बरसन लागी
बदरिया रुमझुमके........
सरत्या
उन्हाळ्यापासून झाडं –वेली ,पशू-पक्षी, माणसं, मान्सूनच्या काजळकाळ्या मेघांची वाटुली , डोळ्यात प्राण आणून पाहत
असतात. इतकंच नव्हे तर डोंगर रांगांवरचे काळे कातळ , जांभळसडे, मातीही,मान्सून कडे डोळे लावून बसलेले असतात.उन्हाळी आकाशातलं रंगसोहळ्याचे अप्रूप संपलेले असतं . कधी एकदा
हे रंग फिकूटतील, कधी घनघनमाला दाटून येतील, अशी आस लागलेली असते.आकाशपटावर पर्जन्यनांदी करणार्या मेघज्योती-मेघरेखांची ओढ लागलेली असते. आकाशातली निमालेली निळाई, बिटल्सच्या पंखांवर, मोरपिसांवर, कबुतराच्या वेळावत्या मानेवर उमटताना दिसायला लागली
की पावसाचे संकेत मिळायला लागतात .
मान्सून भारताच्या नसानसात,मनांमनात,संस्कृतीत रुजलेला आहे. संपूर्ण लोकजीवन त्याभोवती केन्द्रित आहे. म्हणूनच मान्सून अनुभवणं, मान्सून उतरताना पाहणं , मान्सून सोबत प्रवास करणं, सगळंच अंतर्मुख करणारं असतं. पावसाच्या निव्वळ संकेताने चैतन्याचे कोंब रसरसतात॰
मान्सून येतो कसा हे पाहायचं तर गोव्याचा
किनार्यावरच.या वेडापायी किती दिवस बागा बीचच्या किनार्यावरच्या shack वर मुक्काम टाकला होता ते नाही आठवत, पण एका भरून आलेल्या संध्याकाळी अचानक
, ताशाचा तडाम
तडाम आवाज यायला लागला. . shack वाला म्हणाला , “आला, मान्सून
आला, आडोशाला पळा”. पण तो येतो कसा हेच तर पाहायचं होतं. उफाण
दर्यावरून चाल करून येणार्या मान्सूनच्या
रौद्र कृष्णपटाने पावलं जागीच खिळली. रुमझुम
बदरिया, बिजुरिया असले नाजुक साजूक शब्द मनातून पाला पाचोळया
सारखे उडून गेले. . . .
मान्सून हे
भारतीय उपखंडाचे वैशिष्ठ्य आहेच पण भारतीय उपखंडाला पडलेलं अवघड कोडंही आहे . मान्सून कधी बरसेल, किती येईल ,कोण कोणत्या भौगोलिक क्षेत्रावर मेहेरबान होईल , याचे आडाखे सोपे नसतात. “मौसीम” या मूळ
अरबी शब्दावरून मान्सून हा शब्द रूढ झाला आहे. मौसीमचा अर्थ वर्षातून एकदा येणारा ऋतु - मान्सून! मान्सून म्हणजे
भारतीय लोकसंस्कृतीचा चौमासा ! आषाढ ते अश्विन असा चौमासा.
भारतात
मान्सूनचं पहिलं ओलेतं पाऊल पडतं ते थिरुवनंतपुरम मध्ये . मान्सून येतो एका सुंदरीच्या ओढीने ....कालिदासाने
रघुवंशात, या सुंदरीचं वर्णन, हिरवा शालू लेऊन
पहुडलेली सुंदरी असं केलय. ही सुंदरी म्हणजे जैविविधतेचा अफाट खजिना , जैविक ऐश्वर्याचा संपन्न आविष्कार साक्षात दाखवणारा पश्चिम घाट! या सुंदरीचं मस्तक म्हणजे
कन्याकुमारी , उन्नत स्तन म्हणजे नीलगिरी आणि अन्नामलाई आणि
नितंब-कटी प्रदेश म्हणजे गोवा-कारवार !
अशा या सुंदरीला नैऋत्य मान्सून हळूहळू
कवेत घेत जातो.
पश्चिम घाटाची जैविक संपन्नता केवळ आणि
केवळ मान्सूनवर अवलंबून असते. म्हणून
मान्सूनचे वेध ! तो कधी येणार, किती येणार याचा लेखा जोखा म्हणूनच ही
सुंदरी, संपूर्ण
पश्चिम घाट मागत असतो.
मान्सूनबद्दल भाकीत करण्याच्या विकसित शास्त्राधारीत
पद्धतीबरोबरच पारंपरिक प्राचीन पद्धतीही आहेत.ढग, ढगांचे रंग आणि आकार , दिशा, गडगडाटाचे आवाज,इंद्रधनू
यावरून पावसाचे भाकीत करतात. त्याला आंतरीक्ष पद्धती म्हणतात तर भूमीवरचे कीटक,पशुपक्षी, फुल-झाडं यावरून भाकीत करण्याची ती भौम
पद्धती.कित्येक शे वर्षांपूर्वी
वराहमिहिराने या पद्धती मांडल्या.त्याच अबेरक्रम्बी हिल्ड ब्रॅंडसनने 1887 मध्ये
नव्याने सांगितल्या. नव्या बाटलीत जुनी दारू!
स्थानिक लोक,
शेतकरी,आदिम जाती-जमातींची स्वतःची परंपरागत, निरीक्षणे, ठोकताळे असतात. प्राचीन साहित्य,
लोकसाहित्यात निसर्ग निरीक्षणावर , नित्य अनुभवावर
आधारित काही पर्जन्य आडाखे
आढळतात.कौटिल्याच्या अर्थशास्त्रात , वराहमिहिराच्या
बृहतसंहितेत वर्षाविषयक सिद्धांत आढळतात. वराहममिहिराने गर्ग, कश्यप अशा ऋषिंचा उल्लेख ‘वर्षा वैज्ञानिक’ असा केला आहे. पद्धत कोणतीही असो, पावसाचे संकेत समजून घेणं आणि पाऊस अनुभवण, महत्वाचं.निसर्गाच्या,लोकसंस्कृतीच्याजवळ गेल्याशिवाय निसर्गाची ही भाषा,
लोकसंस्कृतीचे हुंकार समजत नाहीत हे खरं !
कर्नाटकात चिकोडीला माझं जाणं येणं असतं
. जूनच्या सुमाराला, पावसाचे वातावरण तयार झाल्यावर तिथे गेलं की शेतावर काम करणारे
म्हणतात, “ आक्का पावसाचा आकार आला बरका. . .” पावसाचा आकार हा इतका गोंडूस शब्द आहे . कळलच पाहिजे पाऊस उतरलाय ते !
पावसाची चाहूल नुसता हंगामा उडवून देते .
एकदा काझीरांगात अंधार पडता पडता जंगलात
भटकंती करून परत येताना जमिनीवर प्रकाशाचे रुजामे अवचित सामोरे आले .. काझीरंगात काजवे पावसासाठी रुजामे अंथरतात तर पश्चिम घाटात पावसाच्या आगमना प्रीत्यर्थ काजुले रानाडोंगरातून
आपल्याच कैफात पालख्याच घेऊन निघतात. काजुले म्हणजे पावसाचे मातब्बर संकेत.
पाऊस संकेत समजून घेण्यात कीटकांची वर्तन
शैली महत्वाची असते. तर कोळी, वाळवी ,मुंग्या, हुमले, काजवे ,मृगकिडे अशा अनेक
कीटकांना वातावरणातले बदल अचूक समजतात.वार्याचे बदलते प्रवाह , हवेचा दाब,आर्द्रता यांचा त्यांना चांगलाच सेन्स
असतो.त्यांचाही एक आतला आवाज असतो.
पावसापूर्वी बेगमीसाठी मुंग्यांची लगबग सुरू होते. तोंडात पांढरी अंडी घेतलेल्या काळ्या तुरतुऱया मुंग्या पळत असतात .पानांची घरटी विणणारे हुमले पानं शिवण्याच्या उद्योगात गर्क होतात. अंधार पडता पडता अनवट वाटा अचानक दुमदुमून उठतात . हा असतो सिकाडा आणि क्रिकेटचा ऑर्केस्ट्रा. पावसाचे येणं साजरं नको करायला?
मृग लागता लागता ,धरणीसाठी
इंद्राचे ,पावसाच्या आगमनाचे शुभशकुनी
संदेश घेऊन, इंद्रगोप येतात. इंद्रगोप म्हणजे
मृगाचे किडे. केशरी मखमली पोशाख घातलेल्या या इंद्र गोपाना scarlet lady म्हणतात. तर तेलुगूमधे म्हणतात “आरुद्र पुरुगू “.आरुद्र म्हणजे मोसमी, पुरुगू म्हणजे कीटक —मोसमी कीटक! फक्त मोसमी पावसाच्या तोंडावर हा दिसतो.
शेतकरी या इंद्रगोपांच्या मागावर असतात . हे इंद्रगोप जसे अज्ञातातून प्रकटतात तसे
अज्ञातात दिसेनासे ही होतात . ते दिसेनासे झाले की शेतकरी पेरणीच्या मागे लागतात.
कोकणातल्या ,
किनारपट्टीच्या लोकांचे अवघे जगणे मासळीशी निगडीत.पावसापूर्वी समुद्र किनार्यालगत
काही विशीष्ट जातीचे मासे उड्या मारताना
दिसायला लागतात. एरवी समुद्रात बिलजांची
रेलचेल असते पण पावसाचे संकेत मिळताच बिलजा बेपत्ता होतात आणि कांटे मासे दिसायला लागतात.माशांची वर्तनशैली कोकणी
लोक, कोळी, मासेमारी करणारे यांच्या
साठीचे पाऊस संकेत असतात.
लापता असणारे बेडूक –दादूर
ही आता दिसायला लागतात. बेडकांवरूनही
पावसाचे एक निरीक्षण आहे. ज्येष्ठात बेडूक जोरजोरात ओरडायला लागले की लवकरच
पाऊस आहे हे ओळखून घ्यायचे. पावसाच्या चाहुलीने ‘दादूर’ लोकगीतातून बोलायला लागतात. एरवी बेडूक काही कोणाला
आवडत नाही पण पावसाच्या चाहुलीने व्याकूळ विरहिणी मोर, पपीहा
बरोबरच दादूरलाही साद घालतात.
“हमारे
सावरीया नही आये, सजनी
छाई घटा घनघोर
दादूर ,मोर,पपिहा बोले, कोयल कर रही शोर “
भारतवर्षात पावसाचा पहिला सांगावा घेऊन येतो तो चातक – कोयल ! Jacobin cuckoo. स्थलांतर करून येणारे हे पाखरू किती एक कवींचे ,
प्रेमिकांचे लाडले आहे. याला मेघपपिहा ही म्हणतात. मेघपपिहा पावसाच्या आगमनाच्या
ललकार्यावर ललकार्या देत रहातो---न थकता.
पावसाचे पुष्पसंकेत आणखीच वेगळे . पावसाचे संकेत फुलांना मिळायला लागले की सुगंधाची उच्चतम उधळण ती करायला लागतात. फुलांची ही मार्दवपूर्ण गंधित भाषा आसमंतात दरवळते .असाच एक पावसाचा गंधदूत म्हणजे ‘द्रौपदीमाला’.झाडा-पानाआडून अवचित निळा जांभळा लांबलचक सुवासिक गजरा डोकावतो . ते ऑर्कीड म्हणजे द्रौपदीमाला . त्याला सीतेची वेणी असेही म्हणतात . खरतर तो सीतेने किंवा द्रौपदीने वेणीवर माळलेला गजराच !
फुलांना दिवसाची लांबी
नीट समजते .किती फुलायचं, कधी फुलायचं हे ठरवण्याचा हक्क ती
आपल्याकडे राखीव ठेवतात.अमलताशाचा बहर हे त्याचे
जातिवंत उदाहरण . अमलताशाची पावसाशी अदृश्य नाळ इतकी जुळलेली असते की
आदिवासींच्या निरीक्षणाप्रमाणे पावसाआधी
40/45 दिवस अमलताशाचा बहर टिपेला असतो. हेच निरीक्षण वराहमिहिराने बृहतसंहितेत
मांडलं आहे.अमलताशाच्या फांद्यांच्या
सांध्यांची (internodes) लांबी वाढलेली असते.किंवा कोस्टस स्पीसीज (पेव)मध्ये
फुलाची लांबी वाढलेली आढळते .पळस म्हणजे गुजराती “केशुदा”. केशुदाच्या बहरावरुन
पाऊस कधी येईल आणि किती येईल हे सांगता येतं॰ प्लांट फेनोलोजीच्या अभ्यासाप्रमाणेही अशी काही निरीक्षणं आहे.
जाई,
प्राजक्ताचे बहर,पावसाच्या आगमनाच्या हिशोबाने ओठंगलेले
असत्तात .पिंपळाचा, महुवाचा इतकच नाहीतर, गवताच्या-दर्भाच्या
पात्याचा ताजवाही पाऊस सूचित करतो.काही झाडांच्या फळांचे पिकणे, पिकून गळणे याचा वेळकाळही पाऊसकाळाच्या
दृष्टीने अर्थपूर्ण असतो.
पावसाचा आकार आला की
सह्याद्रीच्या जांभळसड्यांवरही हलचल सुरू होते.सापकांदे हळूच फणे काढतात.काही
विशिष्ट कंदिलपुष्प वाटावाटावर खडी ताजीम
देतात.भुई आमरी फुलतात .पावसासाठी अशा रानसाजणी सजायला लागतात.
पावसाचे आगमन जसं ही
फुलं सूचित करतात तसं निर्गमन ही ! पावसाच्या झडीवर झडी लागल्या आहेत, पाऊस
आता आयुष्यभर थांबणार नाही, असा माहोल असतो आणि निलगिरी-शोला मधले आदिवासी
छातीठोक पणे सांगतात “ आठ दिवसात पाऊस
जाणार”. कारण तेव्हा नीलगिरी -शोला मध्ये M.nilgirica (mawrsh) चे बहर जंगलभर
फुललेले त्यांनी मनोमन नोंदलेले असतात.
या अशा अनेक जैविक घटकांप्रमाणे अजैविक घटकही पावसाचे संकेत देतात . ढग,
ढगांचे रंग आणि आकार , दिशा,
गडगडाटातून ध्वनित होणारे आवाज “मायने” रखतात.लहानपणी ढगात सुसर, हत्ती,कासव पाहण्याचा एक छंद असतो.पण या आकारांचेही
अन्वयार्थ असतात. निळे पिवळे ढग दीर्घकाळ
पाऊस दर्शवतात .ढग ईशान्येला असतील तर
उत्तम धान्य आणि नैऋत्येला असतील तर
धान्यनाश ! मेघांचे आकार, पाणी धारण करण्याची क्षमता
यावरुन मेघाना अभ्रतरु, अंबुवाह, जीमूत , वारिवाह अशी
सुंदर नावं आहेत.
लोकसाहित्यात पर्जन्यभाकिते करणारे लोकज्योतिषी हा एक अतरंगी
प्रकार आहे.महाराष्ट्राच्या लोकसाहित्यात “सहदेव
आणि भाडळी” ही लोकज्योतिषांची एक जोडी
आहे . सहदेव भाडळीच्या पर्जन्यभाकिते सांगणार्या “मेघमाला”
या रचना, आद्य ओवीबद्ध रचना मानल्या
जातात . पर्जन्यभाकिते करणारे लोकज्योतिषी
आख्ख्या भारतभर आढळतात.भाडळी गुजरात, राजस्थान, पूर्वभारत,हरयाणा,
उत्तरप्रदेश,बिहार मध्ये भडळी, भंदली,भाजली अशा नावांनी आढळते. तर भाडळीचा सहचर राजस्थानात डंक,बंगाल मध्ये डाक,उत्तर भारतात घाघ म्हणून ओळखला
जातो.
”घाघ” या लोकज्योतिषाच्या पाऊस संकेताच्या दुनोळया-चारोळया आहेत.पाऊस जास्त होणार हा हिशोब वाळवीचा असेल तर ती झाडावर तिचं मातीचं घर करते ॰ पण वाळवीच्या आडाख्यापेक्षाही जास्त पाऊस असतो कधी कधी.वाळवीच्या वर्तना वरून पाऊस जास्त हे नक्की पण किती याचे घाघचे आडाखे वेगळे.तो म्हणतो, वैशाखात पाऊस पडला तर इतका पडेल की तेंसुल वृक्षांवरची वाळव्यांची मातीची घरं धुवून जातील.
बैसाख छुवाई,
तेंसुल धुवाई l
“रोहिणी बरसे, मृग
तपाई
कुछ दिन
आर्द्रा जाये
कहे घाघ, सून
घाघनी
स्वात भात
नाही खाय “
म्हणजे रोहिणी नक्षत्रात पाऊस बरसला पण
मृगात तलखी झाली, आर्द्रा ही काही दिवस कोरडेच गेले तर संपूर्ण खरीप हंगामात , सर्वत्र
चांगला पाऊस आहे . पर्जन्यभाकिते मांडताना
केलेले ,उलटा बादल
चढा , तितरपंख
मेघा ,असे कितीतरी उल्लेख मोहवतात.
लोकगीतात, संगीतातही पावसाची चाहूल, भरून आलेल्या मेघांमुळे विरहिणीला आलेली व्याकुळता,कजरी, बारोमास गीतातून दिसते. ‘कजरी’ तर पावसाच्या चाहुलीची,
पावसाची, पावसात जाणवणार्या विरहाचीच गाणी आहेत.काजळाच्या
रंगाच्या मेघांवरून” कजरी”किंवा “कजली” हे नाव या गीत प्रकारला पडलय.बनारस आणि मिर्झापूरची
कजरी जातीवंत कजरी. “झिर झिर बरसे सावनमे रस बूंदिया” किंवा “झिमिर झिमिर पानी बरसे”
सारख्या कजरी ऐकतच राहाव्या. भावना पोचताना ,भाषेचा अडसर
येतच नाही. “झिमिर झिमिर पानी बरसे” हे पूर्वांचलचे सरगुजिया लोकगीत आहे .
पाऊसधारा इतक्याच “बूंदिया”, “बूंदरिया”
लोकगीतात हिर्यासारख्या चमकतात. कुमारजींची
गौडमल्हारातली एक चीज आहे . “अमरईय्यनके बिरखनके पातनपर पटभीजनासी बूंदरिया चमके. . . “आमराईतल्या वृक्षांच्या पानांवर काजव्यांसारखे
पावसाचे थेंब चमकतात. . . “ इथं श्वास रोखून थांबयचच!
लोकगीत असो नाही तर खलील गिबरानचे Song of
Rains असो.. पाऊस, पाऊसधारा, पाऊस थेंब तसेच भुरळ घालतात. कोणीतरी गिबरानच्या
Song of Rains चा स्वैरानुवाद केलाय .. . पाऊसधारा
म्हणजे ,“ रजत सूत्रमे
पिरोई बूंदे ”
पाऊसधारात चिंब झाल्यावर , शुभमीता
बानर्जीचे लाडिक लाडिक “बरसन लागी बदरिया रुमझुमके” ऐकल्यावरच माझा पाऊस पूर्णाथाने सार्थकी लागतो, हे मात्र मला कळून चुकलय.
अॅड. सीमंतीनी नूलकर
9822323847
संदर्भ :
1.फुलांचं बहरणं,बीजनिर्मिती,पानं , झाडांची खोडं, internodes मधलं अंतर यांचा अभ्यास ,पर्यावरण ,हवामान बदल या अभ्यासाच्या दृष्टीने
Phenology या शास्त्रशाखेत आहे. फेनोलोजी म्हणजे एक
प्रकारे Science of appearance of Plants.
2. .लोक्ज्योतिषांची पर्जन्यभाकिते
या विषयावर डॉ. रविशंकर, डॉ.
जगदीश्वर रेड्डी,
अशा अनेकांनी काम केलेलं आहे .
Please enter your Email address with your comments so that new post can be intimated through Email.


