रविवार, २६ जुलै, २०२०

गंगा , ओ गंगा तुम , बहती हो क्यूं?


दोन तीन वर्षांपूर्वी काझिरंगामधे समोर  पसरलेलं ब्रम्हपुत्रेचं विशाल विस्तीर्ण पात्र पाहिलं आणि आपोआप मनात भूपेन हजरिकांचे गाणे सुरू झालं होतं.
"ओ गंगा, गंगा तुम, बहती हो क्युं?"

गेले काही दिवस आसाम मध्ये पुराचे थैमान सुरू आहे .ब्रम्हपुत्र धोक्याच्या पातळी वरुन वहायला लागली आहे आणि ते पाहून  पुन्हा एकदा तेच गाणं मनात घोळायला लागलं.

मी पहिल्यांदा आसामी भाषेतलं गीत ऐकलं होतं .डोळ्यासमोर अक्षरशः चित्र उभं करतं ते गीत. आजही गाणं मनातून जात नाही पण ते चित्र समोर येणं नको वाटतय.

"बिशतिर्न पारोरे 

अहंक जानोरे 

हाहाकार शिनेयू .

निखब्द निरोबे 

बुढा लोई,  बूआ कियो? 

( ब्रम्हपुत्रा , तुझ्या अपार विस्तिर्ण काठांवर असंख्य लोक आहेत. तू हाहाकार मांडला आहेस आणि तरीहि नि:शब्द वहात आहेस. ओ गंगा, गंगा तुम,बहती हो क्यूं?)

हे गीत असामी, बंगाली आणि हिन्दी मध्ये आहे . भूपेनदा जिला गंगा म्हणून हाकारतात ती म्हणजे आख्खा  आसाम जिच्या जिवावर आहे ती ब्रम्हपुत्रा....म्हणजेच “बुढा लोई” . ब्रम्हपुत्रेला “सिरी लोई”, ‘बार लोई” असं ही म्हणतात . मुळात  ब्रम्हपुत्रा नदी नव्हेच. तिचे पात्र इतके विस्तीर्ण, सागरासारखे आहे की तिला 'नद' म्हणतात. आसामच्या प्रत्येक कुटुंबात एखाद्या  बुजुर्ग माणसाला मान असावा तसा ब्रम्हपुत्रेला आहे . म्हणून तो "बुढा लोई."

आज प्रत्येक आसामी माणूस बुढा लोईला विचारतोय, 

“बुढा लोई, 

बुढा लोई तुमी, बूआ कियो? “

बुढा लोई,  तू असा अनावर होऊन का वाहतो आहेस?लाल लाल पाण्याने का उफाणतो आहेस? 

बुढा लोई,  रागावलाय. बुढा लोईच्या लेकरांना ते समजतय. ते नाराज होत नाहीत. आपल्या जन्मदात्याचं रागव़णं  समजून घ्यायला हवं असं त्याची निष्पाप, लेकरं मानतात.

ब्रम्हपुत्रेच्या प्रार्थनेतही ती लेकरं म्हणतात ,

“ब्रम्हपुत्र, नमोमी,

कभी शांत ,कभी रुद्र.....” 

पण हल्ली हल्ली, बुढा लोईचं रागवणं जरा जास्तच आहे .रागाने लालेलाल होऊन उसळतोय. बुढा लोईला आपल्या अंगाखांद्यावर बागडणार्‍या लेकरांचीही फिकीर नाही़सं झालय. दोन्ही तीरांवर हाहाकार मांडलाय नुसता.  वृक्षच नव्हे तर माणसंही उन्मळून पडली आहेत. काझिरंगात र्‍हायनो, हत्तींची कलेवरं पुराच्या पाण्यात तरंगत आहेत. रागावलाय बुढा लोई? माणसाने निसर्गाचा मांडलेला विध्वंस पाहून?त्याचा रुद्रावतार पाहून आता लेकरांचाही धीर सुटलाय.

पोरं जशी शेवटी आईवरच चिडतात, रागावतात आणि तिलाच खळीला  येऊन का रागवतेस सारखी, म्हणुन जाब विचारतात ,तसंच बुढा लोई ची लेकरं त्याला विचारात आहेत,

"बिस्तार है  अपार, प्रजा दोनोपार,

करे हाहाकार ,

ओ गंगा, गंगा तुम, बहती हो क्युं?

निशब्द सदा , ओ गंगा तुम बहती हो क्यू?

निसर्गाचा नाश, माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी केलाय. माणसाची नैतिकताच नष्ट झालीय... मानवता संपून गेलीय....

"नैतिकता नष्ट हुई , मानवता भ्रष्ट हुई,,

इतिहासकी पुकार, करे हुंकार  

निर्लज्ज भावसे बहती हो क्यू?

ओ गंगा की धार, 

निर्बल जनको ,सबल संग्रामी, समयोग्रामि

बनाती नही क्यू? 

बुढा लोई, तुझी लेकरं हतबल निर्बल  झाली आहेत. तूच त्यांना सावरायला , धीर खंबीर बनवायला हवय .....तुला काहीच वाटत नाही का?

तुझ्या अनपढ-अक्षरविहीन लेकरांना खायला अन्न  नाही,झोप नाही. तरी तू मौन का?

बुढा लोई तूच कर आता काही तरी ...

"व्यक्ति रहे व्यक्ति केन्द्रित, 

सकल समाज व्यक्तित्व रहित 

निष्प्राण समाजको, तोडती ना क्यू?"

ब्रम्हपुत्रेचं दरवर्षी पात्र बदलणं, दरवर्षी अफाट पूर येणं  , तसं अंगवळणी पडलेलं आहे. ब्रम्हपुत्रेच्या पुराचे उल्लेख ई. स।1241 इतक्या मागे पर्यन्त  सापडतात. पण 1897 आणि 1950 च्या भूकंपात ब्रम्हपुत्रेचा परिसर हलला. बिथरला.त्यात ग्लोबल वॉर्मिंग, मातीची धूप, अनिर्बंध वाळू उपसा, वृक्षतोड यांची भर .प्रलयंकारी पुराचे थैमान सुरू झाले. 1988 चा महापूर, त्यानंतर 2017 चा. दरवर्षी नवनवीन रेकोर्ड्स! यावर्षी तर आताच 40 लाखांच्या वर विस्थापित झालेत.  शंभरच्यावर मृत्यूमुखी पडलेत.हाहाकार म्हणजे काय त्याचा हा साक्षात अनुभव!

भूपेनदांची  गीतं म्हणजे paintings  असतात.समोर चित्र उभं रहातं. ती लोक संस्कृतीची ,लोकजीवनाची गीतं असतात.

भूपेनदांच्या "ओ गंगा तुम " या गीताची प्रेरणा पॉल रॉबसन या आफ्रिकन-अमेरिकन सिंगरचे एक गाणे आहे....

O !    MAN RIVER,


YOU JUST SAY NOTHING, 

JUST KEEP ROLLING ALONG...

अर्थात त्या गाण्याचे हे भाषांतर नाही . साम्य फक्त एकच आहे. पाॅल राॅबसनचाही "MAN "RIVER आहे आणि भूपेनदांचाही ब्रम्हपुत्र "नद". . बुढा लोई.

भूपेनदांचे गीत बुढा लोईचेच गीत आहे . त्या गीताला आसामच्या बुढा लोईचाच  रंग- गंध आहे.इतकेच नाही तर बिहारच्या कोसी , गंडक चाही रंग -गंध आहे, गंगा-यमुनेचा आहे.गोदावरी- कृष्णेचाही आहे.

ब्रम्हपुत्रेचं  पात्र एरवीही , पावसाळा नसतानाही, डोळे फाटतील इतकं अफाट, अथांग, विस्तीर्ण असतं .एकदा भूपेनदा त्याबद्दल म्हणत होते.. .   “नोदिर कुल नाई ...”.कुल म्हणजे तीर . नदीला तीरच नाहीत असं वाटावं इतके ब्रम्हपुत्रेचे दोन तीर दूर आहेत .बांग्लादेशचे कवि अब्बासुद्दीन तिथे होते . ते म्हणाले, “नोदिर कुल नाई” असं नाही म्हणायचं .

असं म्हण...

“नोदिर कुल ना ssssssssss ई 

नोदिर कुल ना ssssssssssssssss ई”

या तानेतून - हरकतीतून ब्रम्हपुत्रेचे  दोन तीर किती दूर आहेत ते क्षणात उमगतं.

ब्रम्हपुत्रेत चालणारी मासेमारी तिच्या काठावरच्या लोकांच्या जगण्याचा अपरीहार्य भाग आहे.अशाच एका रमय्या  नावाच्या मांझीचे – कोळ्याचे गीत जीव गलबलुन टाकते.

उस दिन की बात है 

रमय्या नाव लेके सागर गया .

त्या दिवशी ‘धुमूआ’ची – वादळाची चाहूल लागलेली पाहून रमय्याची रमणी त्याला म्हणते,

जाल बिछानेको,  जैय्यो न रे, जैय्यो न रे रमय्या, 

तूफान आएगा

आज तडकेसे , दाई आंख फडके रे

रुक जा ना, रुक जा रे ...

आज कुछ हो जाएगा .. 

उस दिन की बात है 

रमय्या नाव लेके सागर गया  ।

धुंध्लोंकी लालीमे , सागरके पानी मे , सागर की लहरोंमे

रमय्या .....गुम हो गया ...

देती है दुहाई रे, छाती पिटे  हाय हाय

रमणी बावली हो गई....

लहर जा मुई, रात पार जा मुई ,लहर जा मुई..

रमय्या का समय हो गया..... रमय्या का समय हो गया...

लहरिया ले तो आई ,

रमय्या की लाश लाई 

लोरी सुनाके गई, 

किनारे सुलाके गई...... 

उस दिन की बात है ....

नुकतच ‘अम्फान’चा तडाखा बंगाल, ओदिशाला बसला , ‘निसर्ग’चा कोकण किनारपट्टीला बसला ..अशावेळी रमय्या आसामचा राहत नाही. तो बंगालचा असतो, ओदिशाचा असतो. कोकणचाही असतो.

यातला रमणीचा परिस्थितीचा acceptance मात्र जीवाला चटका लावून जातो. आसाममधल्या लोकांचं दुःख , असुरक्षित जगणं सांगून जातो.

संपूर्ण पूर्वोत्तर राज्य कायम दुर्लक्षित राहिली.ना रस्ते ,ना पूल , ना जीवनावश्यक सोई सुविधा ! अगदी अलीकडे कित्येक वर्षे प्रतीक्षा असलेला आसाम - अरुणाचल यांना जोडणारा  ब्रीज झाला. या बीम ब्रिजचे नाव “भूपेन हजारीका सेतू” . संपूर्ण पूर्वोत्तर राज्यं म्हणजे आसाम होता एके काळी. हा आसाम भूपेनदांचा श्वास होता.ते म्हणत, “आसाम महाभारतका महाअंग महारूप है "प्राचीन कामरूप, प्राचीन प्रागज्योतिषपूर! या आसामबद्दल त्यांची स्वप्नं होती. इथल्या भूमिपुत्रांच्या जगण्यात  बदल व्हावा यासाठी तळमळ होती.

बिहार , आंध्र, आसाम – सगळीकडे पुराने  थैमान घातले आहे आणि अशावेळी गाणी कसली सुचतात असं कोणाला वाटू शकतं. पण भूपेनदांची गीतं समाजात बदल घडवण्यासाठीच आहेत.  ते म्हणत हाथमे ‘गन’ लेके कुछ नही होगा. इसलीये हमने 'गन 'नहीं “गान’ चुना है l 

आता भूपेनदा  नाहीत.आणि बुढा लोई तर जास्तच रागावायला लागलाय .तो रागावू नये म्हणून काहीतरी करायला हवय. ते “काही तरी’ अर्नब जन देका या आसामी कवीला कळलं आहे. भूपेनदांच्या जातकुळीतलाच आहे तो. Tess Joyce बरोबर त्याचं  एक कवितांचं पुस्तक आहे “A STANZA OF SUNLIGHT ON THE BANKS OF BRAMHAPUTRA” त्यात एक हायकू आहे. प्रातिनिधिक.

"TOUCH THE BLACK SOFT SAND

OF THE FLUID GOLDEN LAGOON

........

DON'T THROW RUBBISH BAGS......     "        

हे मनावर घेतलं तर कुठलाच बुढा लोई कधीच रागवायचा नाही.

(दोन्ही गाणी . . भूपेनदांच्या आवाजातली youtube वर आहेत. एकदा ऐकुन समाधान होणार नाही अशीच आहेत)

Photo:

1. काझिरंगातले पुरात सापडलेले मुके जीव 
2.रमय्या नाव लेके सागर गया. . 

(Photo credit: PTI and Rutu raj Kanwar)

©Adv Seemantini Noolkar





 




सोमवार, २० जुलै, २०२०

ताई ,तुला हौस ग कशाची ? ....... दादा मला हौस रे भात लावणीची

                                                                  चिखलाचा  रेशीमकाला


ताई ,तुला हौस ग कशाची ? .......

दादा मला हौस रे भात लावणीची ...........

पाऊस त्याच्या बरोबर भटकंतीची सुरसुरी घेऊन येतो .त्यातही कोकणातला पाऊस , निसर्ग भटकंतीला नव्या नव्या दिशा देतो .हिरवे हिरवे डोंगर ,कोसळणारे धबधबे ,पाण्याने दुथडी भरलेल्या नद्या ,या साऱ्यातून कोकण खुणावत असतो. या सोहळ्यात एक गोष्ट कायम लक्ष वेधत आली आहे. ती म्हणजे पाण्याने भरलेली भाताची खाचरं!याच भातखाचरांनी, भात लावणीसाठी एका आषाढात मला निवळीला  ओढूनच नेलं.
 चिपळूण -सावर्ड्या जवळचं निवळी हे गाव. निवळीचे खोत सुर्वेंचा निवळीत  दीड दोनशे वर्षांपूर्वीचा भारदस्त घरंदाज वाडा आहे आणि समोर पसरलेली पाण्याने भरलेली भाताची खाचरे. भातलावणीचा अनुभव घेण्यासाठी ,मन अगदी ओढाळ ओढाळ होऊन गेलं .
लावणीसाठी स्थानिक लोक आले होते. 
तरारलेल्या भाताच्या तरुंची आधी मूठ उचलायची होती आणि मग लावणी .तीन -तीन ,चार -चार वेळा नांगर फिरवून मऊसूत झालेला चिखल साद घालत होता आणि दूर झाडीमध्ये पावश्या "पेरते व्हा, पेरते व्हा" म्हणून पुकारत होता .काही कळायच्या आत चिखलात कधी उतरले ते कळलंच नाही .
खोतांची शेतकी विद्यालयात शिकणारी नात बाबूही चिखलात उतरली. तिचे भाऊ, चुलत भाऊ यांची चिखलात कुस्ती रंगली होती .आम्हाला चिखलात उतरलेलं पाहून ,इंद्राक्का खुशीखुशीनं मूठ कशी उचलायची ते शिकवायला सरसावली. मूठ उचलायची म्हणजे भाताच्या  रोपांची गड्डी बांधायची. बांधण्यापूर्वी मुळांचा चिखल खाचरातल्या पाण्यातच खंगळून काढायचा आणि त्याच मुठीच्या पात्यांनी सगळ्या रोपांना एकत्र गाठीत कवळायचे. गाठ इतकी अलवार की लावणी करते वेळी एका हाताने नुसती वर सरकवली की रोपे सळकन मोकळी. उत्सव मधला रेखाचा सोनसळी पोशाखच  आठवला .एक किळ काढता क्षणी सरकन मोकळा होणारा.
भाताचे वाण कुठले ते  माहीत नव्हते .तिथल्या कारभार्‍यानी  सांगितले की ते "एक काडी"बियाणे आहे. म्हणजे सरकारी बियाणे .एक काडी बियाणाची रोपे लावताना एकेकच तरु ,एका ठिकाणी  लावायचे. स्थानिक देशी वाण असेल तर तीन चार किंवा जास्त रोपेही एका जागी लावता येतात..इंद्राक्का म्हणाली ,"एक काडीचे पीक फावतां , इतर फावत नाय"
"घट लावा, घट लावा "असे खोतांनी बजावून सांगितले होते .घट लावा म्हणजे विरळ नको. अंगठा उघडलेल्या मुठीच्या  अंतरावर तरु लावायचे .पुन्हा लावण्याचेही विशिष्ट तंत्र.जरा तिरकेच लावायचे. तरु स्वतःच्या बळावर जीव धरून रुजून उभे राहायला हवे .स्वत:च्या अस्तित्वाचा झगडा स्वत:च द्यायला हवा ,असे साधे सोपे गणित .
पाऊस मेहेरबान होता .लावणी करण्यासाठी आवश्यक तेवढा झाला होता आणि लावणीच्या वेळी हवा तसा ब्रेकही त्याने घेतला.हवे तितकेच भिजायचा आनंदही लुटू दिला .
मुठी उचलून झाल्या .बांध भाताच्या मुठींनी सजले ..कारभाऱयांनी तोपर्यंत पुन्हा पुन्हा नांगर फिरवून चिखलाचा रेशीमकाला केला होता. रांगोळी काढण्यापूर्वी रांगोळीचे ठिपके काढावे तशा रोपांच्या मुठी खाचरात पटापटा मांडल्या गेल्या .
ज्या शिवारात लावणी करायची त्यांच्या राखणदाराचे देऊळ एका कडेला होते .तिथे लावणीच्या पहिल्या दिवशी उंबर आणि कोंबड्याचा  नैवैद्य. उंबर म्हणजे पिकलेल्या फणसाच्या पेस्टमध्ये ,तांदळाची पिठी घालून केलेले टम्म वडे. शिवाय "देणे "म्हणून एक अंडेही ठेवले गेले. हे देणे ज्याचे असते त्याचा तो नंतर घेऊन जातो.या श्रद्धा का अंधश्रद्धा या घोळात शिरण्यात मजा नाही. हा मनाचा निष्पाप पणा आणि कुठेतरी असलेल्या विश्वासाचा भाग इतकेच .
प्रत्यक्षात विचार केला तरी पिकावर आलेल्या शेतावर चौफेर लक्ष ठेवणे अवघडच एकूण.म्हणून मग राखणदाराला साकडे घालून, त्यांच्या भरवशावर सोडायचे. कुणी चोरी मारी करायचे म्हटले तर त्याला या राखणदाराचा धाक असतोच  .
अशा पारंपारिक रिवाजांना डावलायचे तर राखणीला बिनखर्ची तोलामोलाचा पर्याय काय देऊ शकतो, हा प्रश्न उरतोच .या रिवाजामुळे कोणाचे नुकसान नसते, हे लक्षात घ्यायला हवे .सब घोडे बारा टक्के नसतात हे जाणवले.

पहिला टप्पा पार पडेतो ,वाड्यातून न्याहारीची दुरडी आली. तांदळाच्या भाकरीची चवड,चटणी आणि कोलीम! हातावर भाकरी ,भाकरीवर चटणी आणि कोलीम. वरून पाऊस रायाची पाखर! 
चिखलात बरबटलेले हात धुवून ,भाकरी खावी असा विचार होता. विहिरीतले पाणी काढून हात कोपरापर्यंत धुवत असताना मागून ऐकू आले," काय लग्नाला जायचे हाय काय कोपरा पतुर हात धुताव म्हुन इचारला". म्हटलं असो. रोमला गेल्यावर रोमन लोकांसारखे वागावे तर कोकणात गेल्यावर तिथल्या शेतकऱ्यांसारखे का नको ?

काही कसर राहू नये म्हणून काठोकाठ भरलेल्या विहिरीत तांब्या बुडवून वरचे पाणी बाजूला केल्यासारखे करून पाणीही प्यायलं.
न्याहारीनं चांगलीच तरतरी आली .जोमाने लावणीला लागायचे, तेवढ्यात चिखलात काही तरी सळसळले ."जनावर ,जनावर "म्हणून हाकाटी झाली. छोटं  पिल्लूच पण बेणं फडा काढायला कमी करत नव्हतं. शेवटी एकाने पकडून लांबच्या बांधावर सोडून दिलं.
 मध्येच पायात काहीतरी   हुळहुळुन जायचे .इंद्राक्काला विचारले तर म्हणाली ," किरव्या  गो ".किरव्या म्हणजे खेकडे .किरव्यांची पिल्ले तुरू तुरु इकडे तिकडे तिर्रकी तिरकी पळत होती .तेवढ्यात एक मोठीशी किरवी इंद्राक्काने पकडून तिला उचलुन, तिच्या पोटाचा फ्लॅप उघडून दाखवला. "बघ बाय, हिने पिल्ले सोडली हां. पोट मोकळाच असता."कणाकणाने ज्ञानात भर पडत होती .

आणि  गंमत म्हणजे रोपे लावताना एकाग्रता साधत होती मेडिटेशन, मेडिटेशन म्हणजे तरी काय वेगळे असते? तना -मनात भरलेला हवासा गारवा, चिखलाचा मऊसूत बाळ स्पर्श, डोळ्यांना सुखावणारी हिरवाई ,कानावर पडणारे पाखरांचे आवाज, पानांच्या सळसळीचे आवाज. .सभोवतालच्या गदारोळातही मनाला  तरल शांतता अनुभवायला येत होती .

"मैं ऐसे जमघटमें खो गया हूं 
जहां मेरे सिवा कोई नहीं है "
असं आणि इतकच वर्णन त्या अवस्थेचं करता येईल. 

आता कोकणी गाण्यांचा रंग चढत चालला.

." हरिश्चंद्र बोले तारामतेला (म्हणजे तारामतीला)
 मी जातो शिकारीला."

 गाण्यातला हरिशचंद्र शिकारीला गेला आणि तारामती माहेराला .शिकार काही मिळाली नाही .मग तो घरी आला.अंघोळ केली .जेवला आणि झोपला. झोपेत त्याला काळ्या पेटीतला नाग डसला .शेवटी हरीशचंद्र मरून गेला .शेवटी त्या तारामतीचे काय झाले हे त्या कवीलाच ठाऊक .मी काव्य ऐकून अवाक.

 तोच "बोलवा माझ्या दादाला, बोलवा "असे नवे गाणे सुरु झाले . वेगवेगळ्या आवाजात ,सुरात.मध्येच एखादा टिपेचा सूर .दादाला कशाला बोलवा,किती वेळा बोलवा, हे काही कळेना. हसून हसून पुरेवाट. चिखलात लोळायची बाकी होती .

मग पुढचं गाणं...." ताई तुला हौस ग कशाची ? ....... दादा मला हौस रे बांगड्यांची
ताई तुला हौस ग कशाची ? ....... दादा मला हौस रे साखल्यांची
ताई तुला हौस ग कशाची ? ....... दादा मला हौस रे टिकल्यांची "

शेवटी दागिने संपले . मग मी सूर लावला
"दादा मला हौस रे भटकायची "
दादा मला हौस रे भात लावणीची "

कमरेत वाकून रोपे लावता लावता एका क्षणी मनात विचार चमकला ,उद्या काही खरे नाही. वाकलेले कंबरडे काही सरळ व्हायचे नाही .पण गुडघा गुडघा चिखलात, वरून पाऊस पडत असताना, वाक -वाकून रोपे लावूनही, दुसऱ्या दिवशी काही म्हणता काही झाले नाही. कदाचित चिखलात इकडून तिकडे चालत जाण्याचा योग्य व्यायाम कारणी लागला असावा.पाठदुखीवाल्यांसाठी रोज अर्धा तास कमरेइतक्या पाण्यात चालण्याचा व्यायाम आवर्जून सांगतात, तसा किंवा मड थेरपी जिंदाबाद !
लावणी संपता संपता 'मडबाथ' झाला होता. माझ्या सर्वांगाला लागलेला चिखलाचा लेप बघून इंद्राक्का फिदी फिदी हसत होती ."माझ्याकडे पाह्य बाय . . चिकूल दिसतो लुगडय़ाला?" खरोखरच तिच्या लुगडय़ाला कणभर  चिखल लागलेला नव्हता . तिचा फंडा सोपा होता .घरी जाऊन तिलाच लुगडे धुवायचे होते.म्हटल्यावर काळजी स्वाभाविकच होती.कसून नेसलेले लुगडे आणि वरुन टाॅवेल गुंडाळायचा.विषय संपला.पण मला मड बाथची  खूप मजा आली.

तोपर्यंत  अजून एक ज्ञानात भर पडली.दिवस दिवस गारठ्यात उभे राहून लावणी केली तर कधी  कधी पायाला इतक्या मुंग्या येतात की थांबता थांबत नाहीत.त्यावर उपाय एकच. . पायाला डुकराची चरबी चोळायची.लगेच मुंग्या थांबतात. मी आवंढाच
गिळला.नशीबाने तशी वेळ काही आली नाही.

भात लावणी  झाल्यावर उंबर कोंबडीचा बेत सगळ्या लावणीकारांसाठी होता.खोतांच्या हसतमुख लेकीसुनांनी  दिवसभर खपून जेवण बनवले होते.
खोतांचे वय ७० च्या पुढेच होते पण सगळे जेवल्याशिवाय त्यांनी तोंडात घास घातला नाही.हा मायेचा आेलावा आता अभावानेच दिसतो.

अमाप कष्ट  उपसणार्‍या निसर्ग पुत्रांबरोबर जाणिवपूर्वक काढलेला  हा दिवस अविस्मरणिय आठवणी मनावर कोरुन गेला.

©  अॅड. सीमंतिनी नूलकर
 भाताच्या तरुची मूठ




 लावणी पाहायला आलेला पाहुणा
 उंबर कोंबडीचा नैवेद्य
 राखणदाराच "देणं
"



शुक्रवार, ३ जुलै, २०२०

"मै वारी जाऊॅं. . .

मैं वारी जाऊॅं.....

 सातारा जिल्ह्यातल्या आरफळच्या हैबतबाबा आरफळकरांमुळे सातार्‍याचे वेगळेच भावबंध आषाढवारीशी जुळलेले आहेत . हैबतबाबानी वारीला एक शिस्तबद्ध, निययोजनबद्ध आणि वैभवी स्वरूप मिळवून दिले ॰
 आळंदी ते पंढरपूर अशी संपूर्ण वारी एकाचवेळी करणे अनेक कारणांनी शक्यतेच्या टप्प्यातले नाही.म्हणून दरवर्षी एकेक टप्पा! वारीच्या एका टप्प्याचा हा आनंद-अनुभव . आषाढवारीच्या मार्गावर पाऊल टाकल्यापासून एक राजस्थानी भजन मनात घोळत, रेंगाळत होते.

"मै वारी जाऊॅं रे ”

 मै वारी  जाऊॅं,. ..I am overwhelmed... I am blessed. भाषा वेगवेगळ्या असल्या तरी भाव तोच.प्रांतोप्रांतीच्या लोक परंपरांचा पदर एकमेकींशी लागलेला असतो . तिला भाषेचा अडसर नसतो . मराठमोळ्या वारीत ,राजस्थानी भजन क्षणोक्षणी साक्षात अनुभवास येत होते . सर्वजनांच्या प्रवाहात पाऊल टाकताच कुणीतरी पांडुरंगाची मुद्रा कपाळावर उमटवली.आम्ही सोळा सतरा जणी मुद्रांचे अलंकार लेऊन वारीच्या प्रवाहात किती सहज मिसळून गेलो.पुन्हा तेच राजस्थानी भजन....


ब सखी मिलकर आओ 
केसर रा तिलक लगाओ
 गुरुदेवने बधाओ.... मै वारी जाऊॅं रे

 विठ्ठलमय,विष्णुमय , कृष्णमय वातावरण.विठठोबा-रखूमाईचा नाद भरून राहिलेला. नामदेव म्हणतात तसे जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू .. चतुर्भुज नरनारी ....चतुर्भुज परिवार ...एक माऊली सर्वत्र! देही देहभान नाही अशी वैष्णवांची मांदी---तुकोबाराय म्हणतात तशी “मुक्तिची गवादी”. वारीत भेदाभेद काही नसतो. उंच नीच नसते॰ स्वत्व निरसते..वारी म्हणजे एक मुक्त यात्रा ...एक मुक्तियात्रा. एक मंतरलेली अंतर्यात्रा .

ज्ञानदेवांच्या पालखीबरोबर ढगांच्याही पालख्या निघालेल्या! नामगजरात एक भिजणे आणि पाऊस धारात एक भिजणे! तलखी निवण्याचे क्षण! डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या बायाबापड्या,टाळ पखवाजाच्या ठेक्यावर नर्तन करणारी त्यांची पावले .घुळघुळा वाजणार्‍या टाळांचा झणझणा रसाळ नाद !
कुणाच्या डोईवर सबाह्य साजिरा ,सकुमार सावळा कानडा विट्ठलू !जैसा कर्दळीचा गाभा॰तुळशीमाला घातलेले ते सावळे सरुप पाहून पुन्हा मनात तोच शब्दांचा फेर ...

सावरी सुरतीया पे वारी जावा
 ऐसा शृंगार तेरा किसने सजाया
 देख देख भगतोंका मन हरषाया...
वारी जावा ...वारी जावा

 बुद्धीवादी चिकित्सा आणि थोर आशंका बाजूला ठेवून केवळ अनुभवच घ्यावा ... मानसिक अडसर ...मेंटल ब्लॉक.. थोडा विसरूनच जावा...... आमची दिंडी नं १५७..शांत मारुति दिंडी ...सातार्‍याची लेवे यांची दिंडी . शेलारतात्या दिंडीप्रमुख . वीणा धरणारे रहिमतपूरचे संजय पवार . वयाच्या चौथ्या वर्षापासून वारी करणारी गौरी! वारीत न ओळख लागते न पूर्वीची देख ! शेलारतात्यांची काळजीची ,मायेची पाखर ,दिंडीतल्या सगळ्या वारकर्‍यांवर सतत जाणवत होती.किती थोडक्या वेळात, न आठवे घरदार,तहान भूक हरपली ,असे झाले. तुकोबांचे “वासुदेव” प्रथमच ऐकले –

बोल अबोलणे बोले
जागे बाहेर, आत निजेले
 कैसे घरात घरकुल केले
 नेणो अंधार, ना उजेडले गा I

 मधेच ‘राधे राधे’ चा गोडवा वातावरणात भरून जायचा---गौळण साकरायची ....

 ‘हरीने माझे हरिले चित्त
 भार वित्त विसरले
आता कैसी जाऊ घरा
 नोहे लौकिक बरा ‘

 मधेच भर पावसात रस्त्यातच फेर धरणे .स्वतः बद्दलचे भ्रम अहंकार किती निरसतात . स्वत; तुळशी वृंदावन वाहून नेण्याची,पताका नाचवण्याची, टाळ वाजवत- घागर मिरवत जाण्याची अनुभूति वेगळीच. दक्षिण द्वारावतीच्या दिशेने अलोट भक्तिधारा वाहत चाललेली.विठोबा म्हणजे विष्णुचे , कृष्णाचे रूप मग तिथे राधा हवीच . ही भक्तीची प्रवाही ‘धारा’ राधेचच प्रतीक. सावळ्या बिंदुल्याच्या अनावर ओढीने वाहणारी धारा ---धावणारी राधा!

वर्षानुवर्षे वारी करणारे आहेत . जसा हिमालय एकदा गेले की पुन्हा पुन्हा बुलावा धाडतच असतो तसच वारीच . तुकोबांचे ‘आंधळे पांगुळ’ऐकले . ते किती चपखल आहे –

देशवेष नव्हे माझा,
सहज फिरत आलो
 करू सत्ता कवणावरी
कोठे स्थिर राहिलो न
भरेची पोट कधी, नाही निश्चळ भाव
 हिंडता भागलो गा
लक्ष चौर्‍या ऐंशी गाव.

. पाऊसधारात,नामगजरात चिंब होणं , म्हणजे आनंदवारी -आषाढवारी! वारी संपल्यावर, घरी गेल्यावर ,” मुरडीव कानोले” करण्याची एक पद्धत आहे .करायलाच हवेत. हाताने मुरड घालून असे कानोले म्हणजे करंज्या केल्या की परत परत मुरडून, वारीला जाता येते!


 Adv Seema© Adv Seemantini Noolkar