रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

निळे घाटमाथे निळ्या राउळांचे


 निळे  घाट माथे..... 




  



करिमकुरिंजी



पश्चिम घाटाच्या, दक्षिण टोकाची १५०० मी उंचीची सदाहरित पर्वत राजी म्हणजे नीलमलाई – शोला ग्रासलँड…! “शोला”चा एक अर्थ छाया आणि दुसरा अर्थ आहे वसंत ऋतु .शोला मधली वृक्षराजीची कॅनोपी  इतकी घनदाट आहे की सूर्यकिरणांना अजिबात खाली झिरपू देत नाही ,शीतल छाया देत रहाते आणि शोलामध्ये वसंत ऋतु नेमाने अवतरत रहातो.या शोलामध्ये, नीलमलाईमध्ये, विशेषत: एराविकुलम नॅशनल पार्क, अन्नामलाई, अगाली हिल्समध्ये दर बारा वर्षानी नीलकुरींजी बहरते॰ हे  नीलकुरिंजीचे माहेरघर ! 
केरळला २०१८ साली पावसाने अक्षरश: धुवून काढले होते. एयरपोर्टही पाण्याखाली गेला होता. नेमकं दर बारा वर्षानी फुलणार्‍या, नीलमलाईला नील वर्ण बहाल करणार्‍या नीलकुरिंजीच्या पुष्पबहराचे हे वर्ष. नीलकुरिंजीच्या निळ्या निळ्या कळ्या पांघरून पहुडलेला,  नीलकुरिंजी अंगोपांगी माखलेला  नीलमलाई मला कोणत्याही परिस्थितीत पहायचाच होता. मध्येच चार सहा दिवसांची उसंत पावसाने दिली, एयरपोर्ट सुरू झाला आणि हायसं  झालं. तातडीने केरळ गाठलं. वाहून गेलेले रस्ते, जागोजाग कोसळलेल्या दरडी …..निसर्गाचे प्रलयंकारी रूप साक्षात समोर होतं.                      

पावसाच्या तांडवात नाजुक साजूक नीलकुरिंजीचे काय झाले असेल, अशी एक धाकधूक मनात घेऊनच गेले. पण नीलकुरिंजी अनावर फुलली होती. नीलकुरिंजी शोलाला वणव्यांपासून वाचवते, मातीची धूप रोखते, आणि नीलमलाईच्या आदिम लेकरांशी तर तिचे जिवाभावाचं सख्य आहेच. अशा या नीलकुरिंजीला, निसर्ग फुलण्यापासून कसं रोखेल? प्रतिकूल परिस्थितीत तगून राहण्यासाठी डावपेच लढवण्याची उपजत किमया वंनस्पतीकडे असतेच.
घंटाकार निळ्या फुलांचा फुलोरा मिरवत नीलमलाई, धुक्यात आबदार पहुडला होता. इतकी अनोखी फुलं आजूबाजूला फुलली होती पण नीलकुरिंजीच्या निळ्यासावळ्या रंगाची, धुक्याची निळी भूल मनाला  पडली होती. ग्रेसची “निळाई” अनुभवावी ती इथेच. खरंचच नीलमलाईवरच्या निळ्या मंदार पाऊल वाटा हाकारत होत्या..

निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाऊल वाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणाला

या वर्षीच्या पुष्पबहराचं वैशिष्ट्य म्हणजे नीलकुरिंजीच्या बहराबरोबर शोला कुरिंजीचाही बहर होता. शोलाकुरींजी दर दहा वर्षानी फुलते आणि नीलकुरींजी १२ वर्षानी. दर साठ वर्षानी दोघींच्या एकत्रित बहराचं वर्ष येतं.  

नीलकुरिंजीच्या उन्मुक्त बहरामागे एक कारण आहे. ती बांबूसारखीच मोनोकारपिक वनस्पति आहे. बांबूला ठराविक वर्षानी एकदाच उन्मुक्त बहर येतो आणि लयबद्ध बीज निर्मिती होते. जणू जन्माची इतिकर्तव्यता होते  आणि बांबू मरून जातो. त्याला “मातम” म्हणतात. नीलकुरिंजीच्या नशिबीही उन्मुक्त बहरानंतरचा, बांबूसारखाच ‘मातम’ असतो. नीलकुरिंजीला म्हणूनच कमाल बीज निर्मितीचा ध्यास असतो.त्यासाठी परागीभवन, पराग हस्तांतरण व्हायला हवे. त्यासाठी नीलकुरिंजी तिचा मधुरसाचा खजिना पणाला लावते. या खजिन्याची सर्वात जास्त भूल पडते ‘एपिस सेरेना’या मधमाशीला. नीलकुरिंजीच्या फुलाचा आंतरभाग या मधमाशीच्या स्पर्शाला संवेदनशील असतो. तो स्पर्श होताच नीलकुरिंजी आपला पराग खजिन्याचा भार रिता करते. मधुरस आकंठ पिऊन, परागकणाची भेट स्वीकारून मधमाशी पराग हस्तांतरणाच्या मार्गाला लागते.या सगळ्यात स्वपरागीभवन होऊ नये याची काळजीही कुरींजीपुष्प घेते. हा सगळा एक रंगमंचीय आविष्कारच असतो.ही प्रक्रिया जशी आश्चर्यात टाकते तसच नीलकुरिंजीला तिच्या बहराचं नेमकं वर्ष कसं  समजतं ,हेही एक आश्चर्य आहे.वनस्पतींची स्वत:ची अशी एक कालमापन यंत्रणा असते. 
नीलकुरिंजीचे शास्त्रीय नाव स्त्रोबिलॅनथस कुंथिनस. नीलकुरिंजीचा पहिला  बहर १८२६ साली नोंदला गेला. नीलकुरिंजीच्या  जगभरातल्या ४५० स्पिसीस पैकी ४२ केरळमध्येच आहेत .एक पांढरी ‘करीम कुरींजी’ ही केरळमध्ये आहे. आपल्याकडची सह्याद्रीतली कारवी, नीलकुरिंजीचीच बहीण. सह्याद्रीत कारवी अशीच पाच, सात वर्षानी बहरते तेव्हा “नीळ  आली, नीळ  आली’ अशी हाकाटी रानोमाळ उठते.
नीलगिरीत तोडा, मुथुवा, इरूला, बदागा या आदिम जमाती रहातात. त्यांचा देव मुरूगन॰ म्हणजे कार्तिकेय .. या मुरूगन देवाचे फूल म्हणजे नीलकुरिंजीपुष्प. म्हणून त्याला ‘कुरींजी अंदावार’ – कुरींजी देवता म्हणतात.या आदिवासी जमातीच्या  जगण्याशी, प्रेमाशी  नीलकुरींजीचं अनोखं नातं आहे. मुरूगनने वल्ली या आदिवासी कन्येशी लग्न केलं ते कुरिंजीमाला घालूनच ! या जमातीचं वय मोजण्याचं परिमाण नीलकुरिंजीचे बहर असतात॰ एखाद्याने नीलकुरींजीचे किती बहर पाहिलेत तितके त्याचं वय..! वयच नव्हे तर पिढ्याही याच प्रकारे मोजल्या जातात.
बाराव्या वर्षी यौवनात पाऊल  टाकणार्‍या नवयुवतीला होणार्‍या  स्त्रीत्वाच्या जाणिवेचा संदर्भ या बारा वर्षानी येणार्‍या बहराशी तोडा जमात जोडते.इतकेच नाही तर अंतिम संस्काराच्या वेळी मृताच्या हातून अनवधानाने नीलकुरींजीच्या फांद्या, फुलं, तोडली गेली असतील तर त्याच्या वतीने क्षमायाचना केली जाते.

नीलकुरींजीच्या फुलांचे,बहराचे धागेदोरे  प्राचीन साहित्यात सापडतात. दुसर्‍या-तिसर्‍या शतकातले तमिळ संघम साहित्य आणि नीलकुरींजी यांचा एक अनोखा रेशीम बंध आहे.

तेव्हा केरळ आणि तमिळनाडू एकत्रित असं तमिलाकम होतं. या तमिलाकमच्या तमिळ संघम साहित्यातली एक अद्भुत काव्य संकल्पना  म्हणजे तिनाई. तिनाई म्हणजे एक काव्यात्म लँड स्केप आहे… म्हटलं तर भौगोलिक म्हटलं तर प्रेमकाव्य.तिनाई जेव्हा स्फुरते तेव्हाचा ऋतु, समय, स्थळ यांचा उल्लेख तिनाई  काव्यात असतो. या पार्श्वभूमीवर, त्या  त्या ऋतुत उमलणारी फुलं, पशुपक्षी,आदिम रिती, देवदेवता अशा सार्‍या गोष्टी तिनाई  काव्यात असतात.या तिनाई प्रेम-प्रणय भावनांशी निगडीत असतात. तिनाई काव्यात कुरींजी, मुलाई, मरुथम, पालाई  आणि नेयतल  तिनाई अशा पाच तिनाई आहेत. मुलाई तिनाई म्हणजे तमिलाकममधली वनं, जंगलं जी प्रेमिकांची एकमेकांची आतुरतेने वाट पाहण्याची जागा.मरुथम म्हणजे पिकाऊ जमीन —प्रेमिकांच्या लाडिक कुरबुरीची जागा.नेयतल म्हणजे तमिलाकमचा विस्तीर्ण समुद्र किनारा.. विरहाचे प्रतीक! पालाई तिनाई म्हणजे दूरत्व सांगणारा  तमिलाकमचा वैराण प्रदेश.कुरींजी तिनाई म्हणजे मिलनाचे मनोहारी स्थळ.या प्रत्येक तिनाईचे एक फूल आहे. कुरींजी तिनाईचं फूल अर्थातच नीलकुरींजी. नीलकुरींजी मीलनाचा सांगावा देण्यासाठीच फुलते.
कर्नाटकातही सांडूरू हिल्समध्ये नीलकुरींजी फुलते आणि कर्नाटक संगीतात एक कुरींजी रागही आहे. नीलकुरींजीच्या या भरजरी वारशाची जाण म्हणून भारत सरकारने एक पोस्टल स्टॅम्पही काढला आहे.

केरळ मधला एकमेव अजेंडा नीलकुरिंजी हाच होता. डोंगर रांगातून फिरत मनसोक्त नीलकुरिंजीचा बहर अनुभवण्याचं अमाप सुख लुटलं.
नीलकुरिंजीचा निळासावळा रंग मनाला एक असीम शांती देत होता. ,अलगद ‘पैल’ घेऊन जात होता .ऑस्कर वाइल्ड म्हणतो, रंग हजार तर्‍हानी आत्म्याशी संवाद साधतात. नीलमलाईमध्ये अथांग पसरलेल्या नीलकुरींजीचा  नीळवर्ण हीच अनुभूति देतो.ही अनुभूति शब्दात मांडता येणंच शक्य नाही. ज्ञानेश्वरांच्या शब्दातच सांगायचं तऱ…..

नीळवर्ण रजे नीळवर्ण बुझे I
निळीमा सहजे आकारली II
नीळप्रभा दिसे नीळपणे वसे I
निळीया आकाशे हारपले II
निळेपण ठेले निळीये गोविले I
केवळ आणि केवळ अलौकिकाची अनुभुती. अलौकिकाचा अलवार स्पर्श.
नीलमलाईच्या पर्वतराजीतून  वहात येणार्‍या निळ्या वार्‍याचा स्पर्श, नीलकुरींजीचा निळा सावळा असर यापुढच्या आयुष्यात सतत अखंड सोबत रहाणार आहे.

–  ©️ अ‍ॅड. सीमन्तीनी नूलकर




पूर्व प्रसिद्धी        http://maitri2012.wordpress.

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

बरसन लागी बदरिया रुमझुमके........




 

 बरसन लागी बदरिया  रुमझुमके........

सरत्या उन्हाळ्यापासून झाडं –वेली ,पशू-पक्षी, माणसं, मान्सूनच्या काजळकाळ्या मेघांची वाटुली , डोळ्यात प्राण आणून पाहत असतात. इतकंच नव्हे तर डोंगर रांगांवरचे काळे कातळ , जांभळसडे, मातीही,मान्सून कडे डोळे लावून बसलेले असतात.उन्हाळी आकाशातलं रंगसोहळ्याचे अप्रूप संपलेले असतं . कधी एकदा हे रंग फिकूटतील, कधी घनघनमाला दाटून येतील, अशी आस लागलेली असते.आकाशपटावर  पर्जन्यनांदी करणार्‍या मेघज्योती-मेघरेखांची ओढ लागलेली असते. आकाशातली  निमालेली निळाई, बिटल्सच्या पंखांवर, मोरपिसांवर, कबुतराच्या वेळावत्या  मानेवर उमटताना  दिसायला लागली  की पावसाचे संकेत मिळायला लागतात  .

मान्सून भारताच्या नसानसात,मनांमनात,संस्कृतीत रुजलेला आहे.  संपूर्ण लोकजीवन त्याभोवती केन्द्रित आहे. म्हणूनच मान्सून अनुभवणं, मान्सून उतरताना पाहणं , मान्सून सोबत प्रवास करणं, सगळंच अंतर्मुख करणारं असतं. पावसाच्या निव्वळ संकेताने चैतन्याचे कोंब रसरसतात॰

मान्सून येतो कसा  हे पाहायचं तर  गोव्याचा किनार्‍यावरच.या वेडापायी किती दिवस बागा बीचच्या किनार्‍यावरच्या shack वर  मुक्काम टाकला होता ते नाही आठवत, पण एका भरून आलेल्या संध्याकाळी अचानक  , ताशाचा तडाम तडाम  आवाज यायला लागला. . shack वाला म्हणाला , “आला, मान्सून आला, आडोशाला पळा”. पण तो येतो कसा हेच तर पाहायचं होतं. उफाण दर्यावरून चाल करून येणार्‍या  मान्सूनच्या रौद्र  कृष्णपटाने पावलं जागीच खिळली. रुमझुम बदरिया, बिजुरिया असले नाजुक साजूक शब्द मनातून पाला पाचोळया सारखे उडून गेले. . .  .   

मान्सून हे  भारतीय उपखंडाचे वैशिष्ठ्य आहेच पण भारतीय उपखंडाला पडलेलं अवघड कोडंही आहे . मान्सून कधी बरसेल, किती  येईल ,कोण कोणत्या  भौगोलिक क्षेत्रावर मेहेरबान होईल , याचे  आडाखे सोपे नसतात.  “मौसीम” या मूळ  अरबी शब्दावरून मान्सून हा शब्द रूढ झाला आहे. मौसीमचा अर्थ वर्षातून एकदा येणारा ऋतु - मान्सून! मान्सून म्हणजे भारतीय लोकसंस्कृतीचा चौमासा ! आषाढ ते अश्विन असा चौमासा.

भारतात  मान्सूनचं पहिलं ओलेतं पाऊल पडतं ते थिरुवनंतपुरम मध्ये .  मान्सून येतो एका सुंदरीच्या ओढीने ....कालिदासाने रघुवंशात, या सुंदरीचं वर्णन, हिरवा शालू लेऊन पहुडलेली सुंदरी असं केलय.  ही सुंदरी म्हणजे जैविविधतेचा अफाट खजिना , जैविक ऐश्वर्याचा संपन्न आविष्कार साक्षात दाखवणारा  पश्चिम घाट! या सुंदरीचं मस्तक म्हणजे कन्याकुमारी , उन्नत स्तन म्हणजे नीलगिरी आणि अन्नामलाई आणि नितंब-कटी प्रदेश म्हणजे  गोवा-कारवार ! अशा या सुंदरीला नैऋत्य मान्सून हळूहळू  कवेत घेत जातो.

पश्चिम घाटाची जैविक संपन्नता केवळ आणि केवळ  मान्सूनवर अवलंबून असते. म्हणून मान्सूनचे वेध ! तो कधी येणार, किती येणार याचा लेखा जोखा म्हणूनच ही सुंदरी, संपूर्ण  पश्चिम घाट मागत असतो.

मान्सूनबद्दल भाकीत करण्याच्या विकसित शास्त्राधारीत पद्धतीबरोबरच  पारंपरिक प्राचीन पद्धतीही आहेत.ढग, ढगांचे रंग आणि आकार , दिशा, गडगडाटाचे आवाज,इंद्रधनू यावरून पावसाचे भाकीत करतात. त्याला आंतरीक्ष पद्धती म्हणतात तर भूमीवरचे कीटक,पशुपक्षी, फुल-झाडं यावरून भाकीत करण्याची ती भौम पद्धती.कित्येक शे  वर्षांपूर्वी वराहमिहिराने या पद्धती मांडल्या.त्याच अबेरक्रम्बी हिल्ड ब्रॅंडसनने 1887 मध्ये नव्याने सांगितल्या. नव्या बाटलीत जुनी दारू!

स्थानिक लोक, शेतकरी,आदिम जाती-जमातींची स्वतःची परंपरागत, निरीक्षणे, ठोकताळे असतात. प्राचीन साहित्य, लोकसाहित्यात निसर्ग निरीक्षणावर , नित्य अनुभवावर आधारित  काही पर्जन्य आडाखे आढळतात.कौटिल्याच्या अर्थशास्त्रात , वराहमिहिराच्या बृहतसंहितेत  वर्षाविषयक सिद्धांत  आढळतात. वराहममिहिराने गर्ग, कश्यप  अशा ऋषिंचा  उल्लेख वर्षा वैज्ञानिक असा केला आहे. पद्धत कोणतीही असो, पावसाचे संकेत समजून घेणं आणि पाऊस  अनुभवण, महत्वाचं.निसर्गाच्या,लोकसंस्कृतीच्याजवळ गेल्याशिवाय निसर्गाची ही भाषा, लोकसंस्कृतीचे हुंकार  समजत नाहीत  हे खरं !

कर्नाटकात चिकोडीला माझं जाणं  येणं   असतं . जूनच्या सुमाराला, पावसाचे वातावरण तयार झाल्यावर तिथे गेलं की शेतावर काम करणारे म्हणतात, “ आक्का पावसाचा आकार आला बरका. . .” पावसाचा आकार  हा इतका गोंडूस शब्द आहे . कळलच  पाहिजे पाऊस उतरलाय ते !

पावसाची चाहूल नुसता हंगामा उडवून देते . एकदा काझीरांगात अंधार पडता पडता जंगलात  भटकंती करून परत  येताना जमिनीवर प्रकाशाचे  रुजामे अवचित सामोरे आले .. काझीरंगात काजवे पावसासाठी रुजामे अंथरतात  तर पश्चिम घाटात पावसाच्या आगमना प्रीत्यर्थ काजुले  रानाडोंगरातून  आपल्याच कैफात पालख्याच  घेऊन निघतात. काजुले म्हणजे पावसाचे मातब्बर संकेत.

पाऊस संकेत समजून घेण्यात कीटकांची वर्तन शैली महत्वाची असते. तर कोळी, वाळवी ,मुंग्या, हुमले, काजवे ,मृगकिडे अशा अनेक कीटकांना वातावरणातले बदल अचूक समजतात.वार्‍याचे बदलते प्रवाह , हवेचा दाब,आर्द्रता यांचा त्यांना चांगलाच सेन्स असतो.त्यांचाही एक आतला आवाज असतो.

पावसापूर्वी  बेगमीसाठी  मुंग्यांची लगबग सुरू होते. तोंडात पांढरी अंडी घेतलेल्या काळ्या तुरतुऱया मुंग्या पळत असतात .पानांची घरटी विणणारे हुमले पानं शिवण्याच्या उद्योगात गर्क होतात. अंधार पडता पडता अनवट वाटा  अचानक  दुमदुमून उठतात . हा असतो सिकाडा आणि क्रिकेटचा ऑर्केस्ट्रा. पावसाचे येणं साजरं  नको करायला?

मृग लागता लागता ,धरणीसाठी इंद्राचे ,पावसाच्या आगमनाचे  शुभशकुनी  संदेश    घेऊन,  इंद्रगोप येतात. इंद्रगोप म्हणजे मृगाचे किडे. केशरी मखमली पोशाख घातलेल्या या इंद्र गोपाना  scarlet lady म्हणतात. तर तेलुगूमधे म्हणतात “आरुद्र पुरुगू “.आरुद्र म्हणजे मोसमी, पुरुगू म्हणजे कीटक —मोसमी कीटक! फक्त मोसमी पावसाच्या तोंडावर हा दिसतो. शेतकरी या इंद्रगोपांच्या मागावर असतात . हे इंद्रगोप जसे अज्ञातातून प्रकटतात तसे अज्ञातात दिसेनासे ही होतात . ते दिसेनासे झाले की शेतकरी पेरणीच्या मागे लागतात.

कोकणातल्या , किनारपट्टीच्या लोकांचे अवघे जगणे मासळीशी निगडीत.पावसापूर्वी समुद्र किनार्‍यालगत काही विशीष्ट  जातीचे मासे उड्या मारताना दिसायला लागतात. एरवी समुद्रात  बिलजांची रेलचेल असते पण पावसाचे संकेत मिळताच बिलजा बेपत्ता होतात आणि कांटे  मासे दिसायला लागतात.माशांची वर्तनशैली कोकणी लोक, कोळी, मासेमारी करणारे यांच्या साठीचे  पाऊस संकेत असतात.

लापता असणारे बेडूक –दादूर ही आता दिसायला लागतात. बेडकांवरूनही  पावसाचे एक निरीक्षण आहे. ज्येष्ठात बेडूक जोरजोरात ओरडायला लागले की लवकरच पाऊस आहे हे ओळखून घ्यायचे. पावसाच्या चाहुलीने दादूर लोकगीतातून बोलायला लागतात. एरवी बेडूक काही कोणाला आवडत नाही पण पावसाच्या चाहुलीने व्याकूळ विरहिणी मोर, पपीहा बरोबरच दादूरलाही  साद घालतात.

“हमारे सावरीया  नही आये, सजनी छाई  घटा घनघोर

दादूर ,मोर,पपिहा बोले, कोयल कर रही शोर “

भारतवर्षात पावसाचा पहिला सांगावा  घेऊन येतो तो चातक – कोयल  !  Jacobin cuckoo. स्थलांतर करून येणारे हे पाखरू किती एक कवींचे , प्रेमिकांचे लाडले आहे. याला मेघपपिहा ही म्हणतात. मेघपपिहा पावसाच्या आगमनाच्या ललकार्‍यावर ललकार्‍या देत रहातो---न थकता.

पावसाचे पुष्पसंकेत आणखीच वेगळे . पावसाचे संकेत फुलांना मिळायला लागले की सुगंधाची उच्चतम उधळण  ती करायला लागतात. फुलांची ही मार्दवपूर्ण गंधित भाषा आसमंतात दरवळते .असाच  एक पावसाचा गंधदूत म्हणजे द्रौपदीमाला.झाडा-पानाआडून अवचित निळा जांभळा लांबलचक सुवासिक गजरा डोकावतो . ते ऑर्कीड म्हणजे द्रौपदीमाला . त्याला सीतेची वेणी असेही म्हणतात . खरतर तो  सीतेने किंवा द्रौपदीने वेणीवर माळलेला गजराच !

फुलांना दिवसाची लांबी नीट समजते .किती फुलायचं, कधी फुलायचं हे ठरवण्याचा हक्क ती आपल्याकडे राखीव ठेवतात.अमलताशाचा बहर हे त्याचे  जातिवंत उदाहरण . अमलताशाची पावसाशी अदृश्य नाळ इतकी जुळलेली असते की आदिवासींच्या निरीक्षणाप्रमाणे  पावसाआधी 40/45 दिवस अमलताशाचा बहर टिपेला असतो. हेच निरीक्षण वराहमिहिराने बृहतसंहितेत मांडलं आहे.अमलताशाच्या फांद्यांच्या  सांध्यांची (internodes) लांबी   वाढलेली असते.किंवा कोस्टस स्पीसीज (पेव)मध्ये फुलाची लांबी वाढलेली आढळते .पळस म्हणजे गुजराती “केशुदा”. केशुदाच्या  बहरावरुन  पाऊस कधी येईल आणि किती येईल हे सांगता येतं॰ प्लांट फेनोलोजीच्या  अभ्यासाप्रमाणेही अशी काही  निरीक्षणं आहे.

जाई, प्राजक्ताचे बहर,पावसाच्या आगमनाच्या हिशोबाने ओठंगलेले असत्तात .पिंपळाचा, महुवाचा इतकच नाहीतर, गवताच्या-दर्भाच्या  पात्याचा  ताजवाही  पाऊस सूचित करतो.काही झाडांच्या फळांचे पिकणे, पिकून गळणे याचा वेळकाळही पाऊसकाळाच्या  दृष्टीने अर्थपूर्ण असतो.

पावसाचा आकार आला की सह्याद्रीच्या जांभळसड्यांवरही हलचल सुरू होते.सापकांदे हळूच फणे काढतात.काही विशिष्ट   कंदिलपुष्प वाटावाटावर खडी ताजीम देतात.भुई आमरी फुलतात .पावसासाठी अशा रानसाजणी सजायला लागतात.

पावसाचे आगमन जसं ही फुलं सूचित करतात तसं निर्गमन ही ! पावसाच्या झडीवर  झडी लागल्या आहेत, पाऊस आता आयुष्यभर थांबणार नाही, असा  माहोल असतो आणि निलगिरी-शोला मधले आदिवासी छातीठोक पणे  सांगतात “ आठ दिवसात पाऊस जाणार”. कारण तेव्हा   नीलगिरी -शोला  मध्ये M.nilgirica   (mawrsh) चे बहर जंगलभर फुललेले त्यांनी मनोमन नोंदलेले असतात.

या  अशा अनेक जैविक घटकांप्रमाणे अजैविक  घटकही पावसाचे संकेत देतात . ढग, ढगांचे रंग आणि आकार , दिशा, गडगडाटातून ध्वनित होणारे आवाज “मायने” रखतात.लहानपणी ढगात सुसर, हत्ती,कासव पाहण्याचा एक छंद असतो.पण या आकारांचेही अन्वयार्थ असतात. निळे पिवळे  ढग दीर्घकाळ पाऊस दर्शवतात .ढग  ईशान्येला असतील तर उत्तम धान्य  आणि नैऋत्येला असतील तर धान्यनाश ! मेघांचे आकार, पाणी धारण करण्याची क्षमता यावरुन  मेघाना अभ्रतरुअंबुवाह, जीमूत , वारिवाह अशी सुंदर नावं आहेत.

लोकसाहित्यात  पर्जन्यभाकिते करणारे लोकज्योतिषी हा एक अतरंगी प्रकार आहे.महाराष्ट्राच्या लोकसाहित्यात  “सहदेव   आणि भाडळी”  ही लोकज्योतिषांची  एक  जोडी  आहे . सहदेव भाडळीच्या पर्जन्यभाकिते सांगणार्‍या  “मेघमाला”  या रचना, आद्य ओवीबद्ध रचना मानल्या  जातात . पर्जन्यभाकिते करणारे लोकज्योतिषी  आख्ख्या भारतभर आढळतात.भाडळी गुजरात, राजस्थान, पूर्वभारत,हरयाणा, उत्तरप्रदेश,बिहार मध्ये भडळी, भंदली,भाजली अशा नावांनी आढळते. तर भाडळीचा सहचर राजस्थानात डंक,बंगाल मध्ये डाक,उत्तर भारतात घाघ म्हणून ओळखला जातो.

”घाघ”  या लोकज्योतिषाच्या पाऊस संकेताच्या दुनोळया-चारोळया आहेत.पाऊस जास्त होणार हा  हिशोब वाळवीचा  असेल तर ती  झाडावर तिचं मातीचं घर करते ॰ पण वाळवीच्या आडाख्यापेक्षाही जास्त पाऊस असतो कधी कधी.वाळवीच्या वर्तना वरून पाऊस जास्त हे नक्की पण किती याचे  घाघचे आडाखे वेगळे.तो म्हणतो, वैशाखात  पाऊस पडला तर इतका पडेल की तेंसुल वृक्षांवरची  वाळव्यांची मातीची घरं धुवून जातील.

बैसाख छुवाई,

तेंसुल धुवाई l

 पावसाची वाहने, नक्षत्रे हा ही पाऊस संकेताचा एक वेगळा पैलू आहे. यावरून घाघ  घाघनीला  सांगतो,

“रोहिणी बरसे, मृग तपाई

कुछ दिन आर्द्रा जाये

कहे घाघ, सून घाघनी

स्वात भात नाही खाय “

म्हणजे रोहिणी नक्षत्रात पाऊस बरसला पण मृगात तलखी झाली, आर्द्रा ही काही दिवस कोरडेच गेले तर संपूर्ण  खरीप हंगामात , सर्वत्र चांगला पाऊस आहे .  पर्जन्यभाकिते मांडताना केलेले ,उलटा बादल  चढा , तितरपंख  मेघा ,असे कितीतरी उल्लेख मोहवतात.

लोकगीतात, संगीतातही पावसाची चाहूल, भरून आलेल्या मेघांमुळे विरहिणीला आलेली   व्याकुळता,कजरी, बारोमास गीतातून  दिसते. कजरी तर पावसाच्या चाहुलीची, पावसाची, पावसात जाणवणार्‍या विरहाचीच गाणी आहेत.काजळाच्या रंगाच्या मेघांवरून” कजरी”किंवा “कजली” हे नाव या गीत प्रकारला पडलय.बनारस आणि मिर्झापूरची कजरी जातीवंत कजरी. “झिर झिर बरसे सावनमे रस बूंदिया” किंवा “झिमिर झिमिर पानी बरसे” सारख्या  कजरी ऐकतच राहाव्या.  भावना पोचताना ,भाषेचा अडसर येतच नाही. “झिमिर झिमिर पानी बरसे” हे पूर्वांचलचे सरगुजिया लोकगीत आहे .

पाऊसधारा इतक्याच “बूंदिया”, “बूंदरिया” लोकगीतात हिर्‍यासारख्या  चमकतात. कुमारजींची गौडमल्हारातली एक चीज आहे . “अमरईय्यनके बिरखनके पातनपर पटभीजनासी बूंदरिया  चमके. . . “आमराईतल्या वृक्षांच्या पानांवर काजव्यांसारखे पावसाचे थेंब चमकतात. . . “ इथं  श्वास रोखून थांबयचच!

लोकगीत असो नाही तर खलील गिबरानचे Song of Rains असो..  पाऊस, पाऊसधारा, पाऊस थेंब तसेच भुरळ घालतात. कोणीतरी गिबरानच्या Song of Rains चा स्वैरानुवाद केलाय  .. .  पाऊसधारा म्हणजे ,“ रजत सूत्रमे पिरोई बूंदे  

पाऊसधारात चिंब झाल्यावर , शुभमीता बानर्जीचे लाडिक लाडिक “बरसन  लागी  बदरिया रुमझुमके” ऐकल्यावरच  माझा पाऊस पूर्णाथाने सार्थकी लागतो, हे मात्र मला कळून चुकलय.

 

अॅड. सीमंतीनी नूलकर

9822323847 

ssnoolkar@gmail.com

संदर्भ :

1.फुलांचं बहरणं,बीजनिर्मिती,पानं , झाडांची खोडं, internodes मधलं  अंतर  यांचा अभ्यास ,पर्यावरण ,हवामान बदल या अभ्यासाच्या दृष्टीने  Phenology या शास्त्रशाखेत आहे. फेनोलोजी म्हणजे एक प्रकारे  Science of appearance of Plants.

2. .लोक्ज्योतिषांची पर्जन्यभाकिते या विषयावर  डॉ.  रविशंकर, डॉ.  जगदीश्वर रेड्डी,  अशा अनेकांनी काम केलेलं   आहे .


Please enter your Email address with your comments so that new post can be intimated through Email.

 

 

 

 

 

 

 

 

रविवार, २६ जुलै, २०२०

गंगा , ओ गंगा तुम , बहती हो क्यूं?


दोन तीन वर्षांपूर्वी काझिरंगामधे समोर  पसरलेलं ब्रम्हपुत्रेचं विशाल विस्तीर्ण पात्र पाहिलं आणि आपोआप मनात भूपेन हजरिकांचे गाणे सुरू झालं होतं.
"ओ गंगा, गंगा तुम, बहती हो क्युं?"

गेले काही दिवस आसाम मध्ये पुराचे थैमान सुरू आहे .ब्रम्हपुत्र धोक्याच्या पातळी वरुन वहायला लागली आहे आणि ते पाहून  पुन्हा एकदा तेच गाणं मनात घोळायला लागलं.

मी पहिल्यांदा आसामी भाषेतलं गीत ऐकलं होतं .डोळ्यासमोर अक्षरशः चित्र उभं करतं ते गीत. आजही गाणं मनातून जात नाही पण ते चित्र समोर येणं नको वाटतय.

"बिशतिर्न पारोरे 

अहंक जानोरे 

हाहाकार शिनेयू .

निखब्द निरोबे 

बुढा लोई,  बूआ कियो? 

( ब्रम्हपुत्रा , तुझ्या अपार विस्तिर्ण काठांवर असंख्य लोक आहेत. तू हाहाकार मांडला आहेस आणि तरीहि नि:शब्द वहात आहेस. ओ गंगा, गंगा तुम,बहती हो क्यूं?)

हे गीत असामी, बंगाली आणि हिन्दी मध्ये आहे . भूपेनदा जिला गंगा म्हणून हाकारतात ती म्हणजे आख्खा  आसाम जिच्या जिवावर आहे ती ब्रम्हपुत्रा....म्हणजेच “बुढा लोई” . ब्रम्हपुत्रेला “सिरी लोई”, ‘बार लोई” असं ही म्हणतात . मुळात  ब्रम्हपुत्रा नदी नव्हेच. तिचे पात्र इतके विस्तीर्ण, सागरासारखे आहे की तिला 'नद' म्हणतात. आसामच्या प्रत्येक कुटुंबात एखाद्या  बुजुर्ग माणसाला मान असावा तसा ब्रम्हपुत्रेला आहे . म्हणून तो "बुढा लोई."

आज प्रत्येक आसामी माणूस बुढा लोईला विचारतोय, 

“बुढा लोई, 

बुढा लोई तुमी, बूआ कियो? “

बुढा लोई,  तू असा अनावर होऊन का वाहतो आहेस?लाल लाल पाण्याने का उफाणतो आहेस? 

बुढा लोई,  रागावलाय. बुढा लोईच्या लेकरांना ते समजतय. ते नाराज होत नाहीत. आपल्या जन्मदात्याचं रागव़णं  समजून घ्यायला हवं असं त्याची निष्पाप, लेकरं मानतात.

ब्रम्हपुत्रेच्या प्रार्थनेतही ती लेकरं म्हणतात ,

“ब्रम्हपुत्र, नमोमी,

कभी शांत ,कभी रुद्र.....” 

पण हल्ली हल्ली, बुढा लोईचं रागवणं जरा जास्तच आहे .रागाने लालेलाल होऊन उसळतोय. बुढा लोईला आपल्या अंगाखांद्यावर बागडणार्‍या लेकरांचीही फिकीर नाही़सं झालय. दोन्ही तीरांवर हाहाकार मांडलाय नुसता.  वृक्षच नव्हे तर माणसंही उन्मळून पडली आहेत. काझिरंगात र्‍हायनो, हत्तींची कलेवरं पुराच्या पाण्यात तरंगत आहेत. रागावलाय बुढा लोई? माणसाने निसर्गाचा मांडलेला विध्वंस पाहून?त्याचा रुद्रावतार पाहून आता लेकरांचाही धीर सुटलाय.

पोरं जशी शेवटी आईवरच चिडतात, रागावतात आणि तिलाच खळीला  येऊन का रागवतेस सारखी, म्हणुन जाब विचारतात ,तसंच बुढा लोई ची लेकरं त्याला विचारात आहेत,

"बिस्तार है  अपार, प्रजा दोनोपार,

करे हाहाकार ,

ओ गंगा, गंगा तुम, बहती हो क्युं?

निशब्द सदा , ओ गंगा तुम बहती हो क्यू?

निसर्गाचा नाश, माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी केलाय. माणसाची नैतिकताच नष्ट झालीय... मानवता संपून गेलीय....

"नैतिकता नष्ट हुई , मानवता भ्रष्ट हुई,,

इतिहासकी पुकार, करे हुंकार  

निर्लज्ज भावसे बहती हो क्यू?

ओ गंगा की धार, 

निर्बल जनको ,सबल संग्रामी, समयोग्रामि

बनाती नही क्यू? 

बुढा लोई, तुझी लेकरं हतबल निर्बल  झाली आहेत. तूच त्यांना सावरायला , धीर खंबीर बनवायला हवय .....तुला काहीच वाटत नाही का?

तुझ्या अनपढ-अक्षरविहीन लेकरांना खायला अन्न  नाही,झोप नाही. तरी तू मौन का?

बुढा लोई तूच कर आता काही तरी ...

"व्यक्ति रहे व्यक्ति केन्द्रित, 

सकल समाज व्यक्तित्व रहित 

निष्प्राण समाजको, तोडती ना क्यू?"

ब्रम्हपुत्रेचं दरवर्षी पात्र बदलणं, दरवर्षी अफाट पूर येणं  , तसं अंगवळणी पडलेलं आहे. ब्रम्हपुत्रेच्या पुराचे उल्लेख ई. स।1241 इतक्या मागे पर्यन्त  सापडतात. पण 1897 आणि 1950 च्या भूकंपात ब्रम्हपुत्रेचा परिसर हलला. बिथरला.त्यात ग्लोबल वॉर्मिंग, मातीची धूप, अनिर्बंध वाळू उपसा, वृक्षतोड यांची भर .प्रलयंकारी पुराचे थैमान सुरू झाले. 1988 चा महापूर, त्यानंतर 2017 चा. दरवर्षी नवनवीन रेकोर्ड्स! यावर्षी तर आताच 40 लाखांच्या वर विस्थापित झालेत.  शंभरच्यावर मृत्यूमुखी पडलेत.हाहाकार म्हणजे काय त्याचा हा साक्षात अनुभव!

भूपेनदांची  गीतं म्हणजे paintings  असतात.समोर चित्र उभं रहातं. ती लोक संस्कृतीची ,लोकजीवनाची गीतं असतात.

भूपेनदांच्या "ओ गंगा तुम " या गीताची प्रेरणा पॉल रॉबसन या आफ्रिकन-अमेरिकन सिंगरचे एक गाणे आहे....

O !    MAN RIVER,


YOU JUST SAY NOTHING, 

JUST KEEP ROLLING ALONG...

अर्थात त्या गाण्याचे हे भाषांतर नाही . साम्य फक्त एकच आहे. पाॅल राॅबसनचाही "MAN "RIVER आहे आणि भूपेनदांचाही ब्रम्हपुत्र "नद". . बुढा लोई.

भूपेनदांचे गीत बुढा लोईचेच गीत आहे . त्या गीताला आसामच्या बुढा लोईचाच  रंग- गंध आहे.इतकेच नाही तर बिहारच्या कोसी , गंडक चाही रंग -गंध आहे, गंगा-यमुनेचा आहे.गोदावरी- कृष्णेचाही आहे.

ब्रम्हपुत्रेचं  पात्र एरवीही , पावसाळा नसतानाही, डोळे फाटतील इतकं अफाट, अथांग, विस्तीर्ण असतं .एकदा भूपेनदा त्याबद्दल म्हणत होते.. .   “नोदिर कुल नाई ...”.कुल म्हणजे तीर . नदीला तीरच नाहीत असं वाटावं इतके ब्रम्हपुत्रेचे दोन तीर दूर आहेत .बांग्लादेशचे कवि अब्बासुद्दीन तिथे होते . ते म्हणाले, “नोदिर कुल नाई” असं नाही म्हणायचं .

असं म्हण...

“नोदिर कुल ना ssssssssss ई 

नोदिर कुल ना ssssssssssssssss ई”

या तानेतून - हरकतीतून ब्रम्हपुत्रेचे  दोन तीर किती दूर आहेत ते क्षणात उमगतं.

ब्रम्हपुत्रेत चालणारी मासेमारी तिच्या काठावरच्या लोकांच्या जगण्याचा अपरीहार्य भाग आहे.अशाच एका रमय्या  नावाच्या मांझीचे – कोळ्याचे गीत जीव गलबलुन टाकते.

उस दिन की बात है 

रमय्या नाव लेके सागर गया .

त्या दिवशी ‘धुमूआ’ची – वादळाची चाहूल लागलेली पाहून रमय्याची रमणी त्याला म्हणते,

जाल बिछानेको,  जैय्यो न रे, जैय्यो न रे रमय्या, 

तूफान आएगा

आज तडकेसे , दाई आंख फडके रे

रुक जा ना, रुक जा रे ...

आज कुछ हो जाएगा .. 

उस दिन की बात है 

रमय्या नाव लेके सागर गया  ।

धुंध्लोंकी लालीमे , सागरके पानी मे , सागर की लहरोंमे

रमय्या .....गुम हो गया ...

देती है दुहाई रे, छाती पिटे  हाय हाय

रमणी बावली हो गई....

लहर जा मुई, रात पार जा मुई ,लहर जा मुई..

रमय्या का समय हो गया..... रमय्या का समय हो गया...

लहरिया ले तो आई ,

रमय्या की लाश लाई 

लोरी सुनाके गई, 

किनारे सुलाके गई...... 

उस दिन की बात है ....

नुकतच ‘अम्फान’चा तडाखा बंगाल, ओदिशाला बसला , ‘निसर्ग’चा कोकण किनारपट्टीला बसला ..अशावेळी रमय्या आसामचा राहत नाही. तो बंगालचा असतो, ओदिशाचा असतो. कोकणचाही असतो.

यातला रमणीचा परिस्थितीचा acceptance मात्र जीवाला चटका लावून जातो. आसाममधल्या लोकांचं दुःख , असुरक्षित जगणं सांगून जातो.

संपूर्ण पूर्वोत्तर राज्य कायम दुर्लक्षित राहिली.ना रस्ते ,ना पूल , ना जीवनावश्यक सोई सुविधा ! अगदी अलीकडे कित्येक वर्षे प्रतीक्षा असलेला आसाम - अरुणाचल यांना जोडणारा  ब्रीज झाला. या बीम ब्रिजचे नाव “भूपेन हजारीका सेतू” . संपूर्ण पूर्वोत्तर राज्यं म्हणजे आसाम होता एके काळी. हा आसाम भूपेनदांचा श्वास होता.ते म्हणत, “आसाम महाभारतका महाअंग महारूप है "प्राचीन कामरूप, प्राचीन प्रागज्योतिषपूर! या आसामबद्दल त्यांची स्वप्नं होती. इथल्या भूमिपुत्रांच्या जगण्यात  बदल व्हावा यासाठी तळमळ होती.

बिहार , आंध्र, आसाम – सगळीकडे पुराने  थैमान घातले आहे आणि अशावेळी गाणी कसली सुचतात असं कोणाला वाटू शकतं. पण भूपेनदांची गीतं समाजात बदल घडवण्यासाठीच आहेत.  ते म्हणत हाथमे ‘गन’ लेके कुछ नही होगा. इसलीये हमने 'गन 'नहीं “गान’ चुना है l 

आता भूपेनदा  नाहीत.आणि बुढा लोई तर जास्तच रागावायला लागलाय .तो रागावू नये म्हणून काहीतरी करायला हवय. ते “काही तरी’ अर्नब जन देका या आसामी कवीला कळलं आहे. भूपेनदांच्या जातकुळीतलाच आहे तो. Tess Joyce बरोबर त्याचं  एक कवितांचं पुस्तक आहे “A STANZA OF SUNLIGHT ON THE BANKS OF BRAMHAPUTRA” त्यात एक हायकू आहे. प्रातिनिधिक.

"TOUCH THE BLACK SOFT SAND

OF THE FLUID GOLDEN LAGOON

........

DON'T THROW RUBBISH BAGS......     "        

हे मनावर घेतलं तर कुठलाच बुढा लोई कधीच रागवायचा नाही.

(दोन्ही गाणी . . भूपेनदांच्या आवाजातली youtube वर आहेत. एकदा ऐकुन समाधान होणार नाही अशीच आहेत)

Photo:

1. काझिरंगातले पुरात सापडलेले मुके जीव 
2.रमय्या नाव लेके सागर गया. . 

(Photo credit: PTI and Rutu raj Kanwar)

©Adv Seemantini Noolkar





 




सोमवार, २० जुलै, २०२०

ताई ,तुला हौस ग कशाची ? ....... दादा मला हौस रे भात लावणीची

                                                                  चिखलाचा  रेशीमकाला


ताई ,तुला हौस ग कशाची ? .......

दादा मला हौस रे भात लावणीची ...........

पाऊस त्याच्या बरोबर भटकंतीची सुरसुरी घेऊन येतो .त्यातही कोकणातला पाऊस , निसर्ग भटकंतीला नव्या नव्या दिशा देतो .हिरवे हिरवे डोंगर ,कोसळणारे धबधबे ,पाण्याने दुथडी भरलेल्या नद्या ,या साऱ्यातून कोकण खुणावत असतो. या सोहळ्यात एक गोष्ट कायम लक्ष वेधत आली आहे. ती म्हणजे पाण्याने भरलेली भाताची खाचरं!याच भातखाचरांनी, भात लावणीसाठी एका आषाढात मला निवळीला  ओढूनच नेलं.
 चिपळूण -सावर्ड्या जवळचं निवळी हे गाव. निवळीचे खोत सुर्वेंचा निवळीत  दीड दोनशे वर्षांपूर्वीचा भारदस्त घरंदाज वाडा आहे आणि समोर पसरलेली पाण्याने भरलेली भाताची खाचरे. भातलावणीचा अनुभव घेण्यासाठी ,मन अगदी ओढाळ ओढाळ होऊन गेलं .
लावणीसाठी स्थानिक लोक आले होते. 
तरारलेल्या भाताच्या तरुंची आधी मूठ उचलायची होती आणि मग लावणी .तीन -तीन ,चार -चार वेळा नांगर फिरवून मऊसूत झालेला चिखल साद घालत होता आणि दूर झाडीमध्ये पावश्या "पेरते व्हा, पेरते व्हा" म्हणून पुकारत होता .काही कळायच्या आत चिखलात कधी उतरले ते कळलंच नाही .
खोतांची शेतकी विद्यालयात शिकणारी नात बाबूही चिखलात उतरली. तिचे भाऊ, चुलत भाऊ यांची चिखलात कुस्ती रंगली होती .आम्हाला चिखलात उतरलेलं पाहून ,इंद्राक्का खुशीखुशीनं मूठ कशी उचलायची ते शिकवायला सरसावली. मूठ उचलायची म्हणजे भाताच्या  रोपांची गड्डी बांधायची. बांधण्यापूर्वी मुळांचा चिखल खाचरातल्या पाण्यातच खंगळून काढायचा आणि त्याच मुठीच्या पात्यांनी सगळ्या रोपांना एकत्र गाठीत कवळायचे. गाठ इतकी अलवार की लावणी करते वेळी एका हाताने नुसती वर सरकवली की रोपे सळकन मोकळी. उत्सव मधला रेखाचा सोनसळी पोशाखच  आठवला .एक किळ काढता क्षणी सरकन मोकळा होणारा.
भाताचे वाण कुठले ते  माहीत नव्हते .तिथल्या कारभार्‍यानी  सांगितले की ते "एक काडी"बियाणे आहे. म्हणजे सरकारी बियाणे .एक काडी बियाणाची रोपे लावताना एकेकच तरु ,एका ठिकाणी  लावायचे. स्थानिक देशी वाण असेल तर तीन चार किंवा जास्त रोपेही एका जागी लावता येतात..इंद्राक्का म्हणाली ,"एक काडीचे पीक फावतां , इतर फावत नाय"
"घट लावा, घट लावा "असे खोतांनी बजावून सांगितले होते .घट लावा म्हणजे विरळ नको. अंगठा उघडलेल्या मुठीच्या  अंतरावर तरु लावायचे .पुन्हा लावण्याचेही विशिष्ट तंत्र.जरा तिरकेच लावायचे. तरु स्वतःच्या बळावर जीव धरून रुजून उभे राहायला हवे .स्वत:च्या अस्तित्वाचा झगडा स्वत:च द्यायला हवा ,असे साधे सोपे गणित .
पाऊस मेहेरबान होता .लावणी करण्यासाठी आवश्यक तेवढा झाला होता आणि लावणीच्या वेळी हवा तसा ब्रेकही त्याने घेतला.हवे तितकेच भिजायचा आनंदही लुटू दिला .
मुठी उचलून झाल्या .बांध भाताच्या मुठींनी सजले ..कारभाऱयांनी तोपर्यंत पुन्हा पुन्हा नांगर फिरवून चिखलाचा रेशीमकाला केला होता. रांगोळी काढण्यापूर्वी रांगोळीचे ठिपके काढावे तशा रोपांच्या मुठी खाचरात पटापटा मांडल्या गेल्या .
ज्या शिवारात लावणी करायची त्यांच्या राखणदाराचे देऊळ एका कडेला होते .तिथे लावणीच्या पहिल्या दिवशी उंबर आणि कोंबड्याचा  नैवैद्य. उंबर म्हणजे पिकलेल्या फणसाच्या पेस्टमध्ये ,तांदळाची पिठी घालून केलेले टम्म वडे. शिवाय "देणे "म्हणून एक अंडेही ठेवले गेले. हे देणे ज्याचे असते त्याचा तो नंतर घेऊन जातो.या श्रद्धा का अंधश्रद्धा या घोळात शिरण्यात मजा नाही. हा मनाचा निष्पाप पणा आणि कुठेतरी असलेल्या विश्वासाचा भाग इतकेच .
प्रत्यक्षात विचार केला तरी पिकावर आलेल्या शेतावर चौफेर लक्ष ठेवणे अवघडच एकूण.म्हणून मग राखणदाराला साकडे घालून, त्यांच्या भरवशावर सोडायचे. कुणी चोरी मारी करायचे म्हटले तर त्याला या राखणदाराचा धाक असतोच  .
अशा पारंपारिक रिवाजांना डावलायचे तर राखणीला बिनखर्ची तोलामोलाचा पर्याय काय देऊ शकतो, हा प्रश्न उरतोच .या रिवाजामुळे कोणाचे नुकसान नसते, हे लक्षात घ्यायला हवे .सब घोडे बारा टक्के नसतात हे जाणवले.

पहिला टप्पा पार पडेतो ,वाड्यातून न्याहारीची दुरडी आली. तांदळाच्या भाकरीची चवड,चटणी आणि कोलीम! हातावर भाकरी ,भाकरीवर चटणी आणि कोलीम. वरून पाऊस रायाची पाखर! 
चिखलात बरबटलेले हात धुवून ,भाकरी खावी असा विचार होता. विहिरीतले पाणी काढून हात कोपरापर्यंत धुवत असताना मागून ऐकू आले," काय लग्नाला जायचे हाय काय कोपरा पतुर हात धुताव म्हुन इचारला". म्हटलं असो. रोमला गेल्यावर रोमन लोकांसारखे वागावे तर कोकणात गेल्यावर तिथल्या शेतकऱ्यांसारखे का नको ?

काही कसर राहू नये म्हणून काठोकाठ भरलेल्या विहिरीत तांब्या बुडवून वरचे पाणी बाजूला केल्यासारखे करून पाणीही प्यायलं.
न्याहारीनं चांगलीच तरतरी आली .जोमाने लावणीला लागायचे, तेवढ्यात चिखलात काही तरी सळसळले ."जनावर ,जनावर "म्हणून हाकाटी झाली. छोटं  पिल्लूच पण बेणं फडा काढायला कमी करत नव्हतं. शेवटी एकाने पकडून लांबच्या बांधावर सोडून दिलं.
 मध्येच पायात काहीतरी   हुळहुळुन जायचे .इंद्राक्काला विचारले तर म्हणाली ," किरव्या  गो ".किरव्या म्हणजे खेकडे .किरव्यांची पिल्ले तुरू तुरु इकडे तिकडे तिर्रकी तिरकी पळत होती .तेवढ्यात एक मोठीशी किरवी इंद्राक्काने पकडून तिला उचलुन, तिच्या पोटाचा फ्लॅप उघडून दाखवला. "बघ बाय, हिने पिल्ले सोडली हां. पोट मोकळाच असता."कणाकणाने ज्ञानात भर पडत होती .

आणि  गंमत म्हणजे रोपे लावताना एकाग्रता साधत होती मेडिटेशन, मेडिटेशन म्हणजे तरी काय वेगळे असते? तना -मनात भरलेला हवासा गारवा, चिखलाचा मऊसूत बाळ स्पर्श, डोळ्यांना सुखावणारी हिरवाई ,कानावर पडणारे पाखरांचे आवाज, पानांच्या सळसळीचे आवाज. .सभोवतालच्या गदारोळातही मनाला  तरल शांतता अनुभवायला येत होती .

"मैं ऐसे जमघटमें खो गया हूं 
जहां मेरे सिवा कोई नहीं है "
असं आणि इतकच वर्णन त्या अवस्थेचं करता येईल. 

आता कोकणी गाण्यांचा रंग चढत चालला.

." हरिश्चंद्र बोले तारामतेला (म्हणजे तारामतीला)
 मी जातो शिकारीला."

 गाण्यातला हरिशचंद्र शिकारीला गेला आणि तारामती माहेराला .शिकार काही मिळाली नाही .मग तो घरी आला.अंघोळ केली .जेवला आणि झोपला. झोपेत त्याला काळ्या पेटीतला नाग डसला .शेवटी हरीशचंद्र मरून गेला .शेवटी त्या तारामतीचे काय झाले हे त्या कवीलाच ठाऊक .मी काव्य ऐकून अवाक.

 तोच "बोलवा माझ्या दादाला, बोलवा "असे नवे गाणे सुरु झाले . वेगवेगळ्या आवाजात ,सुरात.मध्येच एखादा टिपेचा सूर .दादाला कशाला बोलवा,किती वेळा बोलवा, हे काही कळेना. हसून हसून पुरेवाट. चिखलात लोळायची बाकी होती .

मग पुढचं गाणं...." ताई तुला हौस ग कशाची ? ....... दादा मला हौस रे बांगड्यांची
ताई तुला हौस ग कशाची ? ....... दादा मला हौस रे साखल्यांची
ताई तुला हौस ग कशाची ? ....... दादा मला हौस रे टिकल्यांची "

शेवटी दागिने संपले . मग मी सूर लावला
"दादा मला हौस रे भटकायची "
दादा मला हौस रे भात लावणीची "

कमरेत वाकून रोपे लावता लावता एका क्षणी मनात विचार चमकला ,उद्या काही खरे नाही. वाकलेले कंबरडे काही सरळ व्हायचे नाही .पण गुडघा गुडघा चिखलात, वरून पाऊस पडत असताना, वाक -वाकून रोपे लावूनही, दुसऱ्या दिवशी काही म्हणता काही झाले नाही. कदाचित चिखलात इकडून तिकडे चालत जाण्याचा योग्य व्यायाम कारणी लागला असावा.पाठदुखीवाल्यांसाठी रोज अर्धा तास कमरेइतक्या पाण्यात चालण्याचा व्यायाम आवर्जून सांगतात, तसा किंवा मड थेरपी जिंदाबाद !
लावणी संपता संपता 'मडबाथ' झाला होता. माझ्या सर्वांगाला लागलेला चिखलाचा लेप बघून इंद्राक्का फिदी फिदी हसत होती ."माझ्याकडे पाह्य बाय . . चिकूल दिसतो लुगडय़ाला?" खरोखरच तिच्या लुगडय़ाला कणभर  चिखल लागलेला नव्हता . तिचा फंडा सोपा होता .घरी जाऊन तिलाच लुगडे धुवायचे होते.म्हटल्यावर काळजी स्वाभाविकच होती.कसून नेसलेले लुगडे आणि वरुन टाॅवेल गुंडाळायचा.विषय संपला.पण मला मड बाथची  खूप मजा आली.

तोपर्यंत  अजून एक ज्ञानात भर पडली.दिवस दिवस गारठ्यात उभे राहून लावणी केली तर कधी  कधी पायाला इतक्या मुंग्या येतात की थांबता थांबत नाहीत.त्यावर उपाय एकच. . पायाला डुकराची चरबी चोळायची.लगेच मुंग्या थांबतात. मी आवंढाच
गिळला.नशीबाने तशी वेळ काही आली नाही.

भात लावणी  झाल्यावर उंबर कोंबडीचा बेत सगळ्या लावणीकारांसाठी होता.खोतांच्या हसतमुख लेकीसुनांनी  दिवसभर खपून जेवण बनवले होते.
खोतांचे वय ७० च्या पुढेच होते पण सगळे जेवल्याशिवाय त्यांनी तोंडात घास घातला नाही.हा मायेचा आेलावा आता अभावानेच दिसतो.

अमाप कष्ट  उपसणार्‍या निसर्ग पुत्रांबरोबर जाणिवपूर्वक काढलेला  हा दिवस अविस्मरणिय आठवणी मनावर कोरुन गेला.

©  अॅड. सीमंतिनी नूलकर
 भाताच्या तरुची मूठ




 लावणी पाहायला आलेला पाहुणा
 उंबर कोंबडीचा नैवेद्य
 राखणदाराच "देणं
"