस्कारा वेळी सन्मानपूर्वक काढून घेऊन, विशिष्ट प्रकारे घडी घालून शहिदाच्या  आप्तस्वकीयांकडे सुपूर्त केला जातो.

काही वेळा बिगर लष्करी  नागरिकाच्या पार्थिवला तिरंग्यात लपेटलेले पाहिल्यावर अनेक शंका कुशंकाना उधाण येते . श्रीदेवी चे पार्थिव तिरंग्यात लपेटले म्हणून खूप वादंग झाले होते. परंतु तिचे भारतीय चित्रपट सृष्टीला मोठे योग दान आहे.  चित्रपट हे भारतीय संस्कृतीचे एक अंग आहे. कलाकाराने दिलेल्या योगदानाचा तो सन्मान असतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्याचा अधिकार असतो.

राष्ट्र ध्वज म्हणजे उंच स्तंभावर वार्‍यावर लहरतो तो, इतकाच मर्यादित अर्थ राष्ट्र ध्वज या संज्ञेचा नाही.या संज्ञेत राष्ट्रध्वजाचे चित्र, पेंटिंग,फोटो, किंवा दृश्य स्वरुपातील representation   याचाही समावेश आहे.

राष्ट्रध्वजाचा अवमान म्हणजे, राष्ट्र ध्वज सामुहिकरीत्या जाळणे, भ्रष्ट करणे, फाडणे, तुडवणे, त्याचे विकृतीकसरण करणे या कृतींचा समावेश होतो. लिखित स्वरुपात किंवा वाणीद्वारे अवमान ही गुन्हा आहे.अलीकडेच एका ऑनलाइन शॉपिंग साईट ने तिरंग्यासारखी पायपुसणी बाजारात आणली मात्र सख्त आदेशानंतर माघार घेतली.

राष्ट्रध्वजाचे डिजाइन करताना , रंग संगती ठरवणे , त्या राष्ट्राचा इतिहास संस्कृती याचे संदर्भ वापरणे असे खूप काही  असते. राष्ट्र ध्वज संहिता  आणि तत्संबंधी सर्व पैलूंच्या अभ्यासाची एक शाखा आहे . तिला VEXILLOLOGY  म्हणतात. हा शब्द मूल लॅटिन शब्द VEXILLUM म्हणजे बॅनर , यावरून प्रचलित झालेला आहे.राष्ट्रध्वजाचा अभ्यास किंवा माहिती करून घेणे अतिशय मनोरंजक आहे. 

राष्ट्रध्वज सहसा आयतकृती असतात पण स्वीत्झर्लंड, वॅटिकन सिटि चे मात्र चौकोनी  आहेत.तर नेपाळचा त्रिकोणी आहे.

अनेक राष्ट्रांच्या राष्ट्रध्वजात तीन रंगांचा वापर जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यात ही  पांढरा, लाल, केशरी, नीळा हे रंग अधिक दिसतात.पण पर्पल  रंग मात्र नसतो. एकेकाळी हा रंग तयार करणे आत्यंतिक खर्चिक बाब होती म्हणून असावे कदाचित. 

भारताच्या राष्ट्रध्वजाला आपण कौतुकाने तिरंगा म्हणतो पण थायलंड चा सुद्धा" ट्राय रोंग " आहे, बलगेरिया चा Balgarski Trikolyor   आहे. अशीच अनेक देशांच्या  ध्वजांची लाडकी अनऔपचारिक   नावं आहेत. कुवेत चा "DERTI "म्हणजे   My  Land/My  Nation. नेपाळचा "पहाडी "तर जपानचा" Hinomaru किंवा Nisshoki."

आपापला राष्ट्रध्वज प्रत्येकाला आवडतो च  पण काही तर फार सुरेख आहेत. Fernleaf  असलेला  New zealand चा, Maple leaf  असलेला कॅनडाचा   अगदी देखणे आहेत.तुर् मेनिस्तानच्या  ध्वजावर अतिशय नाजुक नक्षी आहे तर hongkongच्या ध्वजावर Bauhinia   blackeana  या orchid ल स्थान मिळाले आहे.

तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकृत होण्याच्या वेळी घटना समितीत अनेक चर्चा झाल्या. राष्ट्र ध्वज म्हणजे काय यावर तज्ञांनी मते मांडली. पंडित गोविंद मालविय म्हणतात तस राष्ट्रध्वजाचे रंग, आकार किंवा अन्य गोष्टी महत्वाच्या नसतात. एखादा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून स्वीकृत होतो  तेव्हा तो राष्ट्राच्या गौरवाची , अभिमानाची, अभिव्यक्ती असते.त्या राष्ट्राच्या स्वतंत्रतेची ग्वाही असते. 

पूर्व राष्ट्रपति  आर वेंकटरामन यांनी "Our  National  Flag " या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले,आपला राष्ट्रध्वज हा एक आशीर्वाद ( Benediction)आहे.एक मार्गदर्शक  बिन्दु  Becon  आहे.राष्ट्रध्वज म्हणजे स्वातंत्र्य संग्रामात ज्या वीरांनी आहुति दिली त्या महान  आत्म्यांचे  आशीर्वाद आणि एक न्यायप्रिय, एकसंध भारताचे स्वप्न पूर्णत्वाला नेणारा मार्गदर्शक मानबिंदू.

धर्म , जात, लिंग, या पलीकडे जाऊन शांततामय सहजीवनाची पुनर्स्थापना  होण्यासाठी एक समर्पित भावना सतत जागति राहावी यासाठीच राष्ट्रध्वज असतो. रबीन्द्रनाथ टागोरांची गीतांजली मध्ये एक कविता आहे  

"चित्तो  जेथे भयशून्यो ."

 स्वतंत्र जागृत नवभारताबद्दल चे स्वप्न सांगणारी ...

"जिथे शब्द सत्यतून अवतरतील,

जिथे तारतम्य नाश्ता झालेले नसेल,

जिथे चित्त भयशून्य असेल..."

अशा आशयाची .

प्रत्येक भारतीयाचे" भयशून्य चित्ताचे स्वप्न" तिरंग्याच्या छत्रछायेतच आहे.



Adv Seemantini Noolkar




रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

निळे घाटमाथे निळ्या राउळांचे


 निळे  घाट माथे..... 




  



करिमकुरिंजी



पश्चिम घाटाच्या, दक्षिण टोकाची १५०० मी उंचीची सदाहरित पर्वत राजी म्हणजे नीलमलाई – शोला ग्रासलँड…! “शोला”चा एक अर्थ छाया आणि दुसरा अर्थ आहे वसंत ऋतु .शोला मधली वृक्षराजीची कॅनोपी  इतकी घनदाट आहे की सूर्यकिरणांना अजिबात खाली झिरपू देत नाही ,शीतल छाया देत रहाते आणि शोलामध्ये वसंत ऋतु नेमाने अवतरत रहातो.या शोलामध्ये, नीलमलाईमध्ये, विशेषत: एराविकुलम नॅशनल पार्क, अन्नामलाई, अगाली हिल्समध्ये दर बारा वर्षानी नीलकुरींजी बहरते॰ हे  नीलकुरिंजीचे माहेरघर ! 
केरळला २०१८ साली पावसाने अक्षरश: धुवून काढले होते. एयरपोर्टही पाण्याखाली गेला होता. नेमकं दर बारा वर्षानी फुलणार्‍या, नीलमलाईला नील वर्ण बहाल करणार्‍या नीलकुरिंजीच्या पुष्पबहराचे हे वर्ष. नीलकुरिंजीच्या निळ्या निळ्या कळ्या पांघरून पहुडलेला,  नीलकुरिंजी अंगोपांगी माखलेला  नीलमलाई मला कोणत्याही परिस्थितीत पहायचाच होता. मध्येच चार सहा दिवसांची उसंत पावसाने दिली, एयरपोर्ट सुरू झाला आणि हायसं  झालं. तातडीने केरळ गाठलं. वाहून गेलेले रस्ते, जागोजाग कोसळलेल्या दरडी …..निसर्गाचे प्रलयंकारी रूप साक्षात समोर होतं.                      

पावसाच्या तांडवात नाजुक साजूक नीलकुरिंजीचे काय झाले असेल, अशी एक धाकधूक मनात घेऊनच गेले. पण नीलकुरिंजी अनावर फुलली होती. नीलकुरिंजी शोलाला वणव्यांपासून वाचवते, मातीची धूप रोखते, आणि नीलमलाईच्या आदिम लेकरांशी तर तिचे जिवाभावाचं सख्य आहेच. अशा या नीलकुरिंजीला, निसर्ग फुलण्यापासून कसं रोखेल? प्रतिकूल परिस्थितीत तगून राहण्यासाठी डावपेच लढवण्याची उपजत किमया वंनस्पतीकडे असतेच.
घंटाकार निळ्या फुलांचा फुलोरा मिरवत नीलमलाई, धुक्यात आबदार पहुडला होता. इतकी अनोखी फुलं आजूबाजूला फुलली होती पण नीलकुरिंजीच्या निळ्यासावळ्या रंगाची, धुक्याची निळी भूल मनाला  पडली होती. ग्रेसची “निळाई” अनुभवावी ती इथेच. खरंचच नीलमलाईवरच्या निळ्या मंदार पाऊल वाटा हाकारत होत्या..

निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाऊल वाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणाला

या वर्षीच्या पुष्पबहराचं वैशिष्ट्य म्हणजे नीलकुरिंजीच्या बहराबरोबर शोला कुरिंजीचाही बहर होता. शोलाकुरींजी दर दहा वर्षानी फुलते आणि नीलकुरींजी १२ वर्षानी. दर साठ वर्षानी दोघींच्या एकत्रित बहराचं वर्ष येतं.  

नीलकुरिंजीच्या उन्मुक्त बहरामागे एक कारण आहे. ती बांबूसारखीच मोनोकारपिक वनस्पति आहे. बांबूला ठराविक वर्षानी एकदाच उन्मुक्त बहर येतो आणि लयबद्ध बीज निर्मिती होते. जणू जन्माची इतिकर्तव्यता होते  आणि बांबू मरून जातो. त्याला “मातम” म्हणतात. नीलकुरिंजीच्या नशिबीही उन्मुक्त बहरानंतरचा, बांबूसारखाच ‘मातम’ असतो. नीलकुरिंजीला म्हणूनच कमाल बीज निर्मितीचा ध्यास असतो.त्यासाठी परागीभवन, पराग हस्तांतरण व्हायला हवे. त्यासाठी नीलकुरिंजी तिचा मधुरसाचा खजिना पणाला लावते. या खजिन्याची सर्वात जास्त भूल पडते ‘एपिस सेरेना’या मधमाशीला. नीलकुरिंजीच्या फुलाचा आंतरभाग या मधमाशीच्या स्पर्शाला संवेदनशील असतो. तो स्पर्श होताच नीलकुरिंजी आपला पराग खजिन्याचा भार रिता करते. मधुरस आकंठ पिऊन, परागकणाची भेट स्वीकारून मधमाशी पराग हस्तांतरणाच्या मार्गाला लागते.या सगळ्यात स्वपरागीभवन होऊ नये याची काळजीही कुरींजीपुष्प घेते. हा सगळा एक रंगमंचीय आविष्कारच असतो.ही प्रक्रिया जशी आश्चर्यात टाकते तसच नीलकुरिंजीला तिच्या बहराचं नेमकं वर्ष कसं  समजतं ,हेही एक आश्चर्य आहे.वनस्पतींची स्वत:ची अशी एक कालमापन यंत्रणा असते. 
नीलकुरिंजीचे शास्त्रीय नाव स्त्रोबिलॅनथस कुंथिनस. नीलकुरिंजीचा पहिला  बहर १८२६ साली नोंदला गेला. नीलकुरिंजीच्या  जगभरातल्या ४५० स्पिसीस पैकी ४२ केरळमध्येच आहेत .एक पांढरी ‘करीम कुरींजी’ ही केरळमध्ये आहे. आपल्याकडची सह्याद्रीतली कारवी, नीलकुरिंजीचीच बहीण. सह्याद्रीत कारवी अशीच पाच, सात वर्षानी बहरते तेव्हा “नीळ  आली, नीळ  आली’ अशी हाकाटी रानोमाळ उठते.
नीलगिरीत तोडा, मुथुवा, इरूला, बदागा या आदिम जमाती रहातात. त्यांचा देव मुरूगन॰ म्हणजे कार्तिकेय .. या मुरूगन देवाचे फूल म्हणजे नीलकुरिंजीपुष्प. म्हणून त्याला ‘कुरींजी अंदावार’ – कुरींजी देवता म्हणतात.या आदिवासी जमातीच्या  जगण्याशी, प्रेमाशी  नीलकुरींजीचं अनोखं नातं आहे. मुरूगनने वल्ली या आदिवासी कन्येशी लग्न केलं ते कुरिंजीमाला घालूनच ! या जमातीचं वय मोजण्याचं परिमाण नीलकुरिंजीचे बहर असतात॰ एखाद्याने नीलकुरींजीचे किती बहर पाहिलेत तितके त्याचं वय..! वयच नव्हे तर पिढ्याही याच प्रकारे मोजल्या जातात.
बाराव्या वर्षी यौवनात पाऊल  टाकणार्‍या नवयुवतीला होणार्‍या  स्त्रीत्वाच्या जाणिवेचा संदर्भ या बारा वर्षानी येणार्‍या बहराशी तोडा जमात जोडते.इतकेच नाही तर अंतिम संस्काराच्या वेळी मृताच्या हातून अनवधानाने नीलकुरींजीच्या फांद्या, फुलं, तोडली गेली असतील तर त्याच्या वतीने क्षमायाचना केली जाते.

नीलकुरींजीच्या फुलांचे,बहराचे धागेदोरे  प्राचीन साहित्यात सापडतात. दुसर्‍या-तिसर्‍या शतकातले तमिळ संघम साहित्य आणि नीलकुरींजी यांचा एक अनोखा रेशीम बंध आहे.

तेव्हा केरळ आणि तमिळनाडू एकत्रित असं तमिलाकम होतं. या तमिलाकमच्या तमिळ संघम साहित्यातली एक अद्भुत काव्य संकल्पना  म्हणजे तिनाई. तिनाई म्हणजे एक काव्यात्म लँड स्केप आहे… म्हटलं तर भौगोलिक म्हटलं तर प्रेमकाव्य.तिनाई जेव्हा स्फुरते तेव्हाचा ऋतु, समय, स्थळ यांचा उल्लेख तिनाई  काव्यात असतो. या पार्श्वभूमीवर, त्या  त्या ऋतुत उमलणारी फुलं, पशुपक्षी,आदिम रिती, देवदेवता अशा सार्‍या गोष्टी तिनाई  काव्यात असतात.या तिनाई प्रेम-प्रणय भावनांशी निगडीत असतात. तिनाई काव्यात कुरींजी, मुलाई, मरुथम, पालाई  आणि नेयतल  तिनाई अशा पाच तिनाई आहेत. मुलाई तिनाई म्हणजे तमिलाकममधली वनं, जंगलं जी प्रेमिकांची एकमेकांची आतुरतेने वाट पाहण्याची जागा.मरुथम म्हणजे पिकाऊ जमीन —प्रेमिकांच्या लाडिक कुरबुरीची जागा.नेयतल म्हणजे तमिलाकमचा विस्तीर्ण समुद्र किनारा.. विरहाचे प्रतीक! पालाई तिनाई म्हणजे दूरत्व सांगणारा  तमिलाकमचा वैराण प्रदेश.कुरींजी तिनाई म्हणजे मिलनाचे मनोहारी स्थळ.या प्रत्येक तिनाईचे एक फूल आहे. कुरींजी तिनाईचं फूल अर्थातच नीलकुरींजी. नीलकुरींजी मीलनाचा सांगावा देण्यासाठीच फुलते.
कर्नाटकातही सांडूरू हिल्समध्ये नीलकुरींजी फुलते आणि कर्नाटक संगीतात एक कुरींजी रागही आहे. नीलकुरींजीच्या या भरजरी वारशाची जाण म्हणून भारत सरकारने एक पोस्टल स्टॅम्पही काढला आहे.

केरळ मधला एकमेव अजेंडा नीलकुरिंजी हाच होता. डोंगर रांगातून फिरत मनसोक्त नीलकुरिंजीचा बहर अनुभवण्याचं अमाप सुख लुटलं.
नीलकुरिंजीचा निळासावळा रंग मनाला एक असीम शांती देत होता. ,अलगद ‘पैल’ घेऊन जात होता .ऑस्कर वाइल्ड म्हणतो, रंग हजार तर्‍हानी आत्म्याशी संवाद साधतात. नीलमलाईमध्ये अथांग पसरलेल्या नीलकुरींजीचा  नीळवर्ण हीच अनुभूति देतो.ही अनुभूति शब्दात मांडता येणंच शक्य नाही. ज्ञानेश्वरांच्या शब्दातच सांगायचं तऱ…..

नीळवर्ण रजे नीळवर्ण बुझे I
निळीमा सहजे आकारली II
नीळप्रभा दिसे नीळपणे वसे I
निळीया आकाशे हारपले II
निळेपण ठेले निळीये गोविले I
केवळ आणि केवळ अलौकिकाची अनुभुती. अलौकिकाचा अलवार स्पर्श.
नीलमलाईच्या पर्वतराजीतून  वहात येणार्‍या निळ्या वार्‍याचा स्पर्श, नीलकुरींजीचा निळा सावळा असर यापुढच्या आयुष्यात सतत अखंड सोबत रहाणार आहे.

–  ©️ अ‍ॅड. सीमन्तीनी नूलकर




पूर्व प्रसिद्धी        http://maitri2012.wordpress.